बटर चिकन… वरणफळं!

715

>> शेफ विष्णू मनोहर, [email protected]

अभिजित खांडेकर. टेसदार, झणझणीत ते सात्त्विक रुचकर. सर्वच पदार्थांचा आस्वाद अगदी मनापासून घेतो.

अभिजीत एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व. तसा तो वयाने माझ्यापेक्षा बराच लहान. पण आमची लवकरच मैत्री झाली. तो बरेच वेळा माझ्यापरोक्ष विष्णूजी की रसोईमध्ये जायचा आणि झुणका, पातळ भाजी, तव्यावरचं पिठलं या टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थांवर ताव मारायचा आणि मला फोन करून सांगायचा. जेव्हा मी त्याला लंच डेटबद्दल विचारलं तर तो म्हणाला इकडे-तिकडे कुठे न जाता आपण विष्णूजीकी रसोईमध्येच बसू आणि येतांना मी बायकोला आणलं तर चालेल का? लगेच त्याला म्हणालो, अरे वाह! ठरल्याप्रमाणे ते जोडीने तयार होऊन आले.

आल्यानंतर लगेच आम्ही जेवायला वाढून घेतले, त्यादिवशी नेमके त्याच्या आवडीचे पदार्थ जेवणात होते. कच्च्या वांग्याचं भरीत, हिरव्या मसाल्यातील तुरकाटी शेवभाजी, झुणका-भाकर, मसालेभात, मठ्ठा, भाजलेला खरडा हा जेवणातील मेनू. तिघेही जेवत असताना मला असं जाणवलं की दोघेही नवरा-बायको एकमेकांच्या खाण्याच्या आवडी-निवडी बऱयाच प्रमाणात जपतात.

जेवणात दोघांनाही शाकाहारी व मांसाहारी पदार्थ आवडतात. मध्येच अभिजीत मला म्हणाला, सर, मला आता जेऊ द्या आणि समोरील प्रश्नांची उत्तरे माझी बायको देईल. जेव्हा तिला विचारलं की तुला काय बनवायला आवडतं ? तर ती हसून म्हणाली की मला बनवायला तर आवडतंच, पण याहीपेक्षा जास्त मला अभिजीतकडून बनवून आयतं खायला आवडतं. तो नॉनव्हेज छान बनवितो. त्यातल्या त्यात ‘बटर चिकन’ अतिशय उत्तम, कारण बटर चिकन हा आमच्या दोघांचाही विक पॉईंट आहे. दुसरा पदार्थ आवडतो गावरान पद्धतीने तयार केलेले घरगुती चिकन . ती म्हणाली, पश्चिम महाराष्ट्रात एका छोटय़ा गावात आम्ही गेलो असताना एका आजींनी घरगुती पद्धतीचं चिकन आमच्यासाठी आणलं होतं. त्याची चव आम्ही दोघे कधीही विसरू शकत नाही.

शाकाहारी पदार्थांमध्ये काय आवडतं असं विचारल्यावर ती उठली, काऊंटरवर गेली आणि येताना विष्णूजी की रसोईचं मेनू कार्ड घेऊन आली. मला मेनू कार्ड दाखवत म्हणाली, मला हे सगळे पदार्थ इथलेच आवडतात. मी म्हटलं, अभिजीतसाठी तुला एखादा पदार्थ बनवायचा असला तर तू काय बनवशील तर ती हसून म्हणाली अभिजीतकरिता मी ‘वरणफळं’ बनवेन. त्याला वरणफळं प्रचंड आवडतात. अभिजीत माझ्यासाठी काँन्टीनेन्टल रेसीपिज बनवितो. त्यातला त्याने तयार केलेला ब्रुसेटा हा पदार्थ मला खूप आवडतो. ती हे सांगत असताना मी बघत होतो अभिजित मन लावून जेवत असतांना नुसतं स्माईल देत होता. मी जेव्हा त्याला म्हटलं स्वीट काय आणू तर त्याने सांगितलं तुम्ही गप्पा मारण्यात दंग असताना मी पुरणपोळी, श्रीखंड, आमरस हे सगळं मागवून ठेवलेलं आहे. तेवढय़ात त्याची बायको म्हणाली की, माझ्या हाताची मँगो कुल्फी अभिजीतला फार आवडते. नुकत्याच झालेल्या आंब्याच्या मौसमात माझ्या आणि कुल्फीच्या प्रेमापोटी डाएटचा विचार न करता त्याने कुल्फीवर खूप मारलेला आहे.तेवढय़ातच अभिजीतचं जेवण संपलं आणि तो उठून म्हणाला, आता चला खूप झालं आणि आमची लंच डेट संपली.

मँगो कुल्फी

साहित्य – हापूस आंबा, अर्धा लिटर दूध, 2 वाटय़ा मिल्क पावडर, अर्धी वाटी पिठीसाखर.

कृती – सर्व प्रथम दूधापासून तयार झालेले पनीर वेगळे काढा. ते थंड करून त्यात मिल्क पावडर, पिठी साखर घालून घट्ट मिश्रण बनवा. आंबा स्वच्छ धुवून सुरी घालून मधली कोय काढून टाका. नंतर यात तयार मिश्रण घालून वरून फॉईल पेपरने रॅप करून डीप फ्रीजमध्ये दीड ते दोन तास ठेवा. नंतर सर्व्ह करतेवेळी त्याच्या स्लाईस करून लगेचच लगेच सर्व्ह करा.

वरणफळं
साहित्यः 1 वाटी कणिक, अर्धी वाटी तुरीची डाळ, पाव वाटी कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हिंग, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 चमचे तेले, मीठ, साखर चवीनुसार, 5-6 सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा आमचूर पावडर.

कृतीः तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घ्या. एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, लसूण, हिंग, हळद, तिखट घालून तुरीच्या डाळीचे शिजलेले वरण घाला. थोडे जास्तीचे पाणी घालून वरण उकळून घ्या, चवीनुसार आमचुर, मीठ, साखर घाला. भिजवलेल्या कणकीच्या गोळ्याच्या पोळ्या लाटून त्याचे चौकोनी तुकडे हळुवार हाताने कापून अलगद वरणात सोडा. 8-10 मिनिटे वरणात उकळून साजूक तूप किंवा कच्च्या शेंगदाण्याच्या तेलाबरोबर खायला द्या.

बटर चिकन
साहित्यः 2 वाटय़ा बेसिक रेड ग्रेव्ही, 2 चमचे बटर, 2 चमचे फ्रेश क्रीम, 1 पूर्ण चिकन साफ केलेले, एक वाटी आंबट चक्का किंवा घट्ट दही, पाव चमचा हळद, 2 चमचे धणे-जिरे पावडर, 2 चमचे कसुरी मेथी, 4 चमचे आलं-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, एक ते दीड चमचा मैदा भाजलेला, चिमूटभर रेड ऑरेंज रंग.

कृतीः दह्यामध्ये धणे जिरे पावडर, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, रेडऑरेंज रंग, एक चमचा व्हिनेगर, भाजलेला मैदा इत्यादी घालून हे मिश्रण चिकनला आतून-बाहेरून चांगले चोळून दीड ते दोन तास झाकून ठेवावे. यानंतर चिकनला जर तंदूरमध्ये भाजायचे असेल तर एका सळीला ते लावून मंद आचेवर भाजून घ्यावे. मधे-मधे तेल लावावे. असे भाजलेले चिकन बाहेर काढून त्याचे मनाप्रमाणे तुकडे करून घ्यावेत. एका पातेल्यात दोन वाटय़ा ग्रेव्ही घालून त्यात बटर घालावे. थोडे पाणी घालून उकळावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवावे. असे तयार झालेले चिकन सर्व्ह करताना यावर फ्रेश क्रीम घालून बटर नानबरोबर सर्व्ह करावे.

आपली प्रतिक्रिया द्या