
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
कुठलाही मानसिक आजार, विशेषतः स्किझोफ्रेनियासारखा आजार यावर समुपदेशन करताना रुग्णाबरोबरच त्याच्या घरच्यांचेही (रुग्णाची काळजी घेणारी मंडळी) समुपदेशन सर्वात महत्त्वाचे असते. कारण रुग्णाच्या सहवासात या व्यक्ती 24 तास असतात. त्यामुळे त्यांना घरातील सतत बिघडलेल्या वातावरणामुळे ताणतणाव आणि नैराश्य येऊ शकते. रुचीसारखी बरीच उदाहरणं आहेत, जी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना खरी गरज असते ती त्यांचं कोणीतरी ऐकून घेण्याची. कारण सतत या व्यक्ती नकारात्मक वातावरणात राहून अतिसंवेदनशील झालेल्या असतात. आपल्याच माणसांना मनोरुग्ण असलेले पाहून त्यांचा धीरही सुटलेला असतो.
रुची (नाव बदलले आहे) ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि चुणचुणीत अशी मुलगी होती. तिला स्वतःचं काहीतरी वेगळं करीअर करायचं होतं. एकदम हटके! म्हणून एमबीए करत असतानाच तिने स्वतःचा एक फूड जॉइंट सुरू केला होता. चांगला प्रतिसाद मिळत होता त्याला. या साऱ्याची सर्वेसर्वा तीच होती. तिच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचं मार्केटिंग, तो बनवणं आणि विकणं ही सगळी कामं ती स्वतः जातीनं करत होती. सर्व चांगलं चाललं होतं. तेवढ्यात अचानक तिच्या आयुष्यात उलथापालथ व्हायला सुरुवात झाली.
रुचीचा खास मित्र तिच्यापासून दूर जायला लागला होता. तिचे वडीलही तिच्याशी जरा जास्तच फटपून वागत होते. या सर्वाचा तिच्या अभ्यासावर परिणाम होत होताच, पण त्याहूनही जास्त म्हणजे तिचा व्यवसायही तोटय़ात जात होता. ‘‘मॅडम, मला आता कशाचा उत्साहच राहिला नाही. पूर्ण अंधार दिसतोय आयुष्यात. मी जगत नाहीये, तर एक-एक दिवस ढकलतेय. हल्ली मला भूक लागत नाही आणि झोप तर पारच उडाली आहे’’ रुचीने थोडासा पॉज घेतला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. ‘‘माझा एक खास मित्र आहे, ज्याच्याबरोबर मी लग्नाचाही विचार करतेय, पण माझ्या काही प्रॉब्लेम्समुळे आम्हाला एकमेकांबरोबर साधा वेळही घालवता येत नाही.’’
तिच्या बोलण्यातून घरी आई-बाबांमध्ये दुरावा आहे हे समजत होतं, पण तिच्या बोलण्यातून त्याचं कारण जे बाहेर आलं ते गंभीर स्वरूपाचं होतं. रुचीच्या आईला स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार होता. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये त्या रुग्णाला कानात आवाज ऐकू येणे, कोणीतरी दुसरं आपल्यावर लक्ष ठेवून आहे असे वाटणे, समोर काहीतरी दिसल्याचा भास होणे किंवा मग आपल्या वाईटावर सगळे जण उठले आहेत असा (गैर)समज असतो. या आजाराचे चार-पाच प्रकार आहेत.
रुचीच्या आईला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया हा आजार होता, ज्यात तिला सतत असं वाटायचं की, घरातील प्रत्येक जण तिला मारायचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच ती सतत संशयी असायची. जेवणही स्वतःचे स्वतः करून खायची. ‘‘मला खूप त्रास होतो मॅडम’’ रुची सांगत होती ‘‘एकतर ती कायम वैतागलेली असते. तिच्या जेवणात विष घातलंय असं समजून ती आमच्या सगळ्यांशी भांडत असते. बाबांना शिव्या देत असते. तिचा सायकिऑट्रिस्टवर, त्यांच्या गोळ्यांवर विश्वास नाही. ती औषधंही वेळेवर घेत नाहीये. काय करू? आईवर पूर्ण लक्ष ठेवावं लागतं. घरात माझा लहान भाऊ आहे. तोही आता त्याच्या रूममध्येच असतो. फक्त जेवायला बाहेर येतो. कॉलेजलाही जात नाही. माझे बाबाही ड्रिंक्स भरपूर घेतात आणि माझं म्हणाल तर मी कॉलेजला गेल्यापासून बराच वेळ बाहेर असायचे. घरी यावंसंही वाटत नसायचं. आता मला एकंदरीतच डिप्रेसिंग वाटायला लागलं आहे.’’
कुठलाही मानसिक आजार, विशेषतः स्किझोफ्रेनियासारखा आजार (जो अजूनपर्यंत तरी पूर्ण बरा न होता योग्य औषधोपचारांनी आटोक्यात येऊ शकतो) यावर समुपदेशन करताना रुग्णाबरोबरच त्याच्या घरच्यांचेही (रुग्णाची काळजी घेणारी मंडळी) समुपदेशन सर्वात महत्त्वाचे असते. कारण रुग्णाच्या सहवासात या व्यक्ती 24 तास असतात. त्यामुळे त्यांना घरातील सतत बिघडलेल्या वातावरणामुळे ताणतणाव आणि नैराश्य येऊ शकते.
रुचीसारखी बरीच उदाहरणं आहेत, जी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना खरी गरज असते ती त्यांचं कोणीतरी ऐकून घेण्याची. कारण सतत या व्यक्ती नकारात्मक वातावरणात राहून अतिसंवेदनशील झालेल्या असतात. आपल्याच माणसांना मनोरुग्ण असलेले पाहून त्यांचा धीरही सुटलेला असतो. या व्यक्ती मनाने कमकुवतही होतात (कधी कधी काही व्यक्ती वरवर इतरांना तसं दाखवतही नाहीत). अशा वेळी यांना गरज असते ती त्यांनाही कोणीतरी त्या आहेत तशा स्वीकारण्याची. तरच हळूहळू या व्यक्ती तग धरतात. शेवटी त्यांना त्यांच्या माणसासाठी खंबीर व्हावंच लागतं.
मनोरुग्णाची काळजी घेणाऱयांचे समुपदेशन कसे केले जाते? सर्वप्रथम समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञ रुग्णाला झालेल्या मानसिक आजाराची त्याच्या घरच्यांना देतात. तसेच त्यावरच्या औषधोपचार आणि समुपदेशनाचेही मार्गदर्शन तज्ञांद्वारे केले जाते.
त्याचप्रमाणे नियमित सत्रांद्वारे रुग्णाबरोबरच त्याच्या घरच्यांचीही चौकशी तज्ञ करतात. या सत्रांचा फायदा असा की, रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती मोकळेपणाने तिला रुग्णाची काळजी घेताना येणाऱया अडचणी किंवा तिला आलेला ताण याबाबत व्यक्त होते. बऱ्याचदा अशा व्यक्तींनाही मेडिटेशन, योग करण्याचा सल्ला किंवा गरज असल्यास काही औषधं तज्ञांकडून दिली जातात. काही वेळा अशा व्यक्तींचे समूह (Social/ Family Caregivers’ Groups) तयार केले जातात, ज्यामुळे आपण एकटे नाहीत ही भावना अशा व्यक्तींमध्ये तयार होते आणि एकमेकांमधल्या वैचारिक देवाणघेवाणीने रुग्णाला कसे सांभाळायचे असते याचे मार्गदर्शनही इतरांच्या उदाहरणातून मिळते. शेवटी याही व्यक्तींना कोणाला तरी गरज असलेल्याला सावरायचे असते.
रुचीचं पाहायला गेलं तर तिला वैयक्तिक मार्गदर्शनाचा फायदा होत होता. ती तिच्या आईकडे आता ‘माझी आई वाईट नाही, तिला मदतीची गरज आहे’ या दृष्टिकोनातून पाहू लागली होती. तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार तिने स्वतःच्या विचार आणि भावनांवर नियंत्रण मिळवले होते, ज्यामुळे तिला तिच्या आईच्या वागण्याचा बोलण्याचा त्रास कमी होत होता. तसेच ती तिच्या आईसाठी त्रयस्थ व्हायलाही शिकत होती. तिला आता तिच्या आईबरोबरच तिच्या भावाची आणि वडिलांचीही काळजी घ्यायची होती, शिवाय स्वतःच्याही आयुष्याचा तिला विचार करायचा होता. तिला तटस्थ व्हावंच लागणार होतं. तिला खंबीर व्हावंच लागणार होतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]





























































