
>> डॉ. मुकुंद कुळे
प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ असलेले सर एडवर्ड बेर्नेट टायलर यांनी केलेली एक व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या ‘प्रिमिटिव्ह कल्चर’ या ग्रंथात ‘संस्कृती’ या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात- ‘विशाल अशा मानववंशीय-भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ज्ञान, धर्मविश्वास, कला, नीती, कायदे, आचार, आणि मानवाने समाजाचा सदस्य म्हणून जे संस्कार व सवयी आत्मसात केलेल्या असतात, त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे संस्कृती ऊर्फ सभ्यता होय.’ संस्कृतीला असं शब्दांत पकडण्याचा प्रयत्न जगात अनेकांनी केलेला आहे. तरी संस्कृती बहुतेकांच्या हातून निसटलेलीच आहे. कारण संस्कृती जङ्व्याळ आहे. तरीही प्रसिद्ध भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मानवशास्त्र्ाज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी केलेली संस्कृतीची व्याख्या अधिक लक्षणीय आहे. संस्कृतीची व्याख्या करताना त्या म्हणतात- ‘मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. मनोमय संस्कृती वस्तुरूप निर्मितीमुळे दृढरूप व दृढमूल होते आणि मनोमय संस्कृतीचे ज्ञान अथवा कल्पना आल्याशिवाय द्रव्यरूप संस्कृतीचे कार्यच कळणार नाही. संस्कृती नेहमी परंपरागत व म्हणून दिक्काल निर्बंधित अशी असते. संस्कृती समाजाची असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते. पण कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचे स्वरूप पूर्णांशाने दाखवूच शकत नाही. संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असे एक निराळेच स्वतंत्र जीवन असते. व्यक्ती जन्माला आल्यापासून एका परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली असते व अव्यक्त, पण दृढ सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. व्यक्तीच्या जीवन विकासाच्या मर्यादा या दोन अंगानी निश्चित केलेल्या असतात.’
याच अर्थाने संस्कृती म्हणजे एक जीवनशैली आहे, जी संपूर्ण मानवी जीवनाच्या जाणिवेत आणि नेणिवेत भिनलेली असते. ही जीवनशैली शिकवण्याची गरज नसते. जन्माला येणारं मूल आपाततः ही जीवनशैली आत्मसात करत जाते. इथे ‘संस्कृती’ आणि ‘संस्कार’ या दोन शब्दांतील भेद जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजेत. आपल्याकडील ‘संस्कृती’ आणि ‘संस्कार’ हे दोन्ही शब्द संस्कृतमधील सम अधिक कृ या एकाच धातूपासून बनलेले आहेत. मात्र संस्कार हे मुद्दाम हेतुपुरस्सर केले जातात, तर संस्कृती कळत-नकळत अंगीकारली जाते. या अर्थाने जन्माला येणाऱया प्रत्येक मनुष्यप्राण्याला संस्कृती असते, ती जन्मतःच त्याला चिकटते. मात्र संस्कृती ही स्थळ-काळसापेक्ष नि समूहसापेक्ष असते. ती निरंतर प्रवाही आणि परिवर्तनशील असते. त्या अर्थाने ती नित्यनूतन असते, परंतु त्याच वेळी ती आदिमही असते. कारण संस्कृती कितीही बदलली तरी तिच्यातील आदिबंध कधीही नष्ट होत नाहीत. मग ती संस्कृती आदिवासींची आदिमसंस्कृती असो, अनागर लोकसंस्कृती असो किंवा आजची नागर म्हणजे शहरी संस्कृती असो! प्रत्यक्षात या तीनही संस्कृती एकाच वेळी, एकाच काळात आणि एकाच परिप्रेक्ष्यात कार्यरत असतात. आपल्याला फक्त उगाच वाटत असतं की, आपण आताच्या विद्यमान काळात जगतोय. परंतु जेव्हा संस्कृती-संस्कृती असं करत असतो, तेव्हा आपण केवळ आजच्या काळाची निर्मिती नसतो, आदिम काळापासून चालत आलेल्या सामाजिक-सांस्कृतिक संचिताची निर्मिती असतो.
आपण जी संस्कृती म्हणतो, त्या मानवी संस्कृतीचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. पहिला टप्पा- उपजीविकेसाठी आदिम मानव भटकत असल्याचा. दुसरा टप्पा- कृषिसंस्कृतीचा शोध लागून मानव एका जागी स्थिर झाल्याचा, आणि तिसरा टप्पा- आजच्या विज्ञानयुगाचा. पैकी पहिल्या टप्प्यात आदिम माणूस उपजीविकेसाठी सतत भटकत होता. टोळीने राहणं आणि पोट भरण्यासाठी शिकार करत जंगलं तुडवत हिंडणं हेच त्यांचं आयुष्य होतं. भूक, मग ती पोटाची असो वा शरीराची, त्यात फार फरक नव्हता. या दोन्ही गोष्टी या आदिम समाजांसाठी सहजप्रेरणा होत्या. एक प्रकारचा मुक्ताविष्कार त्यांच्या जीवनशैलीत होता. किंबहुना जगण्या-वागण्यातलं स्वातंत्र्य ही त्यांची संस्कृती होती.
मात्र शिकारीसाठी रानावनात भटकणाऱया या आदिम मानवसमूहांना एका टप्प्यावर शेतीचा शोध लागला आणि तो एका जागी स्थिर झाला. एकाच टापूत वस्ती करून राहू लागला. ही स्थिरावस्था आदिम मानवाला लाभली आणि तो अगदी सहज त्याच्या आधीच्या जीवनशैलीपासून तुटला. आता तो शेती करू लागला. शेतीसाठी आपापली माणसं जमा करू लागला. आपल्या कष्टाचं आपल्याकडेच राहावं, असं त्याला वाटू लागलं आणि त्यातून संपूर्ण मानवी जीवनाला व्यापणारी केवळ कृषिव्यवस्थाच नाही, तर कुटुंबव्यवस्था आणि लग्नसंस्थाही आकाराला आली. त्यातूनच जिथे जिथे वेगवेगळे समूह वस्ती करून राहिले, तिथे गावांची निर्मिती झाली. अर्थात हे सगळे मूळचे आदिवासीच असले, तरी एकाच ठिकाणी वस्ती करून राहिल्यामुळे त्यांच्या जगण्याला एकप्रकारे सुरक्षितता-स्वस्थता लाभली, त्यांचं भटकणं थांबलं. परिणामी त्यांचं जगणं, त्यांचे आचार-विचार, सण-उत्सव, नाच-गाणी यालाही एक वेगळं परिमाण लाभलं. आदिम अवस्थेतील माणूस कच्चं किंवा निव्वळ अग्नीत भाजलेलं मांस तसंच खायचा. परंतु एकाच ठिकाणी वस्ती केल्यावर आणि विविध मसाले टाकून जेवण रांधायला लागल्यावर त्याला पदार्थांची चव कळली. आधी थेट वाहत्या नदीच्या पाण्यावर तहान भागवली जायची. आता पाणी भरण्यासाठी मडकी तयार होऊ लागली. नाच-गाणं निसर्गासारखं उन्मुक्त होतं, ते काहीसं बंदिस्त झालं. नृत्य-पदन्यासाला एक गोलाई आली. सुबकता आली. आदिम अवस्थेत जे-जे अनघड-अवघड होतं, ते अनागर म्हणजेच ग्रामजीवनात काहीसं सुघड-सुविहित झालं. मूळच्या आदिवासींमधूनच कालांतराने ही एकाच जागी स्थिर झालेली वैशिष्टय़पूर्ण ग्रामसंस्कृती जन्माला आली. या ग्रामसंस्कृतीला आणि अनागरांच्या जीवनशैलीलाच आज एकप्रकारे ‘लोकसंस्कृती’ मानण्याची पद्धत आहे. हे ग्रामीण समूह थेट जंगलात राहत नसले, तरी त्यांचं जगणं निसर्गचक्रावरच अवलंबून असल्यामुळे ते निसर्गापासून फार लांब गेले नाहीत. त्यांच्या जीवनशैलीचा मुख्य कणा निसर्ग आणि कृषिसंस्कृती हाच राहिल्याने त्याआधारेच या ग्रामीण स्थिर समूहांची जगण्याची एक वेगळी लोकशैली घडत गेली. आज हीच अनागरसंस्कृती ‘लोकसंस्कृती’ म्हणून ओळखली जाते.
मात्र अनागरसंस्कृती म्हणजेच सरसकट लोकसंस्कृती असं नाही. परंपरेचं अधिष्ठान असलेली आणि वैशिष्टय़पूर्ण असलेली कुठलीही संस्कृती ही लोकसंस्कृती असते. म्हणजे अगदी आजच्या नागर काळात सुरू झालेल्या एखाद्या प्रथेला पुढे जाऊन लोकसंस्कृतीचं बिरुद चिकटू शकतं. उदाहरणार्थ, अलीकडे गेल्या आठ-दहा वर्षांत मार्गशीर्षातल्या गुरुवारांना महिलांमध्ये जी लोकप्रियता मिळालीय, तिचा पुढे लोकोत्सव म्हणून गौरव होऊ शकतो. तरीही अगदी वैदिक काळापासून अनागर संस्कृतीलाच ‘लोकसंस्कृती’ मानण्याचा समज आहे आणि तो रूढही आहे. कारण वैदिक काळातच वैदिक आणि वैदिकेतर असे भेद निर्माण झालेले होते. वैदिकेतरांना त्या काळी मुख्यतः ‘लोक’ या अभिधानाने सूचित केलं जात होतं. ‘वैदिक परंपरा’ ही एकप्रकारे अभिजनपरंपरा होती. तर ‘लोक परंपरा’ ही एकप्रकारे बहुजनांची परंपरा होती आणि हा फरक जीवनशैलीतील विशेषांमुळेच निर्माण झालेला होता. अभिजनांची कलासंस्कृती, आचार-विचार सारेच कालौघात उच्च, कुलीन आणि आदर्शवत मानले गेले. तर तुलनेने बहुजनांची संस्कृती ग्राम्य मानली गेली. कारण तोपर्यंत शहर आणि खेडी असे भेदही निर्माण झाले होते. ही बहुजनांची संस्कृती आपल्या पारंपरिक धारणांना चिकटून बसली. या पारंपरिक धारणा काय होत्या? तर जरी भटक्या आदिम अवस्थेतून हे समूह स्थिर अवस्थेत आले, तरी त्यांच्या जीवनशैली मागच्या धारणा आणि प्रेरणा फार बदललेल्या नाहीत. आजही ग्रामीण भागातले सण-उत्सव बहुतांशी जुन्याच पद्धतीने साजरे होतात. तर तत्कालीन अभिजनांची संस्कृती आज नागर वा शहरी संस्कृती झालेली आहे. शिक्षणामुळे-विज्ञानामुळे वेगवेगळ्या घटितांमागचा कार्यकारण भाव आकलल्यामुळे एकीकडे आम्ही मूळ आदिम-लोकसंस्कृतीचा हात सोडलेला आहे… अन् तरीही दुसरीकडे ‘आमची संस्कृती, आमची संस्कृती’ असा घोष सुरूच आहे. परंतु प्रत्यक्षात ते संस्कार आहेत आणि ते विशिष्ट हेतू मनात बाळगूनच केले जातात. ते संस्कृतीसारखे जन्मजात नसतात!
आपण अलीकडे सतत ‘ही आमची संस्कृती आहे, तिला कुणी नाव ठेवायचं नाही’ असा घोषा लावत असतो. पण ‘संस्कृती’ म्हणजे नेमपं काय? ‘संस्कृती’ म्हणून आपल्याला नेमपं काय अपेक्षित असतं? कारण संस्कृती म्हणजे एकच एक गोष्ट नव्हे, जी विशिष्ट कृतीने दाखवता येईल. संस्कृती ही संपूर्ण सजीव सृष्टीला व्यापून दशांगुळे वर उरलेली असते. संस्कृतीतली अनेक गुह्यं तर आपल्याला मरेपर्यंत आकलत नाहीत, अन् तरीही आपण सातत्याने संस्कृतीचा उद्घोष करत असतो. हा उद्घोष म्हणजे आपण संस्कृतीला चिमटीत पकडण्याचा केलेला प्रयत्न असतो आणि ती संस्कृती सतत आपल्या हातून निसटत असते. कारण संस्कृती तशी स्थिर कधीच नसते, ती कालप्रवाही असते. म्हणूनच संस्कृतीची व्याख्या करणं कठीण कर्म आहे आणि तरीही जगभरच्या तत्त्वज्ञांनी, मानवशास्त्र्ाज्ञांनी तसे प्रयत्न सातत्याने केले आहेत.


























































