ठसा – मुकुल देव

>>दिलीप ठाकूर

मराठी असो, हिंदी असो अथवा अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपटसृष्टी असो, येथे एकतर चित्रपट अथवा चित्रपटसृष्टीतील लहानमोठय़ा सोहळ्यांतून आपले अस्तित्व कायमच दाखवून द्यावे लागते अथवा ते शक्य नसेल तर कारकीर्दीच्या पडत्या काळात एकाकीपण येऊ न देणे आवश्यक असते. मुकुल देव या अभिनेत्याची कारकीर्द सतत अडथळ्यांची राहिली आणि कालांतराने त्याला कामे मिळणे अवघड होत गेल्यावर त्याने मुंबई सोडून दिल्लीत राहायला सुरुवात केली. त्यात त्याच्या अतिशय लाडक्या आईचे निधन झाल्यावर त्याला बरेच एकाकीपण जाणवू लागले. अशा वेळेस व्यसनाधीन होण्याची शक्यता निर्माण होते. मुकुल देवच्या बाबतीत तेच झाल्याचे म्हटले जाते आणि मग वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्याचे निधन झाले. मुकुल देवचे दुर्दैव असे की, लग्न योग्य वयात केले, तो व शिल्पा देव संसारही सुखाचा करीत होते, त्यात मुलगीही झाली. तिचे नाव सिया ठेवले, पण त्यानंतर या पती पत्नीत सतत वादविवाद होऊ लागले. त्यातून त्यांचा घटस्पह्ट झाला. मुलीची गाठभेट होत राहिली तरी या साऱ्याचा त्याच्या कारकीर्दीचा फटका बसला. मुकुल देवचा जन्म 30 नोव्हेंबर 1970 रोजीचा. वडील दिल्लीत पोलीस निरीक्षक होते.

मुकुल देवला कारकीर्दीच्या सुरुवातीस चांगली संधी मिळाली होती. नव्वदच्या दशकात दिग्दर्शक महेश भट्ट मोठय़ाच प्रमाणावर नवीन चेहऱ्यांना संधी देत होते. आपल्या ‘दस्तक’ या चित्रपटात शरद कपूर व जगत्सुंदरी सुष्मिता सेनसोबत मुकुल देवला संधी मिळाली. चित्रपट फारसा यशस्वी न ठरल्याचा मुकुल देवला फटका बसला. सुष्मिता सेनची कारकीर्द मात्र सुरू राहिली. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘वजूद’मध्ये नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांच्यासोबत मुकुल देवला संधी मिळाली. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नाना पाटेकरसमोर तो आत्मविश्वासाने उभा राहिला, पण त्याचा कारकीर्दीला उपयोग झाला नाही. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनीही ‘कोहराम’मध्ये अमिताभ बच्चन व नाना पाटेकरसोबत त्याला संधी दिली, पण या चित्रपटाला रसिकांनी नाकारले. टिप्स निर्मित व पुंदन शहा दिग्दर्शित ‘क्या कहने’मध्ये प्रीती झिंटाचा नायक म्हणून मिळालेली संधी त्याने आपला लहरीपणा व अव्यावसायिकता यामुळे गमावली. तो चित्रपट सैफअली खानला मिळाला. चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी खूपच लवकर पसरतात आणि वाटचालीत अडथळे निर्माण होतात. मुकुल देव हा मुळात एक पायलट होता. त्याने कमर्शियल पायलटचे ट्रेनिंग घेतले होते. त्यापेक्षा मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचे त्याने ठरवले. अगदी सुरुवातीस 1996 मध्ये राष्ट्रीय दूरदर्शनवरील ‘मुमकीन’ मालिकेत काम केले. त्यानंतर त्याने ‘एक से बढकर एक’ हा कॉमेडी शो, ‘कहीं दिया जले कहीं जिया’ आणि ‘कहानी घर घर की’सह अनेक मालिकांमध्ये काम केले. तेथून हिंदी चित्रपटात पाऊल टाकले. ‘दस्तक’ चित्रपटात त्याने एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘यमला पगला दीवाना’, ‘जय हो’, ‘सन ऑफ सरदार’, ‘मेरे दो अनमोल रतन’ आणि ‘आर. राजकुमार’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ‘कुटुंब’, ‘भाभी’, ‘कुमकुम’ इत्यादी मालिकांतून भूमिका केल्या. मुकुल देवने पंजाबी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड भाषेतील चित्रपटांतही भूमिका केल्या, पण त्यातून तो केवळ कामात राहिला. विशेष उल्लेखनीय काम मिळत नव्हते. या प्रवासात विधू दारासिंग, दीपशिखा असे चांगले मित्र त्याला मिळाले हे त्याचे भाग्य. त्यांनी व अजय देवगण आदींनी मुकुल देवला कायमच फिटनेसचे महत्त्व सांगितले, पण त्यात तो सततच्या अडचणींतून लक्ष केंद्रित करू शकला नाही.

[email protected]