मुद्दा : दहशतवाद – परिणामकारक कृती हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist-attack-pulwama

>>  दादासाहेब येंधे

कश्मीरच्या पुलवामा जिह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. 40 हिंदुस्थानी जवान यामध्ये शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱया पाकिस्तानला ठेचून काढायला हवे अशा भावना व्यक्त होत आहेत. किती काळ सहन करायचे? असा प्रश्न प्रत्येक हिंदुस्थानवासी विचारत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकदा आपण युद्ध जाहीर करावे, त्यांना त्यांच्या देशात जाऊन मारावे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे; पण मुळात असे लगेच काही करण्याची आवश्यकता नसते. योग्य पद्धतीने आणि पूर्ण नियोजन करूनच कारवाई केली पाहिजे. ती करत असताना निरपराध सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसता कामा नये याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या सैनिकांवर हल्ले होत आहेत, दहशतवादी संघटना असे हल्ले वारंवार घडवून आणत आहेत. या संघटनांना कोणाची फूस आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दरवेळी सीमेपलीकडून घुसखोरी करून जवानांचे आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱयांना जशास तसे उत्तर योग्य तयारीनिशी देणे गरजेचे आहे. कारण एकाएकी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणे हा आततायीपणा ठरेल. कारण आजघडीला आपल्याकडे तेवढी ताकद नाही. त्यामुळे उरीवरील हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राइक केला होता तशा प्रकारे पाऊल उचलावे लागेल. हिंदुस्थानी लष्कर आणि केंद्र सरकार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन दहशतवाद्यांचा बीमोड नक्कीच करेल.

दहशतवादाचा बीमोड करणे हा दीर्घकालीन लढा आहे. जोपर्यंत पाकिस्तान आणि चीन ही दोन शत्रुराष्टे दहशतवादाला फूस देत आहेत, तोपर्यंत दहशतवाद सुरूच राहणार आहे. दहशतवादाचा सामना करताना तत्कालिक आणि दीर्घकालीन उपाय करावे लागतील. तत्कालिक कारवायांमध्ये तोफखाना, क्षेपणास्त्र, हवाई दल, सर्जिकल स्ट्राइक आणि शेवटचे हत्यार म्हणून पारंपरिक युद्ध तर दीर्घकालीन कारवाईमध्ये मुत्सद्देगिरीच्या जोरावर पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करायला भाग पाडावे लागेल, जेणेकरून पाकिस्तानची आर्थिक कोंडी होईल. प्रत्येक वेळी आपण हिंदुस्थानवर हल्ला केला नाही असे म्हणत पाकिस्तान सरकार मोकळे होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा बीमोड हे उद्दिष्ट समोर ठेवावे लागेल. त्याशिवाय कश्मीर खोऱयातील हिंसाचार थांबवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा दुष्प्रचार थांबवावा लागेल. कोणत्याही व्यासपीठावरून हिंदुस्थानविरोधी प्रचार खपवून घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका आपल्याला घ्यावी लागेल.

हिंदुस्थानात सध्या मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर होतो. त्यात 20 टक्के हिंदुस्थानातून तर उर्वरित हिंदुस्थानबाहेरून देशविरोधी प्रचार होत आहे. याला सर्वप्रथम आळा घालावा लागेल. आज हिंदुस्थानला सोशल मीडियाची नव्हे, तर सोशल मीडियाला हिंदुस्थानची गरज आहे. कारण त्यातच या कंपन्यांचा नफा गुंतलेला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱयातून हिंदुस्थानविरोधी प्रचार खपवून घेतला जाणार नाही हे सोशल मीडिया कंपन्यांना ठामपणे सांगावे लागेल. पुलवामामध्ये घडलेल्या घटनेनंतर हिंदुस्थानात ठिकठिकाणी मेणबत्त्या जाळून निषेध करण्यात आला; पण त्याचा दहशतवाद्यांवर काहीच परिणाम होणार नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. त्यापेक्षा सोशल मीडियावर प्रत्येकाने डोळे, कान उघडे ठेवून वावरले पाहिजे. जर आपल्याला हिंदुस्थानविरोधी काही दिसले तर पोलीस तथा संबंधित यंत्रणांना सजग करावयास प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. सोशल मीडिया वॉरियर बनून आपण देशासाठी खूप काही करू शकतो हे प्रत्येकाने इथे लक्षात घेतले पाहिजे.

यासोबतच ज्या तयारीने हिंदुस्थानी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला ते पाहता स्थानिक मदतीशिवाय तो करता येणे केवळ अशक्य आहे. एवढी प्रचंड स्फोटके मिळवणे, ती साठवून ठेवणे आणि संपूर्ण हल्ल्याची योजना आखणे आणि तडीला नेणे हे साधे काम नाही. कश्मिरी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे वाढलेले प्रमाण आणि त्यातून दहशतवादी तयार होणे हा हिंदुस्थानची सुरक्षितता आणि एकात्मतेपुढे मोठा धोका निर्माण होत आहे. त्याकरिता कश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहात आणून देशभक्ती शिकविणे गरजेचे आहे.