मनतरंग – गुंता समज आणि गैरसमजांचा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

मानसिक आजार पूर्णपणे बरे होत नसतील तरी ते योग्य त्या मानसोपचारांनी नक्कीच आटोक्यात येतात. मानसोपचार हे चार-पाच दिवसांत होत नाहीत. आजाराचे स्वरूप, व्यक्तीचा कल आणि तिच्या कुटुंबाचा यात असलेला सहभाग आणि सहकार्य यातून यश येत असते. गरज असते ती डोळस राहण्याची.

आई! हा खरं तर आपल्या सगळय़ांसाठी जिव्हाळय़ाचा विषय. आपल्या सर्वांनाच आपली आई ही हवीहवीशी वाटते. तिच्यावर आपण भावनिकदृष्टय़ा अवलंबून असतो. आपला विश्वास असते आपली आई! आपल्या मनाचा हळवा कोपरा असते आपली आई! आपले अस्तित्व असते आपली आई!

शिवानी (नाव बदलले आहे) हीसुद्धा तिच्या आईच्या बाबतीत अशीच हळवी होती. तिचे तिच्या आईवर निरातिशय प्रेम होते. आई हे तिचे सर्वस्व होते. ती तिच्या आईसाठी काहीही करायला तयार असायची. कुठलंही काम करताना पहिला विचार ती आईचाच करायची. आईची मर्जी सांभाळायची, पण एक मात्र होतं… शिवानीच्या आईबद्दलच्या प्रेमात दडपणही होतं.
‘‘मी माझं लग्न होईपर्यंत माझे कपडेही स्वतःला आवडतील असे घेतलेले नाहीत. कायम आईचाच विचार केला. तिला आवडतील का? तिला चालतील का? तिच्या आवडीचा अंदाज घेऊनच खरेदी करत आले.’’ समुपदेशनाला आलेली शिवानी मोकळेपणाने बोलत होती.

शिवानी ही साधारण पस्तीशीला आलेली विवाहित स्त्र्ााr होती. ती तिच्या संसारात सुखी होती. कमावती होती. सधन अशा कुटुंबाची सून होती. तिला नवराही साजेसा असाच मिळाला होता. त्यामुळे स्वतःच्या संसारात तिचे मन रमले होते. ती बाकी सगळय़ा बाबतीत समाधानी होती, पण स्वतःच्या आईच्या बाबतीत नव्हती. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे आईवर प्रेम होते, पण कधीही दोघींचे भावबंध जुळलेच नाहीत. कारण तिच्या आईला ते जुळवूनच घ्यायचे नव्हते.

शिवानीची आई ही कायम स्वतःच्या मर्जीनुसार वागायची. स्वतःचे म्हणणेच खरे करायची. जर तिच्या म्हणण्याप्रमाणे आणि मनासारखे काही घडले नाही तर ती भरपूर चिडायची. रागाच्या भरात समोरच्याला नको-नको ते बोलायची. शिवानी तिच्या सतत जवळ असल्याने तिला आईच्या रागाचा अनुभव होता.

‘‘आई अशी का वागते हेही तुम्हाला सांगते,’’ असे सांगत शिवानीने सांगायला सुरुवात केली. तिच्या आईला खरं तर मानसिक आजार होता. हा असा आजार होता ज्यामध्ये तीचे स्वतःवर नियंत्रण राहात नसे. ही तिची अवस्था शिवानीच्या जन्माच्या आधीपासूनच होती आणि शिवानीच्या जन्मानंतर ती अजूनच वाढली. त्यामुळे छोटय़ा शिवानीवर तिचा राग, चिडचिड हे सर्व निघू लागले. त्यातून तिचा मोठा भाऊही सुटला नव्हता. तिच्या वडिलांसाठी ही परिस्थिती कठीण होती. त्यामुळे लहानग्या शिवानीचे अख्खे बालपण हे तिच्या आजी-आजोबांसमवेत गेले.

‘‘अजूनही मी जेव्हा-केव्हा माहेरी जाते तेव्हाही आई सुतकी चेहऱयानेच बसलेली मला दिसते. मला फार त्रास होतो. मलाही आईचे प्रेम मिळायला नको का? आई असूनही…’’ शिवानीला पुढे बोलवले नाही. तिच्या भावना तिच्या अश्रूंद्वारे व्यक्त होत होत्या. भावनांचा जोर ओसरल्यावर तिला जरा बरे वाटले असावे. स्वतःला सावरून, टेबलावरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावत तिने प्रश्न केला, ‘‘मी आता काय करू? मला आईला सुखी पाहायचेय आणि स्वतःलाही.’’

तसे पाहायला गेले तर शिवानीपेक्षाही तिच्या आईला योग्य त्या मानसोपचारांची गरज होती. त्यासंदर्भात तिला तसे सांगण्यात आले. ‘‘आमचे एक स्वामी आहेत. त्यांना आईला दाखवले असता त्यांनी सांगितले की तिला एका आत्म्याने झपाटले आहे,’’ असे बोलून ती लगेच थांबली आणि पटकन म्हणाली, ‘‘मी ऍक्चुअली तसे मानत नाही.’’ शिवानी आता पुरती गोंधळलेली होती. विज्ञान की अंधश्रद्धा या द्वंद्वामध्येच अडकली होती.

खेदाने हे नमूद करावेसे वाटते की, आजही काही गंभीर मानसिक आजारांबाबत समाजामध्ये गैरसमजांचा आणि अंधश्रद्धांचा पगडा आहे. हेच मानसिक आजार जेव्हा गंभीर स्वरूप धारण करतात तेव्हाही त्यांच्यावर उपचार सुरू होत नाहीत.
अंगात संचारणे, झपाटणे किंवा बाहेरची बाधा होणे हे सर्व मानसिक आजार आहेत. ज्याचे मूळ ‘दबलेल्या अथवा कोंडलेल्या भावना’ यात असते. जेव्हा व्यक्ती अतिसंवेदनशील असेल आणि सतत दबून राहिलेली असेल, तिच्या घरचे वातावरण जर का ताणतणावाचे असेल, तर तिच्या भावना उफाळून येताना असे स्वरूप धारण करू शकतात. अर्थात त्यासाठी त्या व्यक्तीची मेडिकल आणि फॅमिली हिस्ट्रीही समजून घेणे महत्त्वाचे असते. अशा केसेसमध्ये स्त्र्ायांची संख्या जास्त आढळली आहे. कारण त्या जास्तीत जास्त भावनिक कोंडमारा सहन करत असतात.

‘‘तुमचे बरोबर आहे मॅडम. कारण आमचे घराणे हे परंपरावादी आहे आणि त्यात मुलींवर जास्त बंधने आहेत, पण माझ्या बाबांनी कायम मला जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिले.’’ शिवानीला आता हळूहळू उलगडा होत होता.
शिवानीला समुपदेशन करताना सर्वप्रथम तिच्या आईबद्दलच्या असलेल्या अपेक्षांबाबत विचारण्यात आले आणि त्याचबरोबर तिला हेही समजवण्यात आले की, तिच्या आईला सर्वप्रथम उपचारांना सामोरे जाऊ देत. कारण ही महत्त्वाची पायरी होती. त्यानंतरच पुढच्या गोष्टी साध्य होणार होत्या. तिची आई तिच्याच विश्वात होती हे शिवानीवर ठसवले गेले. कारण त्यामुळेच शिवानी स्वतःच्या आईला ‘आईपणा’तून काढून तिला ‘एक व्यक्ती’ म्हणून पाहू शकणार होती. तिच्या आईबद्दलच्या अपेक्षा माफक ठेवू शकणार होती.

शिवानीच्या वडिलांशी आणि भावाशीही याबाबतीत संपर्क करण्यात आला आणि त्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. या पुढची पायरी होती ती चालू होणाऱया उपचारांबाबत विश्वास ठेवण्याची आणि संयमाची. कारण उपचारांदरम्यान बऱयाच वेळेस त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा धीर सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याही बाबतीत त्या सर्वांना या सर्व शक्यतांची कल्पना देण्यात आली.

मानसोपचार हे चार-पाच दिवसांत होत नाहीत. आजाराचे स्वरूप, व्यक्तीचा कल आणि तिच्या कुटुंबाचा यात असलेला सहभाग आणि सहकार्य यातून यश येत असते. गरज असते ती डोळस राहण्याची तसेच ‘हे आजार म्हणजे पूर्व जन्मीचे पाप नाही’ असा तार्किक विचार करण्याची. शेवटी हेही नमूद करावेसे वाटते की, जरी काही ‘मानसिक आजार पूर्णपणे बरे होत नसतील तरी ते योग्य त्या मानसोपचारांनी नक्कीच आटोक्यात येतात.’

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]