ग्रीक पुराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> अरविंद दोडे

प्राचीन साहित्य आणि संस्कृतीचे सज्जड पुरावे हिंदुस्थानात आणि ग्रीस देशात पुष्कळ आहेत. महाकाव्यांचा वारसा या देशांना लाभला असून पुराणकथांमधील ‘जादूई वास्तवता’ (समीक्षेच्या भाषेत मॅजिकल रिऑलिटी) अद्भुतरम्य आणि चिरंतन आहे. तत्त्वज्ञान इतिहास, मानवी स्वभावांचे विविध पैलू, नीती, धर्मकल्पना, राजकारण, निष्ठा, भक्ती या आणि अशा घटकांमुळे महाकाव्यांची समृद्धी सहज नजरेत भरते. प्रस्तुत ‘ग्रीकपुराणा’त ही सारी वैशिष्टय़े अधोरेखित केली आहेत. यातील निवडक कथा वाचताना हिंदुस्थानी पुराणाशी तुलनात्मक अभ्यास करून साम्यस्थळे लेखिकेने दाखविली आहेत.

ग्रीक देवदेवतांचा संक्षिप्त परिचय यातून होतो. शिवाय महाकाव्यांची ओळख हीसुद्धा मनोरंजक आहे. शोकात्मिकांची मौलिकता निर्विवाद सर्वमान्य आहे. त्यांच्या करुणरम्य कथा हा जगातल्या असंख्य प्रतिभावंतांच्या मूळ लेखनास प्रेरणादायी ठरल्या आहेत. जाणकारांनी ठाऊक असलेल्या ऑर्फियस, झ्युरा, हेरा, अथीना, पॅन्डोरा अशा पात्रांनी रसिकांना अंतर्मुख करणाऱ्या चित्रकृती आणि साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. महाकाव्याबाबत सांगायचे झाले तर इलियड, ओडिसी हे विश्वविख्यात असून त्यांची कथानके व त्यासंबंधी इतर संदर्भ फार महत्त्वपूर्ण आहेत.

ग्रीक शोकात्मिकांचेही महत्त्व कमी नाही. हे अभिजात साहित्याचे अमोल धन या ग्रंथात खुले करताना लेखिकेचा एकंदर शोधप्रवास तेवढाच दाद द्यावा असा आहे. शोकात्मिकेची रचनात्म कला ही इसवी सन पूर्व पाचव्या शतकातल्या अथेन्सच्या श्रेष्ठ लोकशाहीबरोबर जन्मली.
अरविंद दोडे