
>> दिलीप ठाकूर
काळ बदलला तशी मराठी चित्रपटसृष्टीसमोरची आव्हानेदेखील बदलली… मराठी चित्रपटाला मुंबईत हक्काचे चित्रपटगृह मिळत नाही हे दुखणे फारच जुने. अगदी दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ (1971) दादरमधील कोहिनूर चित्रपटगृहातून उतरवून विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने’ प्रदर्शित करण्याचा डाव शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी उधळून लावला आणि त्याचे वृत्त पहिल्याच पानावर प्रसिद्ध झाले तेव्हापासूनचे हे दुखणे आहे. एकपडदा अर्थात सिंगल पीन थिएटर्सच्या युगापासूनची ही कोंडी मल्टिप्लेक्स युगातही कायम राहावी हे आश्चर्याचे आहे.
जवळपास प्रत्येक मल्टीप्लेक्समध्ये प्रत्येकी चार ते पाच पीन असतात, त्यातील एक कायमच मराठी चित्रपटासाठीच असावा असे नियोजन केल्यास मराठी चित्रपट रसिक त्याच पीनच्या खेळाच्या वेळेनुसार जातील आणि तो पायंडा उपयुक्त ठरेल. पूर्वी मुंबईत मराठी चित्रपट पाहायचा तर गिरगावातील मॅजेस्टिक (ते सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात बंद झाले), सेन्ट्रल, लालबागचे भारतमाता, दादरचे प्लाझा व कोहिनूर (आताचे नक्षत्र), दादर पूर्वचे शारदा, चित्रा, चेंबूरचे शरद, गोरेगावचे टोपीवाला, पुणे शहरातील प्रभात, भानुविलास, विजय अशी हुकमी चित्रपटगृहे होती आणि तेथे मराठी चित्रपट पाहायला मिळतात असे हुकमी समीकरण होते. मल्टीप्लेक्स युगात खेळांची संख्या वाढवण्याच्या स्पर्धेत कुठेही कितीचाही खेळ मराठीला मिळतोय आणि अशा अडनिड्या वेळी मराठी चित्रपट पाहायला मोजकेच प्रेक्षक असतात. त्यापेक्षा महाराष्ट्रीयन वस्तीतील मल्टीप्लेक्समध्ये नेमकेच खेळ मराठीला हवेत, असा आग्रह ठेवला तर काही प्रश्न सुटतील.
मराठी माणूस मराठी चित्रपट पाहत नाहीत अशीही एक हुकमी ओरड असते. पण वर्षभरात निर्माण होत असलेल्या शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपटातील आवर्जून पाहावेत असे किती असतात? एकाच प्रकारचे चित्रपट हेही जुने दुखणे आहेच. तमाशापट, विनोदी चित्रपट, माहेर छाप सोशिक चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट यांची लाट सुरूच असते. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल काळात ओटीटीवर जगभरातील अनेक भाषांतील अनेक लहान-मोठ्या गोष्टींवरचे चित्रपट घरबसल्या पाहायला मिळत आहेत. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन आपल्याकडे प्रदर्शित होतोय. तशी भव्यता मराठीत दाखवायची तर मोठीच आर्थिक ताकद (अर्थात बजेट) हवी. यावर उपाय म्हणून चार-पाच निर्मात्यांनी एकत्र येऊन एकच मोठ्या कॅनव्हासवर चित्रपट निर्माण करावा अशी एक सूचना चर्चेत होती.
मराठी चित्रपटाने आपली मूळ जातकुळी व ओळख बाजूला ठेवून तामीळ अथवा मल्याळम चित्रपट संस्कृतीचा मार्ग का स्वीकारावा? ती नक्कल ठरेल. मराठी चित्रपटाची मोठी ताकद काय? तर आशयघन कथा हे पूर्वापार सत्य. असे कथाप्रधान मराठी चित्रपट अन्य भाषेत डब करून ते अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल. यात डबिंग, मार्केटिंग आणि प्रमोशनचा खर्च आहे. असाच एक महत्त्वाचा मुद्दा, मराठी चित्रपटाला अनुदान असावे की नसावे? की 1976 ते 1997 या कालावधीत असलेली करपरतीची योजना पुन्हा कार्यान्वित करावी असाही प्रश्न आहे. राज्य शासनाकडून हुकमी अनुदान मिळणारच आहे हे गृहीत धरून कमी खर्चाचा चित्रपट निर्माण करण्याची प्रवृती वाढली आहे. या माध्यमाची व व्यवसायाची माहिती नसणारे येथे चित्रपट निर्माण करतात आणि जर अनुदान समितीने असा चित्रपट अपात्र ठरवल्यावर पुन्हा ओरडा सुरु होतो की अन्याय झाला. अनुदान योजना बंद केल्यास चित्रपटांची संख्या आपोआपच कमी होईल (ती व्हायलाच हवी म्हणावे तर त्या संख्यावाढीत छोटे कलाकार, तंत्रज्ञ व कामगार यांचे हित आहे असे म्हटले जाते.) संख्या कमी झाल्यास अधिक सकस निर्मितीकडे जास्त लक्ष केंद्रित होत जाईल. जुनी करपरतीची योजना पुन्हा अंमलात आणणे बरेच क्लिष्ट आहे. त्या गुंतागुंतीपेक्षा ‘चित्रपट बनवा, फायद्या-तोट्याचं गणित तुम्हीच ठरवा’ असा व्यावसायिक बाणा हवा. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी चित्रपटाला चित्रीकरणासाठी अनेक सुविधा आहेतच. युरोप, अमेरिकेत वगैरे मराठी चित्रपटांचे अलीकडे सातत्याने चित्रीकरण होत असल्यानेच मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड आर्थिक सुबत्ता असून त्यांना सहाय्य व सहानुभूतीची फार गरज नाही असेही अधोरेखित होत आहे. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (2003) ऑस्करसाठी भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीने मोठ्याच प्रमाणावर कात टाकली. त्याची रसरशीत फळे आजही मिळताहेत. त्यानंतर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटांनीही तेथपर्यंत प्रगती केली, पण आपले चित्रपट नामांकनापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
आता वाटते की, मराठी चित्रपटाला प्रेक्षक हवेत की ऑस्कर यावर परिसंवाद व्हावा. कारण, मराठी चित्रपट अधिकाधिक प्रमाणात यशस्वी ठरला तर त्यात अधिकाधिक चांगले विषय येतील. संपूर्ण चित्रपटसृष्टीचा आत्मविश्वास वाढेल आणि मग निश्चितच ऑस्कर पुरस्कार प्राप्त होईल, असा चित्रपट मराठीच्या पडद्यावर येईल. यशस्वी चित्रपटाला ‘ओटीटी’वर चांगली किंमत मिळेल आणि मराठी चित्रपटाला चांगली गर्दी होते म्हणून मल्टीप्लेक्समध्येही खेळ वाढवून मिळतील. चित्रपटाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’ आहे तेच अनेक गोष्टींवरचे उत्तर आहे. मराठी चित्रपट त्याला अपवाद नाहीच.
( लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)





























































