
>> अभिषेक भटपल्लीवार
आज जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाढत चाललेली दरी, विद्वेष पाहून अस्वस्थ झालेल्या चंद्रपूरकर महिलेने जात आणि धर्म नसलेले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला आहे. जात- धर्ममुक्तीच्या दिशेने टाकले गेलेले हे पाऊल म्हणता येईल.
जातीधर्माच्या नावावर माणसे विभागली जात असताना, एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न होत असताना एक क्रांतिकारी घटना समोर आली आहे. जाती-धर्माची बंधने झुगारण्यासाठी ऍड. प्रीतिषा शाह या महिलेने धाडसी पाऊल उचलले आहे. माझ्या प्रमाणपत्रावर जात आणि धर्माचा रकानाच नको, अशी मागणी करणारा अर्ज तिने जिल्हाधिकाऱयांना दिलाय. ‘नो कास्ट नो रिलिजन’ असे प्रमाणपत्र तिला हवे आहे. 5 फेब्रुवारी 2019 रोजी तामीळनाडूची स्नेहा प्रतिभाराज हिने नऊ वर्षे कायदेशीर संघर्ष करीत ‘नो कास्ट, नो रिलिजन’चे प्रमाणपत्र मिळवले. असे प्रमाणपत्र मिळविणारी स्नेहा ही देशातील पहिली महिला ठरली. त्यानंतर प्रीतिषाने हा प्रयत्न सुरू केलाय. तिला जात आणि धर्म नसल्याचे प्रमाणपत्र हवे आहे. यासाठी तिने 19 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे रीतसर अर्ज केलाय. चंद्रपूरच्या सरकारनगर येथील रहिवासी ऍड. प्रीतिशा शाह यांच्या मते, ती एका हिंदू कुटुंबातून आली आहे, वैश्य जातीत आणि हिंदू धर्मात वाढली, पण आता देशाची सद्यस्थिती पाहता ती दुखावली आहे. त्यामुळेच जात-धर्मापासून मुक्त होण्याचा तिने संकल्प केला आहे.
संविधानाच्या अनुच्छेद 25 नुसार, लोकांना स्वतःचा धर्म निवडण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे. धर्मापासून अलिप्त राहण्याचाही अधिकार आहे. राज्यघटनेच्या कलम 19 – (1) (ए)मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, जर कोणाला जात-धर्मापासून अलिप्त राहून जीवन जगायचे असेल तर तशी तरतूद करण्यात आली आहे. या कायदेशीर तरतुदींचा आधार घेत त्यांनी ‘नो कास्ट, नो रिलिजन’ प्रमाणपत्रासाठी कायदेशीर लढा सुरू केला आहे. त्यात तिला यश मिळेल काय, त्यासाठी किती संघर्ष करावा लागेल, त्याचे समाजावर काही परिणाम होतील काय, या प्रश्नांची उत्तरे प्रमाणपत्र मिळल्यावरच सापडू शकतील.
जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनासोबतच भविष्यात जात आणि धर्माच्या आधारावर सुविधांचा त्याग करायचा आहे, असे प्रीतिशा शाहने सांगितले. भविष्यात त्यांना त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्रात जात आणि धर्माचा उल्लेख करायचा नाही. संवैधानिक मूल्यांवर निष्ठा ठेवून भारतीय असल्याची ओळख व्यक्त करताना तिला धर्म, जात याशिवाय आपले जीवन जगायचे आहे. प्रीतिषाचे हे विनंतीपत्र जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही आणि प्रक्रियेसाठी पाठवले आहे.




























































