डॉ. विजया वाड << [email protected]>>
परीक्षा आल्या उंबऱयात. अभ्यास जोरदार झालाय ना…? की आपलं लकी पेन, लकी ड्रेस इ. लकी गोष्टींवर भिस्त ठेवून आहात…
‘‘आज काही खैर नाही.’’ परीक्षेला जाताना सर्वेशच्या पोटात खोल खड्डा पडला. दहावीची परीक्षा! आजोबा सेंटरपर्यंत पोहोचवायला यायचे. नेमके मांजर आडवे गेले. प्रतिक्षिप्त क्रियेने सर्वेश सात पावले मागे गेला. आजोबा मात्र तेथेच उभे, पण सर्वेशला त्यांनी अडविले नाही.‘‘आजोबा, पेपर चांगला जाईल ना हो?’’ ‘‘शंभर नाही, दोनशे टक्के तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि बुद्धी तल्लख आहे.’’‘‘पण ते मांजर…’’
‘‘बिचारं मांजर! त्याला कुठे ठाऊक आहे एसएससी म्हणजे काय? साधा प्राणी रे तो! रस्ता क्रॉस करताना एखाद्या वाहनाखाली येऊन चेगरलं तर बिचारं म्हणेल, हा सर्वेश मध्ये आला!’’ ‘‘खरंच हो आजोबा!’’मांजराच्या बाजूने त्याने विचारच केला नव्हता. ‘‘आजोबा, यू आर सिंपली ग्रेट.’’‘‘का रे बॉ?’’‘‘मी येडय़ासारखा सात पावलं मागं गेलो. मीच कुठे वाहनाखाली आलो असतो तर?’’‘‘आता कसं! अरे मांजर फांजर काही नसतं. सगळं बंडल!’’‘‘आजोबा, मग आजी माझी सारखी दृष्ट काढते, माझ्या छोटय़ा भावाला तीट लावते आणि म्हणत राहते…दृष्ट कुणाची, आल्या गेल्याची, शंभू तेल्याची… इडा पीडा टळो नि माझ्या सर्वूला दृष्ट न लागो… ते सगळं काय खोटं आजोबा?’’
‘‘सर्वेश तो आला गेला कोण? शंभू तेली कोण? ‘र’ला ‘ट’ जुळवा! मला सांग… अशी नजर लागत असती तर आलिया भट्टच्या आईला पोतं पोतं मोहऱया घेऊन मागं भटकावं लागलं असतं ना?’’‘‘खरंच हो आजोबा, मण मण मोहरी की हो! लाखो लोगों की नजरे!’’‘‘आता पटलं ना?’’‘‘पटलं नि पचलंसुद्धा!’’
‘‘तुझी बहीण रजनी! तिच्या डोक्यावर वेगळंच भूत!’’‘‘म्हणजे?’’
‘‘ लकचं भूत रे! परीक्षेला जाताना लक्की ड्रेस घालणार. घरी आली की तो धुणार, वाळवणार, आईला प्रेस करायला लावणार. दुसऱया दिवशी तोच ड्रेस. आठ दिवस भिजवा-धुवा-पिळा-वाळवा – इस्त्री…धुमशान नुसती.’’ ‘‘हा शुद्ध वेडेपणा आहे आजोबा, पेपर तर कधीचा छापतात. ते ती काय कपडे घालते यावर थोडंच अवलंबून आहे?’’‘‘तसंच मांजर आडवं जाण्याचं आहे बाळ सर्वेश.’’‘‘आजोबा, यू आर सिंपली ग्रेट.’’ ‘‘अरे, एक गंमत सांगतो. प्रॉमिस दे, कुणाला सांगणार नाहीस.’’
‘‘प्रॉमिस, आजोबा.’’
‘‘रजनी वेडाबाई… तिच्यासाठी नवरा शोधत होती…तेव्हा माझे मित्र लेले भविष्यकार आहेत, घरी आले होते. आपला शेजारचा शंतनू प्रेम करायचा रजनीवर, पण तिला सांगायचा धीर नव्हता. मग लेल्यांच्या मदतीने डाव साधला. ते घरी आले, म्हणाले, रजू तुझ्या नवऱयाचे नाव शंतनूच असणार नि तो तुला लंडनला नेणार…अशी गंमत!’’ रजनीताई खरेच शंतनूबरोबर लगीन करून लंडनला गेली होती की! मन की बात नि ज्योतिष की साथ! सर्वेश परीक्षेला बसला नि निबंधाचा विषय होता… लक – श्रद्धा की अंधश्रद्धा! सर्वेशने उसळीच मारली. ये हुई ना बात?






























































