गारेगार अनुभव !

देशात देवदर्शनासाठी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि तशीच ती महाराष्ट्रातसुद्धा आहे. अर्थव्यवस्थेत देवदर्शनासाठी प्रवास करणाऱ्या लोकांचा मोठा हातभार लागतो. इंधन, गाडीभाडे, जेवण, राहण्याची जागा आणि इतर अशा अनेक गरजांमुळे चालू होणारे आणि वाढणारे व्यवसाय यावर अवलंबून असतात. यातील बरेच व्यवसाय ऋतूप्रमाणे बदलतसुद्धा असतात. विशेषतः खाण्यापिण्याच्या गोष्टी ऋतुमानानुसार मिळतात. पावसाळ्यात, हिवाळ्यात  आणि उन्हाळ्यात मिळणाऱ्या पदार्थांची खासीयत असते. उदाहरणार्थ, पावसाळ्यात गरमागरम भजी, हिवाळ्यात वाफाळणारा चहा आणि उन्हाळ्यात उसाचा रस.

उसाचा रस मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत तर बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतो. त्यातही तुम्ही जर शिर्डी, जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे देवस्थान आहे, तिथे जात असाल तर हमखास उसाचा रस उपलब्ध असतो. शिर्डीच्या वाटेवर उसाचा रस विकणारे बरेच व्यावसायिक आहेत, त्यात फक्त उन्हाळय़ात हा व्यवसाय करणारेसुद्धा आहेत. काही जणांकडे विद्युत उपकरण, तर काहींकडे डिझेलवर चालणारे उपकरण आहे आणि काही जणांकडे अजूनही लाकडी उपकरण आहे, जे बैलाच्या सहाय्याने फिरवले जाते.

असेच एका मार्च महिन्यात शिर्डीच्या वाटेवर असताना उसाचा रस पिण्याची तहान लागली आणि शोध सुरू झाला. कुठे थांबायचे याची चर्चा सुरू झाली आणि जिथे बैलाच्या सहाय्याने लाकडी उपकरणातून उसाचा रस काढला जातो, तिथे थांबायचे असे ठरले. अशा ठिकाणी आम्ही थांबलो आणि सगळ्यांसाठी उसाचा रस काढायला सांगितला. नंतर सहजच माझ्या मित्राने त्या उद्योजकाची विचारपूस चालू केली. ‘‘दिवसाला किती ग्राहक येतात? या व्यवसायात फायदा किती होतो?’’ असे काही प्रश्न. त्या उद्योजकाने आम्हाला सांगितले की, ‘‘आधी त्याच्याकडे डिझेलवर चालणारे उपकरण होते, पण आजूबाजूच्या उद्योजकांचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले की, जिथे बैलाच्या सहाय्याने उसाचा रस काढला जातो, तिथे ग्राहकांची ओढ जास्त आहे.’’ या कारणामुळे त्यानेही त्याच्या व्यवसायात हा बदल केला होता. आता हवा तेवढा नाही, पण आधीपेक्षा जास्त नफा होतोय.

तिथे जवळच्याच झाडावर रस्सीच्या सहाय्याने एक टायर बांधला होता. त्यावर एक लहान मुलगा मस्त झोके घेत होता. माझे लक्ष त्या मुलाकडेच असताना माझ्या मित्राने मला विचारले की, ‘‘या उद्योजकाला तू काही सल्ला देऊ शकतोस का, ज्यामुळे याचा व्यवसाय अजून वाढेल.’’ पहिल्यांदाच असे झाले होते की, प्रश्न ऐकत असतानाच त्या प्रश्नाचे उत्तर माझ्यासमोर झोके घेत होते. मित्राला विचारले, ‘‘उसाचा रस काढेपर्यंत, रस पिताना किंवा त्यानंतर थोडा वेळ का होईना, तुला या सावलीत झोका घ्यायला आवडेल का?’’ त्यावर त्याचे उत्तर होते, ‘‘अरे, एक नंबर, मजाच येईल.’’ त्या उद्योजकालाही हाच सल्ला दिला की, ‘‘इथे शक्य होतील तेवढे झोके बांधा आणि मग ग्राहकाच्या चेहऱ्यावरील आनंद बघा.’’ त्या उद्योजकाने सल्ला ऐकला असावा. कारण त्या मार्गावर जाताना आज अनेक झोके दिसतात आणि उसाचा रस पिणाऱया ग्राहकांची संख्याही लक्षवेधी दिसते. थोडक्यात काय तर ग्राहक त्याला मिळालेल्या वस्तू/सेवा यापेक्षा मिळालेला अनुभव जास्त लक्षात ठेवतो.

 ग्राहक त्याला मिळालेल्या वस्तू/सेवा यापेक्षा मिळालेला अनुभव जास्त लक्षात ठेवतो.

 –  अमोल पुंडे, मार्केटिंग सल्लागार

[email protected]