लिखाणापूर्वी वाचन आणि अनुभवविश्व समृद्ध करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र वालावलकर

गोव्यात फोंडा येथे श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे आयोजित 16 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची निवड झाली आहे. गोवा सरकारचे कला व संस्कृती संचालनालय तसेच राजीव गांधी कला मंदिर यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांच्याशी साधलेला संवाद –

:- गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली. पहिली प्रतिक्रिया.
– अर्थातच माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वी दिग्गजांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या पंक्तीमध्ये मला बसायला मिळणार याचा निश्चितच आनंद वाटतो. संमेलनात गोमंतकीय वाचक आणि साहित्यिक यांच्याशी संवाद साधायला मिळणार असून त्यातूनदेखील एक वेगळे विश्व जाणून घेण्याची संधी मला मिळणार आहे.

:- महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातदेखील दर्जेदार मराठी साहित्याची निर्मिती होते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय सुचवाल?
– महाराष्ट्राप्रमाणे गोव्याला महिला साहित्याची वैभवशाली परंपरा आहे. सोशल मीडिया अधिक सशक्त झाल्यामुळे देश किंवा विदेशात कोणीही दर्जेदार साहित्य निर्मिती केली तर दुर्लक्षित राहत नाही. महाबळेश्वर सैल यांच्यासारखे लेखक गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील नावारूपास आलेले आहेत. सोशल मीडियाचे व्यासपीठ मिळत असल्याने गोव्यातील साहित्यिक महाराष्ट्रातील साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवताना दिसत आहेत.

:- ई माध्यमांमुळे मुद्रित साहित्य धोक्यात येईल असे वाटते का?
– मुद्रित साहित्याला काही प्रमाणात ई माध्यमांमुळे आव्हान निर्माण झाले ही वस्तुस्थिती मान्य केली तरी मुद्रित साहित्याचे अस्तित्व कायम राहील यात शंका नाही. सध्याची तरुण पिढी ई माध्यमाच्या मार्फत आपली वाचनाची भूक भागवत असली तरी कागदी पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा अनुभव वेगळाच असतो. पुस्तकाचे पान बदलण्याचा, पानांचा वास घेण्याचा, मध्ये विश्राम घेऊन पुन्हा वाचन सुरू करणे हा समृद्ध करणारा अनुभव असतो. तो जिवंतपणा ई माध्यमांमध्ये जाणवण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीदेखील नवीन लेखकांनी ई माध्यम पूर्णपणे दुर्लक्षून चालणार नाही. जुन्या पिढ़ीने जाणीवपूर्वक नवीन पिढी पुस्तके वाचतील यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आजच्या घडीला तरी मुद्रित साहित्याला अस्तित्वासाठी झगडावे लागणार नाही असे म्हणता येईल. मात्र मासिकासारखे काही प्रकार काळाच्या ओघात मागे पडू लागले असून त्यांचे अस्तित्व फक्त दिवाळी अंकापुरते मर्यादित राहिले आहे. त्यामुळे वर्तमानाची भविष्याशी सांगड घालत यातून मार्ग काढावा लागेल.

:- तुम्ही कथा क्लबच्या माध्यमातून तरुणांना लेखनासाठी प्रोत्साहित करता. त्याबद्दल काय सांगाल?
– तरुण पिढीने साहित्यिक लिखाण करताना प्रथम भरपूर वाचन करून स्वतःचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याची गरज आहे. विविध प्रकारची पुस्तके वाचून त्यांची मांडणी, कथेचे सूत्र, रंजकता, शेवट या गोष्टी कशा मांडल्या गेल्या आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आम्ही 10 वर्षांपासून कथा क्लब चालवत आहोत. त्यातून नवीन साहित्यिक वळण घेऊ लागले आहेत. या क्लबमध्ये लिखित साहित्यावर चर्चा होते, सूचना येतात, नवीन गाभा, नवीन संकल्पना यावर मतं व्यक्त झाल्यामुळे लेखक किंवा लेखिकेला पुनर्लेखन करताना खूप फायदा होतो. या क्लबने अनेकांना नवी दृष्टी दिली, वेगळा आत्मविश्वास दिला. त्यातूनच राजश्री बर्वेसारखी तरुणी एकच कथा चार वेगळ्या पद्धतीने मांडू शकते आणि तिच्या चारही कथा नामवंत दिवाळी अंकात प्रसिद्ध होऊ शकल्या. नव्या पिढीने लिखाण सुरू करण्यापूर्वी वाचन करून स्वतः अनुभव घेतले तर निश्चित दर्जेदार साहित्य वाचकांना वाचायला मिळेल यात शंका नाही.
माधवी कुंटे, ज्येष्ठ साहित्यिका

[email protected]