
>> अभय यावलकर
विज्ञान दिन म्हणजे विज्ञानप्रेमींचा तंत्रज्ञान युगातील एक आगळावेगळा सण, सोहळा. या दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर विज्ञानाशी संबंधित अनेक कृतिशील उपक्रमांची मेजवानी विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक, विज्ञान प्रसारक यांना मिळत असते.
सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहचताच दिवसाचा आरंभ होतो आणि संपूर्ण पृथ्वीतलावावर सजीवांचा वावर सुरू होतो. या प्रकाश किरणांची किमया एवढी मोठी आहे की, प्रत्येक सजीवाला कळत नकळत त्याचा उपयोग होत असतो. अब्जावधी लोकवस्तीच्या पृथ्वीवर एका महामानवाला प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न म्हणजे आकाशाचा रंग निळा का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच अख्या विश्वाला भारावून टाकणारा एक शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि त्याचे संशोधन संपूर्ण समाजाला उपयोगी ठरते असा हा थोर शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामण. प्रकाशाच्या रंगांनी डॉ. सी. व्ही रामणांचे कुतूहल जागृत करून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण केला तो म्हणजे आकाशाचा रंग निळा का?
हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालाही असेल, परंतु या प्रश्नाचे उत्तर डॉ. सी.व्ही.रामणांना मिळाले ते 28 फेब्रुवारी 1928 रोजी आणि म्हणूनच 1987 सालापासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. विज्ञान दिन म्हणजे विज्ञानप्रेमींचा तंत्रज्ञान युगातील एक आगळावेगळा सण, सोहळा. या दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर विज्ञानाशी संबंधित अनेक कृतिशील उपक्रमांची मेजवानी विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक, विज्ञान प्रसारक यांना मिळत असते. विशेष म्हणजे डॉ. सी. व्ही. रामण यांनी त्यांचे संशोधन हिंदुस्थानात उपलब्ध असलेल्या साहित्यातून आणि हिंदुस्थानी बनावटीच्या उपकरणांचा वापर करून संशोधन केले. त्यामुळेच त्यांचे संशोधन सर्वत्र लोकप्रिय झाले.
डॉ. रामण यांच्या संशोधनाचा मूळ गाभा-प्रकाशाचे विखुरणे हे पदार्थाच्या अणु अथवा रेणुंवर अवलंबून आहे. ज्यावेळी प्रकाश पारदर्शक माध्यमातून जातो त्यावेळी माध्यमाच्या किंवा त्यात विरघळलेल्या घनपदार्थाच्या अणुरेणुंमुळे प्रकाश किरणांचे विकीरण होते. विकीरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या ठळक रेषांबरोबरच कमी अथवा जास्त तरंग लांबीच्या अंधुक किंवा क्षीण रेषाही असतात. पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमाच्या अणुंत किंवा रेणुत प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची आंतरक्रिया घडून काही बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसतात. शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जित केली जाते. विकिरणात प्रकाश हाही ऊर्जा उर्त्सजनाचाच एक भाग आहे. विकिरणात प्रकाशाची तरंग लांबी मूळ तरंग लांबीपेक्षा कमी अथवा अधिक असू शकते. त्यामुळेच आपल्याला वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अतिक्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून अणुरेणुमधील ऊर्जेच्या स्तरांविषयी तसेच त्यांच्या बंधांविषयी माहिती मिळते. अर्थातच या बंधांमुळे रेणुंच्या संरचनेचे आकलन होऊ शकते. हेच संशोधन डॉ. सी. व्ही. रामण यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले म्हणूनच त्याला रामण परिणाम असे नाव दिले गेले.
थोडक्यात प्रकाशाच्या वर्णपटातील सात रंगांमधल्या निळय़ा रंगाची तरंग लांबी कमी असली तरी त्याचे विखुरणे सर्वात जास्त आहे. निळय़ा रंगाचे छोटे छोटे तरंग आकाशात सर्वदिशांनी विखुरले जात असल्याने आकाशाचा रंग निळा बघावयास मिळतो. हे उत्तर सर्वसामान्य वाचकांनाही कळावे या दृष्टीने दिलेले आहे. रामण परिणामाला सन 1930 म्हणजे संशोधनानंतर लगेचच पुढील अडीच वर्षांत डॉ. सी. व्ही. रामण यांना जगातील सर्वोच्च असा ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला. सुमारे 90 वर्षांपूर्वी झालेल्या या संशोधनाचा उपयोग आजही संपूर्ण जगाला होतो आहे. एखाद्या वस्तूची ओळख पटवून देणे, तिचे वर्गीकरण करणे, द्रव, स्थायू आणि वायुरूप पदार्थांचे गुणात्मक आणि संख्यात्मक वर्गीकरण करण्याकरिता आजही रामण वर्णपटांचा उपयोग केला जात आहे. संपूर्ण हिंदुस्थान देश 28 फेबुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करत आहे. 34 व्या राष्ट्रीय विज्ञान दिनी देशात खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि सर्वसामांन्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागृती निर्माण होणे प्रचंड गरजेचे आहे. आज आपल्या देशाला संशोधकांची उणीव भासत आहे. जर विज्ञानाविषयीची आवड निर्माण झाली तर संशोधकांच्या संख्येत निश्चित भर पडू शकेल.
विज्ञानाची बीज रोवणे आवश्यक
गेल्या अडीच दशकांहून अधिक वर्षे विज्ञान प्रसाराचे कार्य करताना असे दिसते की, या समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जर समृद्धी निर्माण करायची असेल तर प्रचंड जोमाने काम करावे लागेल. विज्ञान सर्वांपर्यंत पोहचवताना सोप्या पद्धतीने ते समाजापर्यंत न्यावे लागेल. तसेच विज्ञानाचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता समाजाला पटवून द्यावी लागेल. विज्ञानाचा विकास हा सत्य वास्तवतेवर अवलंबून असतो याची सवय समाजाला लावावी लागेल. कारण कटू सत्य पचनी पडणे अवघड असते, पण ते स्वीकारणे समाजाच्या हिताचे असते हेही स्पष्ट सांगावे लागेल तरच विज्ञानाची खरी रूजवात या समाजात होणे शक्य आहे. आज अनेक वर्षांच्या अनुभवानंतर अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर होताना दिसत आहे आणि म्हणूनच जेथे अजून विज्ञान शिक्षणाची खरी सुरुवातच नाही तेथे विज्ञान रूजायला अजून किती वर्षे जाणार? असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून का असेना, पण आपण सर्वांसाठी म्हणजेच देशातील संपूर्ण जनतेसाठी विज्ञानाची रूजवात करण्याचा प्रयत्न करावा असे मनापासून वाटते. घराघरापर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर शालेय विद्यार्थ्यांसारख्या संस्कारक्षम वयोगटावर कसे काम करता येईल, यासाठी काय करावे लागेल आणि त्याचे काय परिणाम दिसून येत आहेत हे पहाणे आवश्यक आहे.
कृतिशीलतेतून नवीन कल्पनांचा उगम
कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक ऐकायला बसवते. हळूहळू स्वतः केल्यामुळे कौशल्य विकसित होते, प्रयोगाबरोबरच अभ्यासक्रम पुढे जातो. यातूनच प्रश्नांची निर्मिती होते आणि प्रश्नांची उकल होताना प्रयोगांना पुन्हा नवीन प्रयोग येऊन भेटतात. नवीन प्रयोगांची निर्मिती करताना साहित्य सहज उपलब्ध होईल असे पाहिले तर त्या साहित्याला कधी तोटाच नाही. अकोल्याच्या एका शाळेतील ‘माझे’ विवेक, संतोष नावाचे विद्यार्थी बरणी बरणी भरून साहित्य आणू लागले. जस जसा काळ पुढे जाऊ लागला तस तसे त्यांचे प्रयोग वाढत चाललेत, प्रश्न वाढत चालले आणि खरोखरच या शाळेतील वातावरण बदलत गेले आणि आता माझ्या त्या विद्यार्थ्यांची यादी वाढत जाऊन शाळा विज्ञानमय होऊ लागल्याचे वास्तव चित्र बघायला मिळाले. घडय़ाळी 2 तासांचे माझे व्याख्यान माझी आणि विद्यार्थ्यांची तहान भूक शमवू लागल्याचा आनंद मी पैशातही विकत न घेता येण्याजोगा आहे. गेली तीन वर्षे सातत्याने याच विद्यार्थ्यांवर काम केल्याने या विद्यार्थ्यांचे प्रयोग कौशल्य विकसित तर झालेच, परंतु या प्रयोगांना आता तुलनात्मक स्वरूप येऊ लागले. प्रयोगांचे रूपांतरण आता प्रकल्पात होऊ लागले. त्यामुळे अभ्यास आता वैचारिक पातळीवर पोहचला. यातूनच निरीक्षण करण्याची पातळी उंचावली आणि प्रकल्पांना खरी चालना मिळण्यास मदत झाली. अशाप्रकारचे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांसोबत करायला मला ही आवडत असल्याने ते एक प्रकारचे माझे शिक्षण चालू आहे असेच मला दरदिवशी वाटत असते. या वर्षीचा विज्ञान दिन एक वेगळेपण घेऊन आलेला आहे. 1928 हे वर्ष लीप वर्ष होते. 2020 हेदेखील लीप वर्ष आहे. जर हे संशोधन एक दिवस उशिरा म्हणजे 29 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले असते तर दरवर्षी साजरा होणाऱया विज्ञान दिन सोहळय़ास आपल्याला मुकावे लागले असते आणि विज्ञान दिन दर चार वर्षांनी साजरा करावा लागला असता
(लेखक विज्ञान अभ्यासक आहेत)
– [email protected]





























































