खाणं आणि बरंच काही – नाश्त्याचा शिरस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर

आपण कुठल्याही प्रदेशातील पदार्थ निव्वळ आपल्या रसनातृप्तीसाठी खात असतो. संध्याकाळी तर पोळी-भाजीसारखे पदार्थ खाणे म्हणजे हल्ली कित्येकांना मागासलेपणा वाटू शकतो. त्या वेळी भूक लागते ती चटकमटक पदार्थांची. ज्यांचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते असे चौपाटीवरचे पदार्थ, म्हणजे ‘चाट’ नावाखाली खाल्ले जाणारे पदार्थ यात आघाडीवर असतात, तर नाश्त्यामध्ये दक्षिण हिंदुस्थानी पदार्थ बाजी मारून जातात.

मध्यंतरी आम्ही हवापालट करायला म्हणून हिमालयाच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात गेलो होतो. जाताना वाटेत आपल्या देशाच्या राजधानीत तीन दिवस मुक्काम केला होता. कोरोनाच्या छायेतून नुकते सगळे सावरत होतो. त्यामुळे या वेळी नेहमी उतरतो त्या स्नेह्यांकडे न उतरता एका हॉटेलवरच मुक्काम होता. सकाळी उठून बाहेर पडायचे आणि मन मानेल तसे फिरायचे. भूक लागली की, समोर दिसेल तिथे खायचे असा शिरस्ता होता. मात्र, दुसऱयाच दिवशी आम्हाला एका छोले-भटुरेवाल्यांबद्दल समजले. संध्याकाळी 5/5.30च्या सुमारास आम्ही तिथे गेलो, तर हॉटेल धुणे चालले होते. संपले म्हणे सगळे. खायचे असेल तर उद्या सकाळी 8 नंतर या. मजाच वाटली. संध्याकाळी 6च्या आत सगळे खाद्यपदार्थ संपतात कसे काय? याला काय अर्थ आहे? अशाने हॉटेल कसे चालेल? असे कितीतरी मध्यमवर्गीय प्रश्न डोक्यात घेऊन तिथून बाहेर पडलो; पण उद्या इथे यायचेच, बघू तरी काय प्रकार आहे? असे मनाशी ठरवूनच!

दुसऱया दिवशी सकाळी 9 वाजताच आम्ही तिथे जाऊन धडकलो. बघतो तर काय, पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी. या हॉटेलचे वैशिष्टय़ म्हणजे इथे फक्त छोले भटुरे, त्यात पनीरवाले भटुरे, त्याबरोबर चटणी, कांदा आणि लस्सी एवढेच मिळते. बाकी काही नाही. हॉटेलमध्ये बसायला खुर्च्या नाहीत. फक्त डिश ठेवता येतील अशी भिंतीलगत लावलेली लांबलचक आडवी टेबल्स आहेत, ज्यावर आपली प्लेट ठेवून भिंतीकडे तोंड करून उभे राहून खावे लागते. हॉटेलच्या बाहेरही कित्येक लोक उभे राहून हातात प्लेट घेऊन खात होते. वाजवी दर असलेल्या या ठिकाणी जसे शेजारच्या बाजारात मजुरी करणारे मजूर होते तसेच कॉलेजला जाणारे युवकही होते, दारोदार फिरून विक्री करणारे विक्रेते होते तसे कंपनीत बऱयापैकी वरच्या पदावर असतील असे लोकही होते. बायका, लहान मुले, वृद्ध… सगळ्या प्रकारचे लोक होते. घरून निघायचे, इथे पटकन नाश्ता करायचा आणि पोटपूजा उरकून दिवसाला फ्रेश सुरुवात करायची असा शिरस्ता दिसला. रमतगमत टाईमपाससाठी आलेत, निवांत गप्पा मारत खायचेय अशा लोकांसाठीची ही जागा नव्हेच.

असे काय खातात… हा विचार करतच आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी हिमालयात गेलो. तिथे दररोज सकाळी नाश्त्याला परोठे. कधी आलू, कधी गोबी म्हणजे फ्लॉवर, कधी मुळा, पण बरेचदा ओवा-जिरे घातलेले चविष्ट परोठे आणि बरोबर दही आणि लोणचे. त्या घरातील लोक पिढय़ान्पिढय़ा हा असाच नाश्ता करतात असे समजले. आमचे तर या नाश्त्यानेच पोट भरून जायचे. त्यामुळे तीन-चार दिवसांनी आम्ही नाश्ता करणे बंद केले. थेट 11.30च्या सुमारास जेवायला देत जा म्हणून सांगितले.

याबद्दल बोलताना नाश्ता आणि जेवण असा विषय निघाला. एक इंग्रजी म्हण आहे, ‘नाश्ता राजासारखा करावा, दुपारचे जेवण राजपुत्रासारखे असावे, तर रात्री भिकाऱयासारखे जेवावे.’ यातून प्रतीत काय होते, तर सकाळी उठल्यावर जेव्हा जठराग्नी व्यवस्थित प्रज्वलित झालेला असतो तेव्हा नीट पोट भरून खावे. दुपारी जेव्हा काही ना काही कामात असतो. कुणी कचेरीत असतील, कुणी अंगमेहनतीची कामे करत असतील; त्या वेळी चाखतमाखत जेवावे आणि रात्री मात्र अगदी कमी जेवावे. पोटात जागा असू द्यावी. यामागे आपल्या पूर्वजांनी अभ्यासलेले विज्ञान आहे.

सध्या आपण कुठल्याही प्रदेशातील पदार्थ निव्वळ आपल्या रसनातृप्तीसाठी खात असतो. संध्याकाळी तर पोळी-भाजीसारखे पदार्थ खाणे म्हणजे हल्ली कित्येकांना मागासलेपणा वाटू शकतो. त्या वेळी भूक लागते ती चटकमटक पदार्थांची. ज्यांचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते असे चौपाटीवरचे पदार्थ, म्हणजे ‘चाट’ नावाखाली खाल्ले जाणारे पदार्थ यात आघाडीवर असतात, तर नाश्त्यामध्ये दक्षिण हिंदुस्थानी पदार्थ बाजी मारून जातात. हे असे का? हा प्रश्न मनात घोळत राहिला. त्यावर जो काही विचार झाला तो पुढच्या लेखात तुमच्यासमोर ठेवतेच. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

– [email protected]