आरोग्य- प्रदूषण आणि फुप्फुसाचा कर्करोग

>> डॉ. सुहास आग्रे

पर्यावरणीय घटकांमुळे कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलं आहे. प्रदूषणामुळे फुप्फुसांच्या कर्करोगाला आमंत्रण दिलं जातं. फुप्फुसांच्या कर्करोगाने पीडित दरवर्षी हिंदुस्थानात एक ते सव्वा लाख नवीन रुग्ण आढळून येतात. त्यापैकी जवळपास 70 ते 80 टक्के रुग्णांचं निदान हे शेवटच्या टप्प्यात होतं. ही चिंताजनक बाब ठरत असून त्यामुळे मृत्युदरही वाढता आहे. नाकातून प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करत असल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातल्या अवयवांना कर्करोगाचा धोका जास्त असतो.

फुप्फुसांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारे प्रदूषणाचे प्रकार असे आहेत. बाहेरचे वायुप्रदूषण (outdoor air pollution) यात खालील गोष्टींचा समावेश होतो. जंगलातील आगीचे कण, गॅस आणि डिझेल इंजिन, कोळसा ऊर्जा प्रकल्प आणि जीवाश्म इंधन जाळणाऱया इतर स्रोतांमधून उत्सर्जित होणारा काळा कार्बन, मोटार वाहन एक्झॉस्टमधून येणारे नायट्रेटचे कण, कोळशावर चालणाऱया वीज प्रकल्पांद्वारे सल्फर डाय ऑक्साइडचे मोठय़ा प्रमाणात होणारे उत्सर्जन, ओझोन (याला स्मॉगदेखील म्हणतात), इंधन जळण्यामुळे निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइड.

आता घराच्या आत (indoor) होणारे हवा प्रदूषक पाहूयात. स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारे लाकूड, कोळसा आणि रॉकेल, एस्बेस्टोस, रेडॉन, लेड (शिसं), कार्बन मोनॉक्साईड, तंबाखूचा धूर. बाहेरील वायू प्रदूषणापासून स्वतःचं संरक्षण करणं नेहमीच शक्य नसतं. परंतु काही गोष्टींपासून जपण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

कर्करोगाची लक्षणं व निदान – एखाद्या व्यक्तीला तीन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ खोकला येत असेल आणि खोकल्यानंतर थुंकीवाटे रक्त येत असेल, छातीत दुखत असेल, दम लागत असेल तर ही फुप्फुसांच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अचानक वजन कमी होणं, भूक न लागणं हीदेखील लक्षणं असू शकतात. अशी लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. ‘लो-डोस सीटी स्कॅन’ या चाचणीमुळे फुप्फुसातले तांदळाच्या दाण्याइतकी बारीक असलेली विकृती दिसून येते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातला, शरीराच्या इतर भागात पसरण्याची कमी शक्यता असलेला, बरा होऊ शकणारा कर्करोग शोधून काढण्यात मदत होते. डॉक्टरांना रुग्णावर उपचार करण्याचे अनेक पर्याय अशावेळी उपलब्ध होतात आणि रुग्ण वाचण्याची शक्यताही वाढते.

फुप्फुसांच्या कर्करोगाचा उपचार कसा केला जातो?
फुप्फुसांचा कर्करोग किती पसरला आहे आणि तो कोणत्या प्रकारचा आहे यानुसार त्याचे उपचार बदलतात. फुप्फुसांचा कर्करोग प्रथम अवस्थेत आढळल्यास, शस्त्र्ाक्रिया हा एकमेव उपचार पर्याय असू शकतो. शेवटच्या टप्प्यातल्या फुप्फुसांच्या कर्करोगासाठी अनेकदा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीची आवश्यकता असते. तसंच यामध्ये आता टार्गेटेड व इम्युनोथेरपी अशा अद्ययावत उपचारपद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. इतर उपचारांपेक्षा या माध्यमातून कमी दुष्परिणाम होतात. इम्युनोथेरपी फक्त तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर काम करते. शरीरातल्या इतर पेशींना लक्ष्य करत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
ज्या दिवशी हवेची गुणवत्ता खराब असते त्या दिवशी घराबाहेर जाणं टाळा अथवा मर्यादित करा. ईपीएच्या AirNow वेबसाइटवर हवेच्या गुणवत्तेचा अंदाज आणि रिअल-टाइम हवा गुणवत्ता डेटा आढळतो. तसंच जेव्हा रहदारी कमी असते तेव्हा चाला, धावा किंवा दुचाकी चालवा. वर्दळीचे रस्ते टाळा. रहदारीच्या रस्त्यांवर गाडी चालवताना, कारचे व्हेंटिलेशन सेटिंग व्यवस्थित आहे का ते तपासा. अंगणात, परिसरात लाकूड किंवा कचरा जाळणं टाळा. शक्य असल्यास वायू प्रदूषणाची पातळी कमी असलेल्या भागात रहा.

(लेखक एशियन कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आहेत)