
>> अंजली केऱ्हाळकर
हे ऋतुचक्र या विश्वाच्या अंतापर्यंत असंच सुरू राहील. संक्रमणाचं भान ठेवत. प्रत्येकाच्या ओटीत हिरवं दान टाकत. हे जन्मलेणंच आहे जे स्वत: जवळ काहीही न ठेवता फक्त देत राहतं. श्रावण निसर्गाला हिरवाई देतो. पाऊस देतो आणि सगळय़ां निसर्गाची हिरवाईच्या सुखाची ओटी भरतो. निसर्गाचं बदलतं रूपच सृजनाचे संस्कार देतं. उत्सवांचं दान देतं. म्हणूनच हा श्रावण सोहळा बनून अधिराज्य गाजवतो.
आषाढ जरा सरकला. क्षितिजावरून मागे वळून त्याने पाहिलं तेव्हा श्रावणाचे उंबरठय़ावर पाऊल पडत होते. स्वतःशी ओलेगर्द हसून आषाढाने क्षितिजावरून आभाळात स्वतःला झोकून दिले. अगदी पल्याड… दृष्टीआड! मात्र आता इकडे श्रावणाचा सोहळा सुरू झाला. हिरव्यादाट झाडोऱयातून कुठेही आडोसा न घेता तो झिरपत राहिला. थेंबाथेंबातून सरींचा हात हातात घेऊन! त्याची सखी श्रावणी त्यालाच बिलगून, लगटून पानापानांवर सरसरत ओढाळली. तिचं तलमशुभ्र अन् हिरव्या छटेचं वस्त्र उद्धटासारखं वाऱयावर भिरभिरत होतं. श्रावणीला त्याचं भानही नव्हतं. खांद्यावरून ओघळत तिचं ते श्रावणबिंदू उत्तरीय सरकत हातावर आलं. भिजट ओल्याशा त्या वस्त्रातून वारा भरारला गेला अन् नकळत उठलेल्या शहारल्या तनूचं भान तिला आलं. एक खटय़ाळ कटाक्ष टाकून श्रावण मिश्कील हसला. हिरव्याकंच फुलोऱयाचा गंध तिच्या चाफेकळी नाकाजवळ त्याने हळूच ओढून आणला. तिच्या दाट पापण्या अलगद मिटल्या. गंध आत झिरपत गेला अन् ती उमलत राहिली कणाकणाने. सख्याचा हुळहुळता स्पर्श अन् मोहक गंध यातून ती मोहरत गेली, तिचे गात्र न् गात्र पुलकीत झाले. ‘‘श्रावणा असं वाटतं की हा हिरवा रंग, हा केतकी गंध तूच, अविरत सभोवती वेढत जावा, ही चिरंतन हिरवाई कणाकणाने माझ्यात झिरपत न्यावी अन् मी ती थेंबथेंबी उसवत न्यावी आणि माझ्या केशरओल्या गंधदेहाचा बहर तू पुनः पुन्हा उमलवत राहावास… तूच!’’ मिटल्या पापणीने मुग्धतनू श्रावणी उसासत राहिली. त्यावर श्रावणाचं मुग्ध असणं अन अर्थपूर्ण हसणं श्रावणीला खूप काही सांगून गेलं. श्रावणाच्या त्या उन्हभिजल्या पावसाने तनामनाचा कौल घेतला. ‘‘श्रावणी… माझी सखी… असं वाटतं की, तिचं हे जलधारांचं नितळ रूप आपण ओंजळीत घ्यावं, त्या ओंजळीतल्या तळरेषांवर तिचं बिंब जपून ठेवावं. आपल्या गंधमंदिर क्षणांचं हे नवीन रूप प्रत्येक वेळी नव्यानेच रुजवून ठसवून ठेवू आपल्याच अधीर काळजात. जर हे क्षण निसटून गेले तर… या शामल मेघांचा रोष ओढवून घ्यावा लागेल, मग ही माझी श्रावणी… माझी म्हणता म्हणता ओढाळून सरसरत निघून जाईल.
तिच्यामुळेच हे निर्मितीचे बीजबिंदू मी रुजवू शकतो!. नाही… मला सावध असायला हवे. नाहीतर ही हिरवी भूमी, ही पाने, फुले, सळसळता हिरवा फुलोरा, खळखळणारे झरे, पानाफुलांवर बहरलेले ऋतू… सारे सारे कोमेजून जातील. विचार करता करता श्रावण बराच पुढे आला. श्रावणीचा मात्र सगळे उत्सव, सोहळे लेवून घेण्याचा उत्साह शिगोशिग भरलेला… नागपंचमीचं तिने पूजन केलं. नागेश्वराला दुधाने, खिरीने तृप्त केलं अन् त्याच ओल्या पानापानांवरून तिने श्रावणाचा आवडता महादेवही मनोभावे पुजला. शिवमहिम्नाचे धीरगंभीर उच्चार आसमंतात घुमू लागले. ‘‘महिम्न पारं ते परमविदुषोयद्यसदृशी, स्तुतीर्ब्रम्हादीनामपितदवसन्नास्त्वयी गिरः…’’ आपसूक त्यानेही शिवलिंगावर अभिषेक सुरू केला. तिच्या स्वरात त्याचा खर्जातला गंभीर स्वर मिसळला. जलधारा उफाणल्या, हिरवं नर्तन पानगवताचं, वृक्षवेलीचं वेढत राहिलं त्या दोघांना, शिवनर्तनाचं अगम्य, अद्भुत वलय फिरत राहिलं. शिव प्रसन्न हसले. स्तोत्र संपलं तेव्हा शिवतेजाची झळाळी आसमंतात लपेटून वाहत राहिली. ‘‘श्रावणी…’’ त्याच्या भिजलेल्या गंभीर आवाजाने ती भानावर आली. प्रसन्न हसू खेळवत तिची हिरवाई त्याने लपेटून घेतली ‘‘चलायचं नं पुढे?’’ त्याच्या हातात हात देऊन नितळ थेंबांची रुजवात करीत ती मनःपूत हसली. शिवार्चना करून दोघे प्रसन्नचित्ताने भ्रमणाधीन झाले. ‘‘श्रावणा, एक विचारू?’’ तिच्या ओढाळ नजरेच्या प्रश्नाने तो हुंकारला. हाताची पकड नकळत घट्ट केली त्याने. ती हसली. ‘‘अनिवार कोसळणाऱया या तुझ्या जलधारांचा सांभाळ करताना तू तुझ्या मुठीतलं तुफान सोडणार नाहीस नं? मेघशरीरी उन्हंसुद्धा फार जिकिरीने आणावी लागतात सोबत. नाहीतर या मेघमल्हाराचा डमरू तांडव सुरू करतो. भणाणत राहतो तो नादध्वनी कल्लोळत! मग आभाळासवे तूही वाहवत जातो. फरफट होते रे माझी मग. धावधावून सारं जलमय होतं. ते हिरवे सगेसोयरे हात सोडून निघून जातात. उरतात फक्त फोल उसासे वाऱयाचे, धरेचे अन् माणसांचे!’’ त्याने नकळत निःश्वास सोडला, चेहरा विदीर्ण झाला. ‘‘प्रिये… हे माझ्या हाती नाही. मला… या पावसाला जिथे झिरपणं सोयीचं होईल तिथे मी थांबतो, कुठे मला आडोसा मिळेल तिथे मी थांबतो. नाहीतर वाट फुटेल तिकडे वाहवत जातो. श्रावणी, मला मेघमालेच्या आज्ञेनुसार माझं विहित कर्म करावं लागतं. आषाढाने आखून दिलेल्या या रंध्रातून, धाराधारातून तप्त किंवा शीतल मार्गावरूनच मार्गस्थ व्हावं लागेल नं? त्याचं कार्य आपण पूर्ण करायचं. आपलं कार्य भादवा पुढे नेईल. हे चक्र असतं. आपण चुकलो की, सगळंच पुढचं चुकत जाईल नं?’’ तिचा अगतिक चेहरा त्याला बघवेना. अबोलपणेच जलधारांचा वेढा घेऊन ते पुढे पाऊल टाकत होते. मधूनच उन्हाची सोनकोवळी पिवळी ऊब पसरवत, धारांचं नर्तन थांबवत त्यांचा लख्ख उजेडाचा हिरवा पाझर सृष्टीला दान देत देत मार्गक्रमणा करत होते. थोडय़ाच कालावधीनंतर पौर्णिमा सामोरी आली. श्रावणीच्या मनातला विचारांचा वेग चंद्राप्रमाणे रसरशीत होऊ घातला होता. पौर्णिमेच्या प्रथम प्रहरी सरसर शिरवे घेऊन ते दोघे समुद्रात डुंबले. नितळ निळय़ा त्याच्या थेंबतुषारांनी श्रावणीला त्याने मनसोक्त न्हाऊ घातलं. सागराने प्रेमाने दिलेल्या शहाळय़ांचा अमृतस्वाद घेऊन दोघं तृप्त झाले. त्याच्या शिंपल्यांना मोत्याचं आश्वासन देऊन, सावरून स्वतःला त्या नीलसिंधूचा निरोप घेतला. आयुष्याच्या या स्मरणयात्रेचा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. दोघांचं एक वेगळंच जग होतं. मार्गात भेटणारे सारेच त्यांचे प्रेमाने, उत्साहाने स्वागत करीत होते. मात्र कणाकणांतून थेंब थेंब दान देत देत ते हलकेच रिते होत होते. भरभरून देणं अन् सृष्टीला अपार सुख मिळणं यातच त्यांच्या संचितांची ठेव समाधानी होत होती. आता त्यांनाही उत्तरार्धाची ओढ लागली होती. म्हणता म्हणता अष्टमी आली अन् आनंदाचा कल्लोळ उठला. कान्हय़ाच्या जन्मोत्सवासाठी दोघे आतुर झाले. उत्सवावर आनंदाची पखरण झाली. त्या निळय़ा सख्याची उत्कट अमृतवर्षा अंगावर झेलली… मन भरून पाहिली. आसुसून झिम्मा खेळले दोघेही जण. पूर्ण पुरुषोत्तमाशी, परमात्म संधान साधून, घमघमत, डोळय़ांत पंचप्राण आणून निरोप घेतला. आता मात्र श्वास जड होऊ लागला. उत्तरार्धाचे क्षितिज गंभीरपणे खुणावत होते. ओंजळीतल्या जलधारा संपत आल्या होत्या. श्रावणीचे मुख म्लान झाले. उत्तरीय नुसतेच फडफडत राहिले. धुंदावलेले अबोल डोळे शोधत होते स्वतःलाच! तो गलबलत होता, ‘‘श्रावणी, नको अशी मुग्ध राहूस. अकरा मासांनंतर पुन्हा आपण भेटूच नं?’’ सरसरत पाणी आलं तिच्या डोळय़ांतून. ‘‘खरंच भेटायचं न पण? बघ नं आपल्याला गुंतवून घेता येत नाही. आता वाटा वेगळय़ा होतील आपल्या. दोघेही क्षितिजावरून नाहीसे होऊ. जाताना भादव्याच्या ओटीत सारी सृष्टी देऊ. पुनः पुन्हा हिरवाईचं गीत गाऊ… पुनः पुन्हा… तीच भेट… तोच विरह… कुठवर हे सारं?’’ तिची केविलवाणी बोच त्याच्या काळजात चीर पाडून गेली.
‘‘श्रावणी… हे ऋतुचक्र आहे नं? या विश्वाच्या अंतापर्यंत असंच सुरू राहील. आपण भान मात्र ठेवायचं. आपण प्रत्येकाच्या ओटीत हिरवं दान टाकतो. त्याचं ते सोनं करतात. लक्षात ठेव, द्यायचं हे जन्मलेणं आहे आपलं. आपल्याजवळ आपण काहीही न ठेवता फक्त देत राहायचं. आपण पाऊस द्यायचा, आपण सगळय़ांची हिरव्या सुखाची ओटी भरायची. संस्कार द्यायचे. धर्माचं, उत्सवाचं दान द्यायचं. घ्यायचं काहीही नाही. कारण आपल्याजवळ तो विधाता आहे. आपले दोन्ही हात साऱया विश्वाला पुरेल इतकं देऊ शकतात. होय नं?’’ डबडबलेले डोळे पाझरतच श्रावणीच्या मुखावर प्रसन्न स्मित झळकले. उन्हाची सोनकोवळी झालर एकदम झळझळली. श्रावणाने ती साऱया अंगाला लपेटून घेतली. दोघांनी पुढे पाऊल टाकले. क्षितिजाची रेघ दृष्टिपथात येत होती. शुभ्र बगळय़ांची झेप हिरव्या गवतातून उंच उडाली… निळय़ाशुभ्र आकाशातून एक माळ हलकेच हेलकावत गेली!





























































