सा रम्या नगरी – समृद्ध ती करवीरनगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>> डॉ. मंजिरी भालेराव

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले एक अतिशय महत्त्वाचे शहर म्हणून कोल्हापूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडामध्ये असलेल्या ‘करवीरमाहात्म्य’ या भागात या प्रदेशाचे महत्त्व सांगताना हे काशीपेक्षा पवित्र आणि नुसत्या दर्शनानेच हे पापांचा नाश करणारे आहे असे सांगितले आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक साधनांमधून वरचेवर या स्थानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कोल्लापूर, करवीर आणि आता कोल्हापूर नावांनी नगरीची प्रसिद्धी झालेली दिसते.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले एक अतिशय महत्त्वाचे शहर म्हणून कोल्हापूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. कोल्लासुराला देवीने ठार मारले म्हणून या प्रदेशाचे नाव कोल्लापूर आणि नंतर कोल्हापूर झाले अशी एक आख्यायिका या गावाच्या नावाबद्दल सांगितली जाते. याशिवाय कोल्ल म्हणजे खोल दरी असलेला प्रदेश. या प्रदेशाला कोल्लापूर (कोल्हापूर) हे नाव पडले असे अभ्यासकांचे मत आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी वस्ती होती असे पौराणिक साहित्यातून तसेच महाभारतातही उलेख सापडतात. तसेच पुरातत्त्वीय पुराव्यातूनही या ठिकाणच्या प्राचीन वस्तीचे पुरावे पुढे आलेले दिसतात.

अगदी पुराश्म युगापासून या परिसरात मानवी वस्ती होती याचे पुरावे पुरातत्त्वज्ञांना मिळाले आहेत. कोल्हापूर परिसरातील नद्यांचे जाळे या परिसराला अतिशय सुपीक करते. त्यामुळे या परिसरात शेती आणि तत्सम उद्योग हे फार प्राचीन काळापासून सुरू होते असे आपल्याला दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून आलेल्या समृद्धीने या प्रदेशाचा संबंध हिंदुस्थानातील तत्कालीन इतर व्यापारी केंद्रांशी आलेला दिसतो.

किनारपट्टीच्या प्रदेशातून सह्याद्री डोंगररांग पार करून जे घाटमार्ग दख्खनच्या पठारावर येतात तेव्हा त्यांच्या मार्गावरील मोठी गावे ही अतिशय प्राचीन काळापासून मोठी शहरे आणि व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आलेली दिसतात. कोल्हापूर हे शहरही त्यातीलच एक आहे. कोकणातून आंबा घाटातून देशावर आल्यावर हे मोठे नगर पाहायला मिळते.

अशा व्यापारी मार्गालगत अनेक बौद्ध लेणी काळाच्या ओघात तयार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. कोल्हापूर गावाच्या इतिहासात बौद्ध धर्मीय उपासक आणि स्थापत्य हे प्राचीन काळापासून होते हे असे आपल्या दिसून येते. याचे पुरावे कोल्हापुरात सापडलेल्या बौद्ध स्तूपामधून तसेच कोल्हापूरजवळ असलेल्या पोहाळे नावाच्या गावातील बौद्ध लेणीवरून पाहायला मिळतात. याशिवाय कोल्हापूरमध्ये बौद्ध धर्मीय मनुष्याच्या वैयक्तिक पूजेतील काही ब्राँझच्या वस्तू सापडल्या. ब्रह्मपुरी या परिसरात 27 ऑक्टोबर 1877 साली एका बंगल्याच्या आसपासची जमीन सपाट करण्याचे काम सुरू असताना जवळच असलेल्या आठ फूट मातीच्या ढिगाऱयातून अनेक विटा मिळायला सुरुवात झाली. नंतर एक जांभ्या दगडाची पेटी सापडली. तिच्या आत एक स्फटिकाचा पारदर्शक करंडक होता, पण काम करताना त्या करंडकाचे दोन तुकडे झाले आणि आणि आतमध्ये जे काही होते तेही सांडले. दगडी पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूवर काही ब्राह्मी लिपीतील अक्षरे कोरली होती. पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी त्या लेखाचे पुढीलप्रमाणे वाचन केले, ‘ब्रह्मसदानंधमगुतेनकारितं’ म्हणजे ‘ब्रह्म याने दिलेले दान. धर्मगुप्त याने (पेटी) तयार केली’. या लेखाच्या अक्षरवटिकेवरून त्याचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व पहिले शतक असावा असे वाटते. स्तूपाच्या आसपास भिक्षूंना राहण्यासाठी विहार आणि इतर इमारतींचे अवशेषही असावेत असा अंदाज सुरुवातीच्या अभ्यासकांनी व्यक्त केला. त्याला पुष्टी देणारी घटना लगेच काही दिवसांनी म्हणजे 22 नोव्हेंबर 1877 या रोजी घडली. पंचगंगा नदीवर पुलाचे काम चालू असताना जमिनीपासून खाली सहा फूट खोदकाम झाले असताना एक तांब्याचे भांडे सापडले. त्यात काही शिशाची आणि तांब्याची नाणी, निरनिराळ्या आकाराची धातूंची पात्रं आणि वस्तू, काही सोन्याचे मणी आणि दागिने इत्यादी गोष्टी सापडल्या.
याशिवाय आज पोहाळे नावाने प्रसिद्ध असलेल्या स्थानिक लोक ज्याला ‘पांडवकालीन गुंफा’ असे म्हणतात त्या साधारणपणे इसवी सनाच्या दुसऱया शतकात कोरल्या गेलेल्या बौद्ध लेणीसुद्धा या परिसरातील बौद्ध धर्माच्या प्रभावाची साक्ष देतात. या लेणीसमूहात एक चैत्यगृह आणि चार विहार आहेत. ज्या खडकात या लेणी कोरल्या आहेत तो अतिशय ठिसूळ आहे. त्यामध्ये अनेक भेगा असून त्यातून बरेच झरेही वाहतात. त्यामुळे भिंत, खांब यांच्यामध्ये अजून भेगा तयार होऊन त्यांची पडझड झालेली दिसते. इथल्या विहारात 18 खोल्या आहेत. तिन्ही बाजूंना दगडी बाक कोरलेले आहेत. त्यावर 14 स्तंभ कोरलेले दिसतात. मध्यभागी नेहमीप्रमाणे मोकळा चौक आहे. अशा प्रकारची दगडी बाकांवर खांब असण्याची रचना महाराष्ट्रात इतर कुठेही आढळत नाही. या विहाराच्या पुढे एक व्हरांडा होता आणि त्यात सहा स्तंभ होते, पण सध्याच्या पडझडीमुळे त्याचे मूळ रूप तसेच त्यावरील नक्षीकाम कसे होते हे सांगणे अवघड आहे. बौद्ध कलेच्या सुरुवातीच्या काळात या गुंफा कोरल्यामुळे त्यामध्ये गौतम बुद्धाचे मानवी रूपात अंकन दिसत नाही.
साधारण इसवी सनपूर्व दुसऱया शतकापासून ते इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत कोल्हापूर हे फार मोठे व्यापारी केंद्र झाले असावे असे दिसते. सातवाहनांच्या काळात महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारात कोल्हापूरचा नक्कीच समावेश होता. सातवाहन, कुर, आनंद या राजघराण्यांच्या काळात हे शहर अतिशय समृद्ध होते असे विविध पुराव्यांवरून लक्षात येते. एवढेच नाही तर या शहरात अनेक परदेशी लोकांचे जाणे-येणे सुरू असावे, काहींचे तर वास्तव्य असावे असे कोल्हापुरात झालेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून लक्षात येते. त़्याची सविस्तर माहिती पुढील लेखात पाहू.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
n [email protected]