लेख – कश्मीरमध्ये आता ‘आरसा’चा वाढता धोका

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन n [email protected]

दहा लाख रोहिंग्या म्यानमारमधून पळून इतर देशांमध्ये गेले. त्यांच्यापासून जगातल्या अनेक देशांना दहशतवादाचा मोठा धोका निर्माण होत आहे. अशा बातम्या समोर येत आहेत की, आराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (Arakan Rohingya Salvation Army) किंवा आरसा (ARSA) नावाचा एक दहशतवादी गट निर्माण करण्यात आला आहे. त्याचे पहिले नाव हरकाहल-याक्विन (Harakahal-Yaqin) असे होते. बांगलादेश, म्यानमार मीडियामध्ये आलेल्या माहितीप्रमाणे या दहशतवादी गटाने 2000 रोहिंग्यांना बांगलादेशमध्ये दहशतवादासाठी रिक्रूट केले आहे, ज्यामध्ये 150 महिला दहशतवादी आहेत. हिंदुस्थानमध्ये बांगलादेशी घुसखोरांबरोबर रोहिंग्या दहशतवाद्यांची घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान श्रीमती हसिना यांनी रोहिंग्या घुसखोरीला त्यांच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका असे म्हटले आहे. याशिवाय म्यानमारसुद्धा रोहिंग्यांना सुरक्षेकरिता मोठा धोका समजतो. मलेशिया, इंडोनेशिया आणि इतर इस्लामी देश रोहिंग्यांना आपल्या देशामध्ये येण्यास परवानगी देत नाहीत.
हे गट अफू, गांजा, चरस म्हणजे याबा (Yaba narcotics pill) नावाच्या नार्कोटिक्सचे मोठय़ा प्रमाणामध्ये स्मगलिंग करत आहेत. याबा अफूची गोळी साऊथईस्ट एशिया देशांमध्ये वापरली जाते. याशिवाय बांगलादेश, हिंदुस्थानमध्ये याबाचे स्मगलिंग केले जाते. इस्लामी जगतातील काही दहशतवादी गट, जसे लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्ला याबा सौदी अरेबियामध्ये घेऊन जात आहेत. ते विमान किंवा इतर प्रवासामध्ये आपल्या कपडय़ांमध्ये किंवा सामानामध्ये लपवले जाते. त्याचे स्मगलिंग अमेरिका खंडात, खास तर मेक्सिको आणि कोलंबियामध्ये केले जाते.

हिंदुस्थानमध्ये पकडलेल्या रोहिंग्यांकडून पुढील गंभीर बातम्या येत आहेत. त्यांना पद्धतशीरपणे बांगलादेशमधून हिंदुस्थानमध्ये आणले जाते, हिंदुस्थानची सरकारी कागदपत्रे म्हणजे रेशन, आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स दिल्यानंतर हिंदुस्थानातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जसे उन्नाव, अलिगढ, नोयडा, जम्मू या भागांमध्ये वसविले जाते. या बहुतेक रोहिंग्यांना हिंदुस्थानमध्ये जाण्याकरिता पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे क्राईम सिंडिकेटकडून दिली जातात. हिंदुस्थानातल्या काही संस्था त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात.

काही उग्रवादी संघटना त्यांना सरकारी डॉक्युमेंट बनवण्याकरिता मदत करतात. त्यांना एका शहरातून दुसऱया शहरात जाण्याकरिता मदत केली जाते. जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांना आसरा, काम दिले जाते व अनेक वस्त्यांमध्ये पद्धतशीरपणे वसविले जाते. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी केलेली घुसखोरी ही सैन्याच्या मिलिटरी इंटेलिजन्सने समोर आणलेली आहे. आरसाचे जैश-ए-मोहम्मदचा मुखिया मौलाना मसूद अझर याच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
असे मानले जाते की, हिंदुस्थानमध्ये 40 ते 50 हजार रोहिंग्या बेकायदेशीररीत्या राहत आहेत. ते हिंदुस्थान-म्यानमार बॉर्डर, हिंदुस्थान-बांगलादेश बॉर्डरमधून वेगवेगळ्या गटांमध्ये 2011 पासून पद्धतशीरपणे आत आले आहेत. कश्मीरमध्ये सहा ते दहा हजार रोहिंग्यांना वसविण्यात आले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहिंग्यांचे वेगवेगळे गट हे जम्मू-कश्मीरमध्ये कसे येऊ शकतात? ज्या वेळेस त्यांना पकडले जाते, त्या वेळेला काही मानवाधिकार गट लगेच कोर्टामध्ये त्यांचा बचाव करतात. या मानवाधिकार गटांचा प्रभाव इतका मोठा आहे की, त्यांनी या प्रकरणाला हिंदुस्थान सरकारच्या विरुद्ध जाऊन सुप्रीम कोर्टमध्येसुद्धा दाखल केले आहे. त्यांची मागणी पकडल्या गेलेल्या रोहिंग्यांना हिंदुस्थानच्या बाहेर पाठवू नये, त्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व द्यावे. जम्मू-कश्मीरमधले उग्रवादी गट, हुरियत कॉन्फरन्स, राजकीय पक्ष खुल्लमखुल्ला मदत करतात हे अनेक वेळ सिद्ध झाले आहे.
आरसाचे अल कायदाची शाखा अन्सार गझवत उल हिंद, जी कश्मीरमध्ये कार्यरत आहे, तिच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वी अल कायदाचा दहशतवादी झकीर मुसा याने हिंदुस्थान सरकारच्या विरुद्ध एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. जर हिंदुस्थान सरकारने रोहिंग्यांना परत पाठवले तर त्याची हिंदुस्थानला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. रोहिंग्यांचा अजून एक दहशतवादी गट हा कश्मीरमधल्या आक्का मूल मुजाहिदीन (Mul Mujahideen), लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांशी घनिष्ठ संबंध निर्माण करत आहे. असे पण रिपोर्ट आले आहेत की, पाकिस्तानी दहशतवादी रोहिंग्या दहशतवाद्यांबरोबर कश्मीरमध्ये घुसखोरी करत आहेत आणि एक रोहिंग्या अशा घुसखोरीमध्ये सीमेवर मारला गेला होता. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय सगळ्या दहशतवादी गटांना एकत्र करून कश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे.
अनेक रोहिंग्या म्यानमारमधून पळून इंडोनेशियामध्ये गेले, जिथे त्यांना आश्रय कॅम्पसमध्ये ठेवण्यात आले. दहशतवादी संस्था जमाते उल दावा-जिचे दुसरे नाव आहे लश्कर-ए-तोयबा-अशा कॅम्पसमध्ये पुष्कळच वर्षांपासून ऑक्टिव्ह आहेत. ते रोहिंग्यांना मदत करायच्या नावाखाली तिथे जेवण, कपडे, मेडिसिन वाटत असतात, परंतु त्यांचे मुख्य काम असते की, या शेकडो रोहिंग्यांमधून अशांना शोधायचे, जे चांगले दहशतवादी बनू शकतील. असे रिपोर्ट आहेत की, हाफिज सईदला रोहिंग्या दहशतवाद्यांची भरती करण्यामध्ये यश मिळाले आहे. म्हणूनच गुप्तहेर संघटनांना असे वाटते की, येणाऱया काळामध्ये रोहिंग्यांची दहशतवादामध्ये असलेली भागीदारी वाढू शकते. म्हणूनच हिंदुस्थानातील रोहिंग्यांवर लक्ष ठेवावे लागेल, जे दहशतवादी आहेत त्यांना पकडावे लागेल. अर्थातच हे सोपे नाही. कारण हिंदुस्थानातले अनेक मानवाधिकार गट त्यांना खुल्लमखुल्ला मदत करतात.

सगळेच रोहिंग्या दहशतवादी नाहीत, परंतु दहशतवाद्यांना इतर सामान्य नागरिकांमध्ये शोधणे सोपे नाही. शिवाय अनेक जिहादी आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी त्यांचे संबंध असल्यामुळे त्यांची हिंसा करण्याची क्षमता वाढत आहे.

रोहिंग्या दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे हिंदुस्थानातील समर्थक जास्त भयंकर आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या नावाखाली ते रोहिंग्यांना हिंदुस्थानात राहण्याकरिता मदत करतात, त्यांच्याकडून अनेक गैरकृत्ये करून घेतात. रोहिंग्या दहशतवाद्यांना पकडण्याशिवाय त्यांच्या समर्थकांना पकडणे महत्त्वाचे आहे. गुप्तहेर संस्थांनी अनेक वेळा हे सिद्ध केलेले आहेत की, बरेचसे रोहिंग्या हे दहशतवादी आणि इतर अनेक देशद्रोही कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. म्हणूनच त्यांना हिंदुस्थानमध्ये स्थान दिले जाऊ नये आणि त्यांना बांगलादेश आणि म्यानमारमध्ये परत पाठवले जावे.

आपली प्रतिक्रिया द्या