शिल्पवैभव – धनद यक्ष, मणिभद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

प्राचीन हिंदुस्थानी समाजजीवनात विविध प्रकारच्या लोकदैवतांच्या पूजा आणि उपासना यांना पुष्कळ महत्त्व होते. त्यामध्ये विविध प्रकारचे यक्ष, यक्षी, किन्नर (मानव आणि पक्षी यांचे मिश्र रूप), गंधर्व, वीर, मुंजा, प्राणी स्वरूपातील देवता अशा प्रकारच्या दैवतांचा समावेश होता. वैदिक, पौराणिक, पाली आणि प्राकृत साहित्यांमध्ये अशा प्रकारच्या अनेक यक्षांचे उल्लेख वारंवार सापडतात. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करणाऱ्या अनेक कथाही आढळतात. आज जरी अशा प्रकारची यक्षपूजा प्रत्यक्षपणे नगरांमध्ये होत नसली तरी अप्रत्यक्ष रीतीने त्याचे काही अवशेष उरूस, जत्रा या स्वरूपात पाहायला मिळतात. हिंदुस्थानातील सर्व भागांमध्ये अशा लोकदेवतेच्या पूजेची परंपरा अखंडपणे सुरू आहे. जैन आणि बौद्ध देवता संघातही अशा लोकदेवांना महत्त्वाचे स्थान मिळालेले दिसते. त्यांच्या साहित्यात आणि धर्मपरंपरांमध्ये याची उदाहरणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक गावांची ग्रामदैवते ही यक्षांचीच रूपे असल्याचेही आपणास जाणवते.

इ.स.च्या 6 व्या – 7व्या शतकातील संस्कृतातील बौद्ध ग्रंथ ‘महामायुरी’मध्ये तत्कालीन हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या स्थानांच्या रक्षक यक्षांची यादी दिलेली दिसते. पाली भाषेत यक्षाला ‘यक्ख’ आणि प्राकृत भाषेत ‘जक्ख’, नंतर मराठी ‘जाख’ (यक्ष) आणि ‘जखीण’ (यक्षिणी) अशी रूपे आलेली दिसतात. आजही यातील अनेक रूपे बोलीभाषांमध्ये वापरली जातात.

प्राचीन यक्ष समूहामध्ये अनेक महत्त्वाचे यक्ष होते. त्यांची लोकप्रियता प्रादेशिक स्वरूपात तर पाहायला मिळतेच, पण त्यापैकी काही संपूर्ण देशभर पुजले जात होते असेही लक्षात येते. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचा यक्ष म्हणजे मणिभद्र. या यक्षाचे उल्लेख महाभारत, वायुपुराण, पद्मपुराण, संयुत्तनिकाय, सूर्यप्रज्ञप्ती अशा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये येतात. ‘बृहत्कथामंजरी’ या ग्रंथाच्या संदर्भानुसार मणिभद्र हा कुबेराचा भाऊ होता (काही ग्रंथांमध्ये त्याला कुबेराचा मित्र तर काहींमध्ये कुबेराचा मुलगा असेही म्हटले आहे). त्याच्या पत्नीचे नाव मदनमंजरी होते. महाभारतात त्याचे नाव धनद (धन देणारा) असेही येते. यावरून त्याचे नेमके कार्य काय होते हे लक्षात येते. तो व्यापारी जनांचा आणि सार्थवाहांचा आराध्य देव होता. तो त्याच्या भक्तांना धन देतो, गुप्त धनाचे रक्षण करतो, व्यापाराची वृद्धी करतो अशी त्याची सर्वत्र ख्याती होती. त्यामुळे त्याचे भक्तही मोठ्या प्रमाणावर होते.

उत्तर प्रदेशातील मथुरेजवळ पारखम येथे इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील मणिभद्र यक्षाची एक महाकाय मूर्ती मिळाली आहे. साधारणपणे 8 फूट 8 इंच उंची असलेली ही मूर्ती मणिभद्र संप्रदायाच्या 8 भावांनी करून घेतली, कुनिकाचा शिष्य गोमिताका याने ती मूर्ती तयार केली होती अशा आशयाचा शिलालेख या मूर्तीवर कोरला आहे. सुमारे दोन हजार वर्षांहून जास्त काळ या मूर्तीची उपासना मथुरा या गावाजवळील पारखम या ठिकाणी होत होती. ही मूर्ती मथुरा येथील संग्रहालयात नेऊन ठेवल्यावरही या गावातील यक्षाच्या निमित्ताने भरणारी यात्रा थांबली नाही. आजही ती तिथे भरते. भक्तांच्या मनावर अशा प्रकारची जबरदस्त पकड ठेवणाऱ्या या मणिभद्र यक्षाची अशीच एक मोठ्या आकाराची मूर्ती ग्वाल्हेरजवळील पद्मावती म्हणजे आजचे पवाया या ठिकाणी मिळाली आहे. आज ती ग्वाल्हेर येथील गुजरी महल संग्रहालयात ठेवली आहे. दुर्दैवाने या मूर्तीचे डोके आज तुटले आहे. या मूर्तीवरील लेखानुसार शिवनंदी राजाच्या 4थ्या राज्य वर्षात व्यापाऱ्यांच्या पूजेसाठी ही मूर्ती तयार केली होती. या दोन्ही मूर्ती मागूनपुढून व्यवस्थित कोरल्या आहेत. अशा प्रकारे मणिभद्र यक्षाच्या अनेक मूर्ती उत्तर हिंदुस्थानात सापडल्या आहेत. त्याच्या हातात बऱ्याचदा धनाची पुरचुंडी दाखवलेली असते, डोक्यावर मोठे पागोटे असते, खांद्यावर शेल्यासारखे वस्त्र आणि कमरेला स्थानिक लोकांसारखे धोतर असा याचा वेश असतो.

बौद्ध आणि जैन धर्मीय लोकांनी, विशेषतः व्यापाऱ्यांनी त्याची उपासना केल्याचे साहित्यात पाहायला मिळते. आज त्याची फार मोठ्या प्रमाणावर जैन धर्मीय लोक उपासना करतात. त्याची अनेक ठाणी प्रसिद्ध आहेत. तो मणिभद्र वीरदेव या नावाने आजही पुजला जातो. तो वराहरूपात आणि ऐरावतावर आरूढ झालेल्या अवस्थेत जैन धर्मात आढळून येतो. उज्जैन, अग्लोड (मेहसाणा जिल्हा) आणि मगरवाडा (बनासकाठा जिल्हा) या ठिकाणी त्याची महत्त्वाची स्थाने आहेत. बावनवीर या नावाने ज्या लोकदेवांची पूजा होते, त्यातही मणिभद्र याचा समावेश होतो. बंगालमध्ये तो माणिकवीर या नावाने पूजला जातो.

मणिभद्र यक्षाचे धनद स्वरूप आज दिल्ली येथील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य इमारतीजवळसुद्धा पाहायला मिळते. सुप्रसिद्ध शिल्पकार राम किंकर बैज यांनी या इमारतीजवळ उभ्या करण्यासाठी दोन भव्य मूर्ती तयार केल्या, त्यामध्ये एक पुरुषाची आणि एक स्त्रीची होती. पुरुषाची मूर्ती ही पारखम येथील मणिभद्र यक्षाच्या मूर्तीसारखी आहे, तर स्त्रीची मूर्ती ही कोलकाता येथील संग्रहालयात ठेवलेल्या विदिशा येथील यक्षीसारखी आहे. सुमारे 2000हून जास्त वर्षे पूजनीय असणारा हा यक्ष आज या हिंदुस्थानच्या धनाच्या साठ्यापाशी उभा केल्यामुळे अजरामर झाला आहे हे नक्की.

[email protected]