
>> डॉ. मंजिरी भालेराव
कृष्णा-कोयनेच्या संगमावर वसलेले कराड प्राचीन काळात करहाटक, करहाकट या नावाने प्रसिद्ध होते. उत्खननातून मिळालेले प्रागैतिहासिक काळातील अवशेष, बौद्ध शिलालेख, कोरीव लेणी ते समृद्ध स्थापत्य असा वैभवशाली वारसा या नगराला लाभला आहे.
आज स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले कराड किंवा कऱहाड या नावाने ओळखले जाणारे हे नगर प्राचीन काळापासून करहाटक किंवा करहाकट या नावाने प्रसिद्ध होते. चिपळूणहून निघणारा कुंभार्ली घाट संपल्यावर लागणारे मोठे नगर म्हणून या शहराचे महत्त्व सार्वकालिक आहे. व्यापारी मार्गावरचे महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे तिथे आपोआपच समृद्धी आली हे सांगायलाच नको. महाभारत, बौद्ध शिलालेख, मोठय़ा संख्येने असलेल्या कोरीव लेणी आणि उत्खननातून मिळालेले पुरावे यावरून प्राचीन काळी ते किती महत्त्वाचे नगर होते हे स्पष्ट होते. कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर असलेल्या या नगराला पाण्याची कधीच कमतरता पडली नाही.
या गावाच्या अस्तित्वाचे लिखित पुरावे महाभारतातील सभापर्वात पाहायला मिळतात. युधिष्ठराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी केलेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये सहदेवाने हे नगर जिंकले होते आणि तिथून कर वसूल केला होता. म्हणजे खुद्द महाभारतामध्ये या गावाला एक नगर असे संबोधले आहे. त्याबरोबरच हे शहर पाषंड (पाखंड) म्हणजे अवैदिकांचे होते असाही उल्लेख आहे. कऱहाड येथे असलेल्या या बौद्ध गुंफांच्या अस्तित्वावरून हा उल्लेख येथील बौद्ध धर्मीय लोकांच्या वस्तीचा असावा असे म्हणता येते (तसेच महाभारताच्या या भागाच्या लिखाणाचा काळ ठरवायला मदत होते). फार मोठय़ा संख्येने इथे बौद्ध गुंफांची निर्मिती झाली होती हे आजही स्पष्टपणे पाहता येते. त्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात इथे बौद्ध धर्मीयांची खूप मोठी वस्ती असावी असे वाटते. इ.स.पू. दुसऱया शतकातील मध्य प्रदेशातील भारहूत येथील शिलालेखातील करहाकट हे नाव कऱहाड येथून गेलेल्या एका बौद्ध धर्मीय व्यक्तीने दिलेले दान होते. हा कराडच्या नावाचा सर्वात प्राचीन अभिलेखीय पुरावा आहे.
1949 साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने कराडमध्ये पंतांचा कोट या परिसरात हे उत्खनन केले होते. त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. उत्खननातून मिळालेल्या पुराव्यातून या ठिकाणी प्रागैतिहासिक काळापासून मानवाने वस्ती केलेली होती असे दिसते. पुराश्म युगातील हत्यारे तसेच ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे अवशेषही पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इथे मिळाले आहेत. उत्खनन अहवालात इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील अवशेषांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
सातवाहनपूर्व आणि सातवाहनकालीन मानवी वसाहतीचे अवशेषही तिथे मोठय़ा प्रमाणावर मिळाले आहेत. त्याआधीच्या काळातील आहेत. नाणी तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तू, मातीची भांडी, घराच्या छताची कौले, दागिने बनवण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे मणी, स्फटिक, शंख, हस्तिदंत, हाडे यांच्यापासून बनवलेल्या वस्तूसुद्धा मिळाल्या आहेत. सातवाहनकालीन नाणीसुद्धा सापडली. इथे मिळालेल्या रोमन बनावटीच्या पदकावरून या शहराचा रोमशी व्यापारी संबंध होता हे लक्षात येते. सागरी मार्गाने युरोपमधून येणारा माल कोकणातून देशावर आणण्यासाठी जे विविध घाटमार्ग होते त्यामधला कुंभार्ली हा एक खूप महत्त्वाचा मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात होता हे यातून स्पष्ट होते. खरे तर पंतांचा कोट या ठिकाणी केलेले हे उत्खनन अतिशय मर्यादित स्वरूपाचे होते, परंतु या ठिकाणी खूप महत्त्वाचे अवशेष मिळाल्यामुळे कराड शहरातील मानवी वस्तीचा कालक्रम उजेडात आला.
महाराष्ट्रात व्यापारी मार्गांच्या बरोबरीने बौद्ध लेणींचा आढळ सगळीकडे दिसून येतो. कराड हे स्थळही त्याला अपवाद नाही. मोठय़ा संख्येने बौद्ध लेणी असलेल्या स्थळांमध्ये जुन्नर आणि कान्हेरीनंतर कराड या स्थळाचे नाव घेता येते. जवळ जवळ सत्तरपेक्षा जास्त बौद्ध गुंफा जखीणवाडी (यक्षिणी वाटिका), आगाशिव आणि चचेगाव या समूहांमध्ये पाहायला मिळतात. इतकेच नव्हे, तर जवळपासच्या तामकणे, येरफळ या गावांत काही बौद्ध गुंफा समूह आढळतात. काही वर्षांपूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संशोधन करीत असलेल्या प्रवीण पाटील या अभ्यासकाने कुसरुंड, धारेश्वर या ठिकाणी असलेल्या बौद्ध लेणी उजेडात आणल्या आहेत. या परिसरात अजूनही अनेक गावांमध्ये अशा बौद्ध लेणी सापडण्याची शक्यता आहे. साधारणपणे इसवीसनाच्या 1ल्या-2ऱया शतकात कोरलेल्या या लेणी थेरवादी परंपरेतील आहेत, पण काही वर्षांपूर्वी इथे मिळालेल्या तारा या बौद्ध देवतेच्या मूर्तीवरून पुढे बराच काळ बौद्ध धर्मीयांचा निवास या परिसरात होता हे लक्षात येते. राष्ट्रकूट काळातील एका ताम्रपटातसुद्धा एका भिक्षूला दान दिल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी फारसे शिलालेख आज दिसत नसले तरी पूर्वी ते असायची शक्यता नाकारता येत नाही. ठिसूळ खडकामुळे या लयन स्थापत्याची खूप हानी झालेली लक्षात येते. कुडा येथील बौद्ध लेण्यांतील एका लेखातसुद्धा या स्थानाचा उल्लेख आलेला दिसतो. या परिसरात काही आद्य ऐतिहासिक स्थळेसुद्धा आहेत. त्यापैकी चरेगाव हे एक महत्त्वाचे स्थळ. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. मंजिरी भालेराव आणि डॉ. अंबरीष खरे यांनी या गावातील प्राचीन वस्तीचे अवशेष उजेडात आणले होते.
बदामी चालुक्य यांच्या काळात कऱहाटक विषय असा या नगराचा उल्लेख येतो. चालुक्यांच्या काळातच कराड येथे सेंद्रक घराण्याच्या एका शाखेचे केंद्र होते असे दिसते. चालुक्य राजा विजयादित्य याची पत्नी महादेवी कराडची राजकन्या होती. ती बहुदा सेंद्रक राजा विष्णुराज याची कन्या असावी. इसवी सनाच्या आठव्या शतकात म्हणजे राष्ट्रकूट राजा इंद्र (3) याच्या काळात ‘करहाटक 4000 विषय’ अशी नोंद मिळते. आठव्या शतकातील दंतिदुर्ग याच्या ताम्रपट यामध्ये ‘कऱहाडकर निवासी ब्राह्मण नारायणभट’ याला दान दिल्याचा उल्लेख आहे. त्यावरून त्या काळामध्ये इथे विद्वान ब्राह्मण राहत होते असेही समजते. शिलाहारांच्या काळात कराडमध्ये विद्वान ऋग्वेदी ब्राह्मण राहत असल्याची नोंद मिळते. हीच परंपरा पुढेही कराडमधल्या वैदिक पाठशाळांमधून सुरू राहिली. कश्मिरी कवी पंडित बिल्हण याच्या ‘विक्रमांकदेवचरित्र’ या ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार करहाटपतीची पुत्री चंद्रलेखाचे स्वयंवर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्याबरोबर करहाटक येथे झाले. ती विक्रमादित्याची पट्टराणी होती, पण या राजाने करहाटक 4000 चा राज्यकारभार पाहणाऱया या मांडलिक जोगम कलचुरी याची कन्या सापलदेवी हिच्याबरोबरही विवाह केल्याची नोंद या ग्रंथात दिसते. यादवकाळामध्ये करहाटक 2000 हे देश विभागाचे मुख्यालय होते यावरून कराडचे क्षेत्र पूर्वीपेक्षा कमी झालेले दिसते.
खुद्द कराडमध्ये अनेक हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच काही इतर उल्लेखनीय स्थापत्यही दिसते. यामध्ये ‘नकटय़ा रावळाची विहीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विहिरीची नोंद घेणे आवश्यक आहे. अतिशय उत्तम बांधकाम असलेली ही विहीर नेमकी कोणी बांधली हे कळायला काही मार्ग नाही. पुढे इस्लामी काळातसुद्धा इथे मशिदींचे बांधकाम झाले. त्यामध्ये अनेक शिलालेखही आहेत. महाराष्ट्रातील अजूनही उभ्या असलेल्या जुन्या मशिदींमध्ये यांची नोंद करावी लागते. अगदी प्राचीन काळापासून वैभवशाली आयुष्य जगलेल्या या नगरीच्या इतिहासाची माहिती मात्र आजही अनेक लोकांना नाही. कालाय तस्मै नमः हेच खरे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)





























































