मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…

>>आशा कबरे-मटाले

राजकारणाने गाठलेली गलिच्छ पातळी भीतीपोटी निमूट पाहत बसलेले लोक आता लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पडताना थोडंफार बोलू लागले आहेत. यासंदर्भात समाजमाध्यमांवरील चित्र कसे दिसते, याचा मागोवा…

राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या एका छोटेखानी कार्पामातला अनुभव. डिसेंबर 2022 मधला. सामान्य व्यक्तींच्या आगळ्या कार्याचा गौरव एका स्वयंसेवी संस्थेकडून केला जात होता. कार्पामात तीन-चार जणांचा सन्मान केला गेला. त्यापैकी सत्काराबद्दल आभार मानण्यासाठी हे साठी-पासष्टीचे, लालबाग-परळ परिसरातले गृहस्थ बोलायला उभे राहिले. कार्पामाच्या अनुषंगाने स्वत:च्या कामाबद्दल बोलतानाच सहजच त्यांनी कधीकाळी शिवसेनेच्या एका नेत्यासोबत केलेल्या कामाचाही उल्लेख केला. आधीच्या काळातील या कामाबद्दल सांगताना, “आता शिवसेनेचं जे काही…” असं म्हणता म्हणता त्यांचा कंठ दाटून आला, डोळे डबडबले. माईक धरलेला हात थरथरला. कार्पामाच्या ठिकाणी शांतता पसरली. गहिवरून आल्याने ते गृहस्थ बोलणं थांबवून जागेवर जाऊन बसले. शिवसेना फुटल्याचं कमालीचं दु:ख मनात बाळगून असलेले ते एक `असली’ शिवसैनिक असावेत. असंच दु:ख किंवा संताप अनेकांच्या मनात कोंडलेला आहे.

महाराष्ट्राच्या मातीतले एक नव्हे, दोन पक्ष फोडले गेले. त्यांची मूळ नावं, चिन्हं फुटिरांना देण्यात आली. हे असं कसं? हा प्रश्न आबालवृद्धांना पडला, पण विचारणार कुठे आणि कसा? राजकारणात जे-जे काही समोर सुरू आहे, ते निमूट पाहत राहायचं अशी सवय सर्वसामान्यांना अंगवळणी पाडून घ्यावी लागली. खासगीत बोलायचं, पण जाहीरपणे चकार शब्दही काढायचा नाही हेच सगळीकडे दिसू लागलं. इतकी भीती, दहशत? सत्ताधाऱयांचे पाठीराखे मात्र बोलत. “कसा करेक्ट कार्पाम केला” असं म्हणत दात विचकणाऱया इमोजी टाकत, पण राजकारणाने गाठलेल्या गलिच्छ पातळीने अनेकांना अस्वस्थ वाटत होतं. ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी समोर समाजमाध्यमांचे मंच असूनही खासगी संभाषणाव्यतिरिक्त काही मार्ग दिसत नव्हता, पण जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या, ही कोंडलेली अस्वस्थता, संताप बाहेर पडू लागला. फेसबुकवर खिल्ली उडवणाऱया टिप्पण्यांच्या स्वरूपात का होईना, काही मोजके लोक व्यक्त होऊ लागले. पोस्टवर पसंतीचे `लाइक’ उमटवण्यास धजू लागले.

धीम्या गतीने होत असलेल्या या बदलाला बळ मिळाले ते `रवीशकुमार’ आणि `ध्रुव राठी’ या दोघांच्या यूट्यूबवरील व्हिडीओंच्या माध्यमांतून. टीव्हीवरील बातम्यांमधून एकतर्फी प्रचारकी माहिती मिळत असल्याचं जाणवून तिकडे पाठ फिरवलेले लोक जणू मनातल्या अस्वस्थतेवर दिलासा म्हणून यूट्यूबवरच्या या कंटेंटकडे वळले. विशेषत: गेल्या दोन महिन्यांत हे व्हिडीओ पाहणाऱयांची संख्या तुफान वाढली आणि प्रत्यक्षात निवडणुका सुरू होईतो, रवीशकुमार यांच्यासारखा स्वतंत्रपणे काम करणारा पत्रकार आपल्या यूट्यूब चॅनलवर चक्क एक कोटी `सबपाइबर्स’ (नोंदलेले प्रेक्षक) कमवून बसला! एकेकाळी `एनडीटीव्ही’तील वरिष्ठ पत्रकार व लोकप्रिय अँकर असलेल्या रवीशकुमार यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर `26 वर्षांच्या नोकरीनंतर आपण एनडीटीव्हीला `रामराम’ का ठोकला’ यासंदर्भातला व्हिडीओ टाकला होता. डिसेंबर 2022 ते मे 2024 या अवघ्या दीड वर्षात त्यांनी एक कोटीच्या वर सबपाइबर्स कमावले आहेत. `अदानी समूहा`ने एनडीटीव्ही ताब्यात घेतल्यावर रवीश यांनी राजीनामा दिला होता. आजच्या घडीला निरनिराळ्या नावांचे अनेक न्यूज चॅनल्स पत्रकारिता संपुष्टात आणणाऱया पद्धतीने काम करत आहेत असं म्हणत `तुम्ही यापुढे मला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकाल’ इतकीच घोषणा त्यांनी राजीनामा जाहीर करताना केली होती.

रवीशकुमार यांच्या खेरीज इतरही काही स्वतंत्र पत्रकारांनी याच काळात यूट्यूबच्या माध्यमातून राजकीय विश्लेषणात्मक कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि या साऱयालाच हळूहळू मोठा प्रेक्षक वर्ग लाभल्याचं दिसतं, पण रवीश कुमारांइतकाच, किंबहुना थोडा अधिकच बोलबाला झाला तो ध्रुव राठीचा. तसा तो गेली दहा वर्षं राजकीय विषयांवर बिनधास्त मतं व्यक्त करतोय, पण त्याचा `इज इंडिया बिकमिंग अ डिक्टेटरशिप’ हा व्हिडीओ वायरल झाला आणि लोक मोठ्या संख्येने त्याचं चॅनल सबपाइब करू लागले. 22 फेब्रुवारीला रीलीज केलेला हा व्हिडीओ एव्हाना 2 कोटी 51 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे व त्याला 23 लाख `लाइक्स’ मिळाल्या आहेत. गेल्याच महिन्यात ध्रुव राठीने मराठी, कन्नड, तेलुगू, तामीळ आणि बंगाली या भाषांमध्येही यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याचे लोकप्रिय व्हिडीओ या भाषांमध्ये ध्वनिमुद्रित (डब) को तिथे बघायला मिळत आहेत. `ध्रुव राठी मराठी’वरचा पहिला व्हिडीओ महिनाभरापेक्षा कमी काळात जवळपास सहा लाख लोकांनी पाहिला आहे. अर्थात ध्रुव राठीवर कठोर टीका करणारं कंटेंटही पाठोपाठच निर्माण होऊ लागले आणि तेही व्हायरल झाले. पण बहुधा त्यामुळे तो आणखी मोठ्या संख्येने लोकांना ठाऊक झाला असावा. एकट्या एप्रिल महिन्यात त्याचे सबपाइबर्स 25 लाखांनी वाढल्याचं सांगितलं जातं. आजच्या घडीला त्याचे सबपाइबर्स 1 कोटी 98 लाख इतके आहेत! या दोघांमुळे व त्यांच्यासारखा कंटेंट बनवणाऱया इतर यूट्यूबर्समुळे यंदाच्या निवडणुकीत `यूट्यूब` हा महत्त्वाचा घटक ठरला आहे.

समाज माध्यमांवरील लोकप्रियतेमार्फत लोकांवर प्रभाव टाकणाऱयांना (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना) हाताशी धरण्याचा प्रयत्न यंदाही झाला. एका पक्षाने त्यांचे मेळावेही घेतले. इतरही पक्षांनी यातील समविचारी मंडळींचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय परिस्थितीविषयी गंभीर संदेश देणाऱया संगीत दिग्दर्शकापासून विडंबनात्मक अथवा विनोदी रील्स बनवणाऱया सर्वसामान्य कंटेन्ट ािढएटर्सपर्यंत अनेक जण आज व्यक्त होताना दिसत आहेत. एक काळ असा होता की, निव्वळ एका बाजूलाच वाट्टेल त्या कमेंट्स, टिंगलटवाळी करण्याची भरपूर मोकळीक असल्यासारखं वातावरण होतं, पण जसजसे निवडणुकीचे टप्पे पार पडत गेले व `वाऱयाची दिशा बदलते आहे’ असा सूर लागू लागला, तसतसं सत्ताधाऱयांच्या समर्थकांना समोरूनही चोख प्रत्युत्तर मिळू लागलं.

निव्वळ आयटी सेलने पेरलेली मंडळीच नव्हे, तर खरोखरीची संतापलेली सर्वसामान्य जनताही थोड्याफार प्रमाणात का होईना, एव्हाना व्यक्त होऊ लागली आहे. अर्थात अनेकांनी आपला संताप, आपली भूमिका मतदान यंत्रातच व्यक्त करण्याचा निर्धारही जपलेला आहे. सारेच न घाबरता, मोकळेपणाने मतदानासाठी बाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने आपलं मत मतदान यंत्रात जमा करतील हीच अपेक्षा. तेच आपल्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी आवश्यक आहे.

[email protected]