मनतरंग – बी पॉझिटिव (???)

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

मन हे विचार आणि भावनांचा कारखाना आहे ज्यात दररोज अगणित विचार-भावनांचे उत्पादन होत असते. या विचार-भावनांचे जर योग्य त्या प्रकारे नियोजन केले गेले नाही तर या सर्वांची सरमिसळ होऊ शकते आणि त्याचा परिणाम मनावर तसेच शरीरावर होऊ शकतो.

मला आतापर्यंतच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये असंख्य वेळा एक प्रश्न विचारला गेला आहे, ‘आपण आपल्या मनाला कायम सकारात्मक कसे ठेवायचे?’ आणि याचे उत्तर हे माझ्या मते ‘नाही ठेवू शकत’ असेच आहे. आता सकारात्मकता याचा अर्थ तो नेमका काय, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

आपण बऱ्याच वेळा ‘सकारात्मक राहा’, ‘आनंदी राहा’ असे काहीसे शब्दप्रयोग आपल्यासाठी किंवा इतरांसाठीही करत असतो, पण हेही खरं की, पूर्ण वेळ आपण सकारात्मक राहिलो तर आपल्याला येणारी दैनंदिन जीवनातील आव्हाने कदाचित पेलता येणार नाहीत. यालाच मानसशास्त्रीय परिभाषेत ‘To²ic Positivity’ असे संबोधले जाते. याचा साधा सरळ अर्थ असा की, जेव्हा अशी सकारात्मकता आपल्यामध्ये येते तेव्हा आपण इतर भावनांकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ; समजा आपल्याला कोणाचा राग आला असेल तर तो व्यक्त करण्याऐवजी आपण ‘मला जणू काही वाटत नाही. मी बरा आहे’ असे इतरांना भासवणे आणि स्वतःला पटवणे. ही सकारात्मकता आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी मग मारक ठरते.
याउलट; सकारात्मक किंवा पॉझिटिव असणे म्हणजेच ‘कुठल्याही गोष्टीचा आहे तसा स्वीकार करणे’ असा आहे हे मी कायम समजत आले आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. आपण जेव्हा आपल्यापुढील गोष्ट किंवा परिस्थिती तिच्या गुणदोषांसकट स्वीकारत जातो तेव्हाच ती गोष्ट/परिस्थितीही हाताळायला सहज सोपी बनत जाते. म्हणजेच त्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्या किंवा आव्हाने जर का स्वीकारली, त्यांचा अनुभव घेतला तरच त्यावर काम करणे हे सोपे जाते.

बऱ्याचदा माझ्याकडे येणाऱ्या समस्यांमध्ये ‘भीती’, ‘चिंता’ आणि ‘अस्वस्थपणा’ या समस्यांचे प्रमाण जास्त आढळले आहे आणि या समस्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात आहेत. त्यांच्याशी याविषयी बोलताना मला जाणवलं की, त्यांना या सर्व समस्यांचा आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्याची तयारी नाहीये. त्यांना कायम ‘आपण पॉझिटिव नाही राहिलो तर दुबळे म्हणून गणले जाऊ की काय?’ या एका गोष्टीची असणारी काळजी हीच त्यांच्या मनात अस्वस्थता, चलबिचल निर्माण करते. हे अतिविचारांचे मूळ असू शकते.

सावनी (नाव बदलले आहे) ही दहावीची विद्यार्थिनी त्यापैकीच एक. ती कायम अभ्यासाच्या बाबतीत बिनधास्त असायची. अभ्यास खूपच कमी वेळ करायची. सुरुवातीला तिच्या पालकांना वाटलं सावनीला दहावीचं दडपण नाही ही चांगली गोष्ट आहे. सावनीही त्यांना तसंच भासवत राहिली, पण जसजशी परीक्षा जवळ आली तसतशी ती आजारी पडायला लागली. त्या दिवशी तिच्या शाळेत गणिताचा पेपर होता. सावनी शाळेत गेली खरी, पण तिला तिथे चक्कर आली आणि तिला घरी पाठवलं गेलं. डॉक्टरांकडे तपासणीसाठी तिला पाठवलं असता त्यांनी ‘ताण’ हे कारण तिच्या वारंवार आजारी पडण्याचं आणि चक्कर येण्याचं सांगितलं.

समुपदेशनास आलेल्या सावनीला जेव्हा याबद्दल विचारलं गेलं तेव्हा तिने हेच सांगितलं की, ती स्वतःला कुठल्याही बाबतीत कमकुवत बघू शकत नव्हती आणि तिच्या मित्रमैत्रिणींनाही हेच स्वतःबद्दल सांगत आली होती. त्यामुळे तिने तिच्या अभ्यासाच्या ताणाला आणि भीतीला बिनधास्तपणाच्या मुखवटय़ाआड बंदिस्त केलं होतं.

सावनी हे एक उदाहरण झालं. आपल्यालाही ‘सकारात्मक राहण्याचे’ सल्ले पदोपदी मिळत असतात. आपणही कायम सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत राहतो, पण या सगळय़ात आपल्याला स्वतःच्या मर्यादा लक्षात येत नाहीत. एखादा अतीव दुःखाचा किंवा रागाचा प्रसंग असेल जिथे त्या-त्या भावना अपेक्षित असतील तर तिथे आनंदी राहून चालेल का? नाही चालणार. प्रसंगानुरूप भावना निर्माण आणि व्यक्त झाल्या तरच मानसिक स्वास्थ्य टिकून राहू शकेल. कारण त्यावेळी मनावरचे ओझे काही प्रमाणात हलके होते. आपल्या रडण्याचे उदाहरण आपण घेऊ. जेव्हा आपण आपल्याला दुःख झाल्यावर रडतो तेव्हा रडल्यावर आपल्याला हलके वाटते. का? कारण, तेव्हा आपण आपली भावना (दुःख किंवा आघात) स्वीकारलेली असते आणि ती आहे तशी व्यक्त केलेली असते. ज्या व्यक्ती भावनाप्रधान असतात त्या जास्तीत जास्त मोकळय़ा असतात. ज्या व्यक्ती आपली भावनाप्रधानता लपवून ठेवून त्यावर कठोरतेचा मुखवटा पांघरतात त्या व्यक्तींना तणाव जास्त येऊ शकतो.
शेवटी मन हे विचार आणि भावनांचा कारखाना आहे ज्यात दररोज अगणित विचार-भावनांचे उत्पादन होत असते. या विचार-भावनांचे जर योग्य त्या प्रकारे नियोजन केले गेले नाही तर या सर्वांची सरमिसळ होऊ शकते आणि त्याचा परिणाम मनावर तसेच शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच काही गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. काही गोष्टी मनाला समजावून दिल्या गेल्या पाहिजेत. जशा की,

– जाणीव- आपल्यामध्ये जागृत होणारे विचार आणि भावना
– स्रोत – विचार आणि भावनांचे मूळ कशात आहे?
– स्वीकार – विचार आणि भावना आहेत तशा पाहणे

‘मॅडम, मग मी काय सतत नकारात्मक विचार करू का? मग मला अपयश नाही का येणार?’ सावनीने एकदा हा प्रश्न केला. तिच्या प्रश्नाचे हेच उत्तर होते की, जसे तिचे कायम सकारात्मक राहणे हे मानसिक स्वास्थ्याला चांगले नव्हते तसेच तिचे कायम नकारात्मक राहणेही नव्हते, मात्र यावर तोडगा होता तो सुवर्णमध्याचा.
म्हणजेच, तिला तिच्या भावना ओळखण्यास सांगण्यात आले आणि त्याचबरोबर त्या कुठल्या विचारांपासून तयार होतात हेही सांगण्यात आले. यासाठी तिला तिचेच उदाहरण देण्यात आले.
1. ‘बापरे! उद्या गणित…’ – यामध्ये सावनीची ‘भीती’ व्यक्त होत होती.
2. ‘मला गणिताचा पेपर चांगला जाईल ना?’ – यात सावनीची ‘काळजी’ व्यक्त होत होती.
3. ‘मला काही आठवलं नाही तर?’ – यात सावनीची ‘चिंता’ व्यक्त होत होती.
अशाप्रकारे सावनीला एकाच प्रसंगामधून किती वेगवेगळय़ा प्रकारचे विचार आणि भावना निर्माण होऊ शकतात हे सांगितले गेले. त्याहीपुढे तिला हेही पटवण्यात आले की, वरील सर्व भावना या सामान्य (Normal) आहेत. त्या मनात आल्या तरी गैर नाही. त्या येऊ शकतात आणि त्या आल्या तरी काही विचारांच्या मदतीने त्यांचा परिणाम कमी करू शकतो. जसे की ,

1. ‘गणिताचा पेपर मला कधी ना कधी सोडवावा लागणारच आहे’
2. ‘मी गणिताचा पेपर लक्षपूर्वक आणि प्रामाणिकपणे सोडवेन’
3. ‘मला सगळंच आठवणार नाही असं होणार नाही, पण समजा नाही काही आठवलं तर जेवढं आठवतंय तेवढं लिहीन’
सावनीला आता समजलं होतं. तिने समुपदेशनाच्या शेवटच्या सत्रात हेच सांगितलं की, ती आता स्वतःला ‘घ्स्जािम्t’ म्हणून स्वीकारणार होती. तेच तिच्यासाठी योग्य होतं आणि तिला मोकळं ठेवणार होतं.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]