
>> अभिषेक भटपल्लीवर
चंद्रपूर जिह्याची ’वाघ’ ही खरी ओळख. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी जगाला भुरळ घातली आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने ताडोबातील वाघ बघण्यासाठी पर्यटक येतात. चंद्रपूर जिह्यासाठी ही भूषणावह बाब आहे. मात्र यासोबतच वाघाच्या हल्ल्यात ठार होणाऱयांची संख्याही वाढत आहे. ताडोबा अभयारण्याची ही दुसरी बाजूही समोर येणं अपेक्षित आहे.
चंद्रपूर जिह्याची ओळख येथील वाघांनी सातासमुद्राकडे करून दिली. ताडोबातील वाघ बघण्यासाठी जगभरातून पर्यटक चंद्रपुरात दाखल होतात. यातून वन विभागाला मोठा महसूल प्राप्त होतो, काहींना रोजगार मिळाला ही सुखावणारी बाब. मात्र ताडोबाची दुसरी बाजू तितकीच भयावह आहे. येथील जमिनीवर मानवी रक्ताचा सडा पडला आहे. अनेकांना वाघांनी भक्ष्य केले. शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. वाघांच्या हल्ल्यामुळे त्यांच्यावर विधवेचे जिणे आले. शासनाकडून मदतीची रक्कम मिळतेय हे खरे. मात्र कुटुंबाला मानसिक आधार देताना या महिलांची मोठी ससेहोलपट सुरू आहे.
चंद्रपूर जिह्याची ’वाघ’ ही खरी ओळख. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी जगाला भुरळ घातली आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने ताडोबातील वाघ बघण्यासाठी पर्यटक येतात. चंद्रपूर जिह्यासाठी ही भूषणावह बाब आहे. मात्र ज्यांनी येथील वनाला समृद्ध केले, रक्षण केले, त्यांच्या रक्ताने येथील माती अनेकदा लाल झाली आहे. वन्यजीव – मानव संघर्ष थांबता थांबेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी 25 ते 30 व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार होत असतात. मागील पाच वर्षांचा आकडा शंभरीपार गेला आहे.
असे उपाय नकोत…
चंद्रपूर जिह्यात मानव-वाघ संघर्षाने टोक गाठले आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी काही वाघांना गोळी झाडून ठार करण्याची दुर्दैवी वेळ वन विभागावर ओढवली होती, तर अनेक वाघांना पिंजऱयात कैद करण्यात आले. वारंवार घडणाऱया घटनांनी संतप्त झालेल्या गावकऱयांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग नवनव्या उपाययोजना अंमलात आणत आहे. त्यामुळे या संघर्षाची तीव्रता खरेच कमी झाली काय? हा मात्र शोधाचा विषय आहे.
आर्थिक मदतीने प्रश्न सुटणार काय?
जंगलालगत असलेल्या गावांच्या अनेक गरजा जंगल पूर्ण करीत असते. त्यामुळे त्यांना जंगलात जावेच लागते. यातून वाघ-मानव संघर्ष घडत असतो. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, शेत मजूर, वन मजूर आणि सरपणासाठी वनात जाणारे गरीब लोक बहुतांशी ठार होतात. वन विभागातून त्यांना आर्थिक मदत मिळतेय. काही अटीतटीच्या प्रकरणात वन विभागाने तात्पुरता रोजगार मृतकाच्या कुटुंबीयांना दिलाय. प्रकरण शांत होताच त्यांना कामावरून काढून टाकण्यातही आले. पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी इव्हेंटवर इव्हेंट करणाऱया वन विभागाचे वाघाच्या हल्ल्यामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाकडे मात्र पुरते दुर्लक्ष करीत असतो, असा आरोप आता होत आहे.
विधवांचे आयुष्य खडतर…
जिह्यातील शेकडो स्त्रियांना वाघाच्या हल्ल्यामुळे वैधव्य आले. कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला वाघाने भक्ष्य केल्याने कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांवर ओढवली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळत असते. यातून कुटुंबाचे काही प्रश्न नक्कीच सुटतात. मात्र कुटुंबाला मानसिक आधार देताना, मुलांना घडविताना स्त्रियांना मोठेच कष्ट उपसावे लागत असल्याचे चित्र आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे विधवा झालेल्या स्त्रियांना शासनाने योजनांचा लाभ देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही, हे मोठे दुर्दैव. कुटुंबाची जबाबदारी पेलताना अनेक महिलांना दुःखाचे डोंगर उरावर घेऊन जगावे लागते. वाघ बघण्यास आलेल्या पर्यटकांमुळे शासनाच्या तिजोरीत भर पडत आहे. दुसरीकडे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची वाताहत होत आहे. विरंगुळा म्हणून चंद्रपुरात वाघ बघण्यासाठी येणाऱया पर्यटकांना ही दुसरी भयावह बाजू दिसत नाही, किंबहुना दिसू दिली जात नाही.
(लेखिका समाजशास्राच्या अभ्यासक आहेत)



























































