
>> डॉ. मुकुंद कुळे
जग बदललं, शहरं बदलली, गावंही आता आपली जुनी ओळख पुसत चालली आहेत. नव्या युगाचे नवे वारे आता खेडय़ापाडय़ांतही पोहोचलेत. अगदी खाद्य संस्कृतीपासून ते पेहराव संस्कृतीपर्यंत ग्रामीण जनही आता जगाचं अनुकरण करत आहेत. मात्र नुकतीच माळेगावची जत्रा झाली अन् तिथला जत्रंचा थाटमाट पाहून मनात आलं- जग बदलतंय खरं. मात्र ग्रामीण भागात गावदेव-लोकदेवाच्या नावाने भरणाऱया यात्रा-जत्रांनी मात्र आपला पारंपरिक बाज आजही जसाच्या तसा जपला आहे.
चार-पाच दिवस चालणाऱ्या माळेगावची यात्रा-जत्रा म्हणजे आजही देवस्थान आणि गावकऱ्यांसाठी वर्षभराच्या आनंदाची साठवणच आहे. वर्षभरात जी मौजमजा करायची ती या यात्रेत अशी जणू खूणगाठच साऱयांनी मनात बांधलेली असते. त्यामुळेच यात्रेच्या चार दिवसांत जीवाची यात्रा केली जाते. नांदेड जिह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगावला भरणाऱया खंडोबाच्या यात्रेत तर याचा पुरेपूर अनुभव येतो. पाच दिवस माणसांचा नुसता महापूर लोटतो. जत्रेत थाटलेली दुकानं गर्दीत हरवली आहेत की, गर्दी दुकानात हरवली आहे याचाच थांग लागत नाही. यात्रेच्या पाच-सात दिवसांत मराठवाडय़ातील किमान आठ ते दहा लाख लोक यात्रेला हजेरी लावतात. ते साहजिकही आहे. माळेगावचा खंडोबा म्हणजे संपूर्ण मराठवाडय़ाचा लोकदेव. म्हणूनच संपूर्ण मराठवाडा या यात्रेत खंडोबासमोर नतमस्तक झाल्याचं दृश्य दरवर्षी पाहायला मिळतं.
खरं तर शिमगा झाला की, महाराष्ट्रभर गावोगावच्या यात्रा-जत्रांची धामधूम सुरू होते, पण दरवर्षी महाराष्ट्राच्या यात्रा-जत्रांना पहिली सलामी कोण देत असेल तर ती ही माळेगावची यात्रा. कारण दिवाळी पार पडली की, लगेच मराठवाडय़ातील जनतेला या यात्रेचे डोहाळे लागतात. जणू काही शेतातून नुकतंच घरात येऊन पडलेल्या पिकांतून आलेली सुबत्ताच या यात्रेला आवतन देत असावी. विशेष म्हणजे माळेगावची ही यात्रा केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कारण एवढी मोठी यात्रा हिंदुस्थानात अगदी मोजक्या ठिकाणी भरते. या यात्रेला तब्बल साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. माळेगावची ही यात्रा ब्रिटिश काळात तर सुरू होतीच, पण मराठवाडय़ावर निजामाची सत्ता होती तेव्हाही या यात्रेत खंड पडला नव्हता. कारण माळेगावच्या खंडोबावर इथल्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांची श्रद्धा होती आणि आहे.
माळेगावची यात्रा म्हणजे लोककलाकारांचं माहेरघरच. आराधी, भराडी, वाघे, गोंधळी, जोगते, भुते, वासुदेव, पिंगळे… असे विविध लोककलावंत या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळेच ज्यांना राहत्या घरी गोंधळ-जागरणासारखे पारंपरिक विधी करणं शक्य नसतं ते सर्व कुटुंबकबिल्यासह माळेगावच्या यात्रेला येतात आणि इथेच वार्षिक कुलधर्म-कुळाचारासारखे धार्मिक विधी पार पाडतात. तसंच या यात्रेला हजेरी लावणारे बहुतेक सर्वच लोककलावंत पारंपरिक पद्धतीने आपली कला पेश करत असल्यामुळे यात्रेला येणाऱ्या लोकांना त्यांचंही आकर्षण असतंच. शंकर केसराळे नावाच्या वाघ्याने तर आपल्या रंगीत झग्याने आणि लयदार नृत्याने कित्येक वर्षे जत्रेकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
माळेगावच्या या जत्रेच्या पुढे-मागेच मग पट्टणकोडोली, काळूबाई, भराडीदेवी… अशा वेगवेगळ्या देवतांच्या यात्रा-जत्रा भरत राहतात आणि गावकऱयांबरोबरच नोकरीधंद्यानिमित्त शहरांत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांची पावलंही गावाकडे वळतात. अगदी सालोसाल ग्रामीण भागात या यात्रा-जत्रा होतात आणि सालोसाल जत्रेसाठी गर्दी होते. एवढी वर्षे झाली तरी लोकरहाटीतलं जत्रेचं महत्त्व कमी झालेलं नाही. जत्रेचा जामानिमा नि प्रथा-परंपराही त्याच आहेत. फक्त पिढय़ा बदलल्यात, प्रत्येक नवी पिढी या जत्रेत सामील होऊन आपल्या मुळांनाच शोधू पाहत आहे. या जत्रांचं खूळ मनोरंजनाची भरपूर साधनं असलेल्या नागर संस्कृतीला कळणार नाही कदाचित, पण अनागर संस्कृतीत वाढलेल्या आबालवृद्धांना जत्रेचं मोठंच अप्रूप असतं. या यात्रा-जत्रा म्हणजे ग्रामीण जनतेसाठी जणू श्वासच असतो. कारण ग्रामीण व्यवस्थेच्या जगण्याची त्रिसूत्री या जत्रांमध्ये एकत्र आलेली असते. ही त्रिसूत्री म्हणजे गावाचं धर्मकारण, समाजकारण आणि अर्थकारण !
धर्मकारण, समाजकारण नि अर्थकारणाशिवाय गावरहाटी चालणं कठीण. या तीनही गोष्टी प्रत्येक यात्रे-जत्रेशी बांधलेल्या असतात. या तीनही गोष्टींमुळे गावाकडचा संपूर्ण समाज एकत्र बांधलेला राहतो. एकमेकांशी जोडलेला राहतो. लोकरहाटीत आजही धर्मकारण महत्त्वाचं मानलं जातं. धर्मकारण म्हणजे नित्याची देवपूजा आणि पारंपरिक प्रथेनुसार केलेलं धर्माचाराचं पालन. रोजच्या जगण्यात असं धर्माचे पालन गाव-शहरांकडे प्रत्येक जण करतचं असतो. मात्र ती नित्यनेमाची पूजाअर्चा सुरू असतानाच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं अशी त्यांची मनोमन इच्छा असते. ही त्यांची इच्छा जत्रेमुळेच पूर्ण होते. जत्रेच्या निमित्ताने ते कुलदेवतेच्या-ग्रामदेवतेच्या जत्रेला येतात आणि देवाचा वार्षिक धार्मिक विधी जत्रेच्या ठिकाणीच करून मोकळे होतात. परिणामी परंपरा पाळल्याचं समाधान त्यांच्या पदरात पडतं. धर्मकारणाप्रमाणेच जत्रेतील अर्थकारणही महत्त्वाचं असतं. ग्रामीण भागातील कुटुंबं वर्षाला आपल्याला लागणारं सारं सामान जत्रेतच खरेदी करतात. कारण गावच्या आठवडी बाजारात ज्या वस्तू मिळत नाहीत, त्या साऱया त्यांना देवाच्या जत्रेत एकाच ठिकाणी मिळतात. अगदी कपडय़ांपासून ते हंडा-कळशीपर्यंत आणि हातातल्या काठीपासून ते घोंगडीपर्यंत. माळेगावची खंडोबाची यात्रा तर याचं उत्तम उदाहरण आहे. या यात्रेत केवळ माणसांनाच नाही, तर घोडय़ांना-बैलांना सजवायचे अलंकारही मिळतात. त्याशिवाय तिथे घोडेबाजार, गाढव बाजार भरतो तो वेगळा. त्यामुळेच आठ-दहा दिवस चालणाऱया माळेगावच्या यात्रेत तब्बल 40-50 कोटींची उलाढाल होते. या यात्रांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनातील अर्थकारणाचा गाडा अवलंबून असतो. तेव्हा हरसाल भरणाऱया या यात्रा-जत्रा म्हणजे ग्रामीण अर्थकारणाला गती देणारा महत्त्वाचा घटक आहे.
धर्मकारण आणि अर्थकारणाप्रमाणेच प्रत्येक जत्रेला एक सामाजिक पार्श्वभूमीही असते नि ती नजरअंदाज करून चालत नाही. किंबहुना, वर्षानुवर्षे देवाच्या नावाने भरणाऱ्या या यात्रा-जत्रा आजवर सामाजिक अभिसरणाचा पेंद्र राहिलेल्या आहेत. या यात्रा-जत्रांच्या निमित्ताने माणसं एकत्र येतात, समाज एकत्र येतो आणि त्यांच्यात सामाजिक देवाण-घेवाणही होते. अगदी उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर नगर जिह्यातील मढीच्या कानिफनाथाच्या यात्रेचं देता येईल. ही यात्रा आजही प्रामुख्याने भटक्या किंवा फिरस्त्या समाजाची किंवा समूहाची यात्रा म्हणून ओळखली जाते. वैदू, मांग, पारधी यांसारखे भटके समाज या जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात. महाराष्ट्रात कुठेही भटकत असले तरी किमान या जत्रेला ते एकत्र येतात. आजवर ही जत्रा हेच त्यांचं लग्न ठरवण्याचं, लग्न मोडण्याचं, अपराध्याला शिक्षा करण्याचं व्यासपीठ राहिलं आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या सगळ्या सामाजिक गरजा ही जत्राच पूर्ण करते. केवळ या भटक्या समाजाच्याच नाही, तर एकूणच बहुजन समाजासाठीही या यात्रा-जत्रा सामाजिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या नि काही प्रमाणात आजही आहेत.
तेव्हा जत्रा छोटी असो वा मोठी, प्रत्येक जत्रेला धर्मकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचे विविध पैलू असतात. अर्थात त्याशिवाय या यात्रा-जत्रांना महत्त्वही नाही. या तीनही बाबी मनुष्याच्या थेट जगण्याशी निगडित असल्यामुळेच सालोसाल या यात्रा-जत्रांना गर्दी होतच आहे आणि होतच राहणार. शेवटी या यात्रा-जत्रा म्हणजे लोकरहाटीतील एक सांस्कृतिक घटना आहे. तेव्हा मी तर जातो जत्रंला…
[email protected]


























































