अंधार उजळून टाकणारे दिवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अन्वर हुसेन

दिवाळीचे दिवस म्हणजे अंधार उजळवून टाकणारे दिवे… मनाला नवी ऊर्मी देणारे दिवे. दिवाळीच्या दिवसांत घरभर, अंगणात, झाडांपाशी पायऱ्यांशी, दाराच्या उंबऱ्यापाशी दिवे लावण्याचा आणि तो प्रकाश डोळ्यांत, मनात भरून घेण्यातला आनंद वेगळाच. असा हा सर्व घराघरांमध्ये उजळलेला पिवळसर उष्ण प्रकाश, अंधाराला उजळवताना मनालाही उजळवून टाकतो. तोच प्रकाश मग चित्रकाराच्या दिवाळीच्या चित्रांमध्येही उजळत राहतो.

शाळेला सुट्या लागल्या की, कधी एकदा गावाकडे, बुधगावला जाऊ असं वाटत राहायचं. उन्हाळ्याच्या सुटीची वेगळी मजा असायची आणि दिवाळीच्या सुट्टीची वेगळीच मजा असायची. कधीतरी दुसरी, तिसरीत असताना बुधगाव सोडून इस्लामपूरला राहायला आलो आम्ही. वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणी. बुधगावात मन रमवायला खूप काही होतं. मित्र होते, आवडत्या जागा होत्या, राजवाडा, झाडं, आजी-आजोबा, ‘ते’ घर, त्याच्या अंगणातलं पेरूचं झाड…दिवाळीच्या सुट्टीत खास आकर्षण म्हणजे दिवाळीचे ते 4 -5 दिवस. पण आधी आठवडाभर लगभग चालू व्हायची ती म्हणजे किल्ला करण्याची. घराच्या अंगणात किल्ला करायचो मी. गावातले मित्र यायचे मदतीला. किल्ल्यासाठी दगड, माती, विटा असं सगळं कुठून कुठून गोळा करून आणायचो.

राजवाड्याच्या भिंतीलगत रस्त्याकडेला बरेचसे दगड सापडायचे तिथून दगड उचलून आणायचो. मातीसाठी मात्र एक खास ठिकाण होतं आणि ती मातीही खासच असायची. गावातली सगळी पोरं किल्ला करण्यासाठी तीच माती वापरायचे. दिवाळीआधी किल्ला करण्याची लगभग सुरू झाली की गावातली बहुतेक पोरं पोती घेऊन, सायकली घेऊन गावाबाहेर कवलापूर रस्त्यावर असलेल्या इदगाह मैदानाच्या दिशेन जाताना दिसायची. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या डावी-उजवीकडच्या संस्थान कालीन सुंदर दगडी इमारती बघत, मजेत दोन्ही बाजूला असणाऱ्या वड-चिंचेच्या डेरेदार झाडांच्या सावलीतून जाताना खूप आनंद वाटायचा. इदगाच्याजवळ मोठी मोकळी जागा होती. तिथलं वैशिष्ट्य म्हणजे तिथली माती मस्त लाल रंगाची होती. त्या मातीचं सगळ्या पोरांना आकर्षण होतं. गावातल्या सगळ्या पोरांचे किल्ले लाल मातीचेच दिसायचे. त्या मोकळ्या जागेत माती होती. त्यात पण लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसायच्या, पण सगळ्या पोरांना अगदी रसरशीत लाल रंग जिथं दिसायचा त्या ठिकाणचीच माती घ्यायची असायची. त्यामुळे गल्लीगल्लीतल्या प्रत्येक पोरांच्या टोळीची घाई चाललेली असायची तिथून माती काढायला. माती काढण्यासाठी प्रत्येकजण मिळेल ते हत्यार घेऊन आलेला असायचा. स्क्रू ड्रायव्हर, खुरपं, कुणी टिकाव घेऊन यायचं. काढलेली माती पोत्यात भरायची. ते पोतं सायकलच्या मधल्या त्रिकोणी भागात व्यवस्थित ठेवायचं. माती काढून झाली की शेजारी इदगाह होता, त्याला लागूनच कब्रस्तान होतं. तिथं बोरिंग होतं. तिथं पाणी हापसून हाथपाय धुवायचे. तिथं कब्रस्तानाच्या आवारात एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाड जे अजूनही आहे, ते झाड खूप आवडायचं.

इदगाह मैदानातली ती पांढरी भिंत जिथं इदला वडील आजोबा आणि घरातल्या इतरांबरोबर नमाज पढायला जायचो. गावाबाहेरच्या माळावरच्या त्या पांढऱ्या भिंतीबद्दल काहीतरी कुतूहल मनात नेहमी वाटत राहायचं त्या वेळी. विशेषतः त्या भिंतीच्या दोन्ही कडेला असलेल्या त्या जराशा उंच गोल दगडी मिनारांबद्दलच कुतूहल खूप होतं. वर्षातून दोनदाच तिथं माणसं दिसायची. इतर वेळी सुनसान असायचं. दिवाळीत माती आणायला गेलो की, माती काढता काढता मधेमधे तिकडं लक्ष जात राहायचं, ती पांढरी भिंत आणि समोरचा तो चबुतरा एकाकी असल्यासारखे दिसायचे. माती काढून झाली की मग ती घेऊन घराकडे परत फिरायचं. दगड, विटा रचून मनाप्रमाणे किल्ला बांधून तयार असायचा. आणलेली माती आता त्या किल्ल्यावर थापायची. त्यासाठी मग त्या मातीचा चिखल करायचा. पाहिजे त्या प्रकारचा आणि किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर लिंपून घ्यायचा. हे सगळं होत जाईल तसा किल्ल्याचा नूर पालटून जायचा. लाल रंगाच्या मातीत किल्ल्याचं सौंदर्य वेगळंच वाटू लागायचं. किल्ल्याचे बुरुज, वाघासाठी गुहा, महाराजांसाठी खास तयार केलेली जागा, किल्ल्याच्या खालचं गाव, शेतं, विहीर हे सगळं करताना किती रमून जायचो. दिवसच्या दिवस अक्षरशः सोबतीला गावातले मित्र असायचे… रमेश, शब्बीर आणि कोण कोण…किल्ला झाला की त्यावर मोहरी टाकायची. दोन चार दिवसात ती उगवून यायची हे हिरवीगार कोवळे अंकुर किल्ला जिवंत करून टाकायचे एकदम. गावातल्या एका दुकानात किल्ल्यावरची चित्रं मिळायची. दरवर्षी तिथून दोनचार नवीन मावळे घेऊन यायचो. घरातल्या एक पत्र्याच्या चौकोनी डब्यात किल्ल्यावरची चित्रं जपून ठेवली होती आज्जीने. किल्ला तयार झाला की तो डबा फळीवरून काढायचा.

दिवाळीला फटाक्यांपेक्षा किल्ला या गोष्टीचं खूप आकर्षण होतं. दिवाळीच्या आदल्या दिवशी वडील सांगलीहून येताना फटाके घेऊन यायचे. ते घेऊन मग दिवाळीच्या दिवशी मित्रांसोबत फटाके उडवत फिरायचो. किल्ल्याच्या लगबगीसोबतच घरात आई, आज्जीची वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबगही चालू झालेली असायची. चकल्या, चिवडा, लाडू, शेव सगळं घरात तयार व्हायचं. बेसनचे लाडू तर खूप खास असायचे. त्याची सगळी तयारी आजोबा स्वतः करून द्यायचे. बेसन किती प्रमाणात भाजून घ्यायचं, कसा रंग आला की थांबायचे, तूप किती प्रमाणात घालायचं… सगळं स्वतः करायचे. माझ्या आईला त्यांनी लाडू करायला शिकवले. तिच्याही हातच्या लाडवाला अप्रतीम चव आहे. आजोबांच्या हातच्या लाडवासारखीच.

दिवाळीत आणखी एक गोष्ट खूप लहानपणापासून घरात बघत आलोय ती म्हणजे दिवाळी अंक. मौज, हंस, आवाज असे अंक वडील आणायचे. प्राथमिक शाळेत असण्याचा तो काळ. तेव्हा वाचायचा फार काही नाद नव्हता. पण त्या दिवाळी अंकामधली चित्रं मात्र बघत राहायचो. मुखपृष्ठावरची चित्रं, आतमध्ये बारीक काळ्या रेषांनी काढलेली चित्रं, खूप गुंगवून टाकायची. खूप आवडायची. ते दिवाळी अंक गावाकडच्या घरात कित्येक वर्षे जपून ठेवले होते एका कपाटात. दर सुट्टीत गेलो की दुपारच्या वेळी तो गठ्ठा काढून त्यातली ती चित्रं बघत राहायचो. पुढं चित्रकलेकडे वळलो, चित्रकारांबद्दल माहिती होऊ लागली, चित्रं बघण्यात येऊ लागली अनेकांची, तेव्हा कळलं लहानपणी जी रेखा चित्रं दिवाळी अंकांतून बघत राहायचो ती बाळ ठाकूर, सुभाष अवचट अशा चित्रकारांची होती. आज जेव्हा मी स्वतःच माझ्या चित्राबद्दल विचार करत राहतो तर मला लहानपणी दिवाळी अंकामधून पाहिलेली ती चित्रं त्या सुंदर रेषा यांचा प्रभाव जाणवत राहतो.

दिवाळीच्या दिवसांमधला अजून एक खूपच आवडणारा प्रकार म्हणजे सर्वत्र उजळलेले दिवे. गावभर सर्व घराघरांमध्ये पणत्या त्यांचा तो पिवळसर उष्ण प्रकाश, अंधार उळजवून टाकणारा… मनालाही उजळवून टाकतो. दिवाळीच्या दिवसात घरभर, अंगणात, फाटकापाशी, पायऱयांवर सर्वत्र दिवे लावायला आणि तो प्रकाश डोळ्यांत, मनात भरून घ्यायला खूप आनंद होतो. तोच प्रकाश मग माझ्या दिवाळीच्या चित्रांमध्येही उजळत राहतो. आता किल्ला, त्यासाठी माती, दगड गोळा करणे फटाके उडवणे हे मागं पडून गेलंय. आता माझ्यासाठी दिवाळीचे दिवस म्हणजे अंधार उजळवून टाकणारे दिवे, मनाला नवी ऊर्मी देणारे दिवे, आनंद, उत्साह पसरवणारा प्रकाशाचा सण…!
(लेखक प्रसिद्ध चित्रकार आहेत.)

[email protected]