लेख – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्राथमिक शिक्षण

>> डॉ. यशवंत तुकाराम सुरोशे

कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर निश्चितपणे प्रभाव पडणार आहे. यातून घडणाऱया स्थित्यंतराला आपण सामोरे गेलो पाहिजे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या नव्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणे, त्याबाबत साधक-बाधक चर्चा करून विवेकपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर आपण कशासाठी करत आहोत, याचे भान ठेवले तर कोणतेही तंत्रज्ञान हे विधायकच ठरेल. शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे आणि ती सातत्याने टिकविणे यासाठी अनेकजण विशिष्ट ध्येयाने काम करीत आहेत. या एकूणच व्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा कोणता परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानामुळे प्राथमिक शिक्षणावर नेमके कोणते परिणाम होतील याचा विचार करायला हवा. नव्या बदलाचा, शोधाचा प्रभाव सर्वाधिक शिक्षण क्षेत्रावर होत असतो. तसा तो व्हायलाही हवा, त्यासाठी शिक्षण क्षेत्राने तितकेच सजग आणि डोळस असायला हवे. प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना इथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण देणाऱया सरकारी, अनुदानित शाळा यांचा विचार आपण करतोय, अशा शाळांमध्ये असणारे तीन घटक महत्त्वाचे मानले तर ते विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासन असे सांगता येतील. या तिन्ही घटकांच्या योग्य समन्वयातून आजची शिक्षण व्यवस्था चालवली जात आहे. शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे आणि ती सातत्याने टिकविणे यासाठी अनेकजण विशिष्ट ध्येयाने काम करीत आहेत. या एकूणच व्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा कोणता परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी

संपूर्ण शिक्षण व्यवस्था ज्याच्यासाठी राबत असते तो विद्यार्थी अंत्यत महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हान असते. बऱयाच वेळा लक्षात येते की, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे मिळत नाहीत. कधी कधी मार्गदर्शक शिक्षकांनाही त्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतात किंवा आठवत नसतात. अन्य कारणेही असू शकतात. उदाहरणार्थ भूगोलाचा पाठ शिकवताना एखादा विद्यार्थी विचारतो, ‘सर, जगात एकूण किती देश आहेत?’ किंवा मध्य आशियातील देशाची नावे सांगा किंवा ‘येल’ हे विद्यापीठ कोणत्या देशात आहे? यासारख्या प्रश्नांची अचूक उत्तरे देताना अडचणी येतात. अशा वेळेस आपण ‘चॅटजीपीटी’चा वापर करून विद्यार्थ्यांना माहिती अचूकरीत्या देऊ शकतो. विद्यार्थी स्वतः वापरकर्ता झाला तर तो स्वतःच स्वतःचा अभ्यास करू शकेल. स्वतःच्या मनातील प्रश्रांची उत्तरे शोधू शकेल. अर्थात विद्यार्थ्यांला एका बटणांवर सर्व माहिती उपलब्ध झाली तर तो त्याच सवयीचा गुलाम होईल. तो अन्य मार्ग धुंडाळणार नाही. माहिती पडताळून पाहणार नाही. पुन्हा उरलेल्या वेळेचे काय करायचे हा प्रश्नही त्याला पडेल. विद्यार्थ्यांच्या ‘मोकळ्या वेळेला’ विधायक वळण लावण्याचे आव्हान नव्याने समोर येईल.

एकंदर विचार करता प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या वयानुरूप त्यांना खेळणे, बागडणे अशा कितीतरी गोष्टी करण्याचा आनंद मिळायला हवा. त्याचे बालपण त्याला साजरे करता यायला हवे. क्रीनचा कमीत कमी वापर या वयात करायला हवा. या स्तरावर मुलांनी मोजायला शिकावे, गिरवायला शिकावे, मिळवायला शिकावे. या मूलभूत गोष्टी करणे त्याच्या मेंदूला जमायला हव्यात. तरच पुढे जाऊन तो नवनिर्मिती करू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची ओळख या स्तरावरील विद्यार्थ्यांना नक्की यावी, मात्र त्याचा अतिरिक्त वापर टाळणे अधिक योग्य!

शिक्षक

कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा शिक्षकांना मात्र खूप फायदा होणार आहे. हल्ली वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही, अशी शिक्षकांची तक्रार कानावर पडते. अशैक्षणिक कामे ही त्यामागील ममस्या आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक आपली अशैक्षणिक काम वेगाने व अचूक करू शकतात. उदा. किरकोळ रजेचा अर्ज लिहायचा आहे. ‘चॅटजीपीटी’सारखे तंत्रज्ञान योग्य तऱहेने हाताळा, काही सेकंदात रजेच्या अर्जाचा नमुना तुमच्यासमोर प्रदर्शित होईल. त्यात दिनांक, तुमचे नाव व शाळेचे नाव संपादित करा. मुख्याध्यापकांच्या ई-मेलवर पाठवून द्या. वर्षभरात किमान चार परीक्षा द्याव्या लागतात. अशा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका काढणे, भारांशाप्रमाणे गुणांकन करणे हे किती कठीण काम! कृत्रिम बुद्धिमतेचे लघुरूप असलेल्या ‘चॅटजीपीटी’वर जा. योग्य पर्याय निवडा. अचूक सूचना द्या, तुम्हाला हव्या असलेल्या पाठय़ घटकावर हव्या तितक्या गुणांची, बहुपर्यायी (एनएसक्यू), वस्तुनिष्ठ किंवा दीर्घोत्तरी प्रश्न असलेली किंवा स्वतंत्र प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर तयार होऊन येईल. मात्र अशी प्रश्नपत्रिका तपासणे, संपादित करणे, अचूक असल्याची खात्री करणे हे काम मात्र शिक्षकाला करावे लागेल. विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करणे, इतर नोंदी करणे या गोष्टी वेगाने तयार केल्या तर उरलेल्या वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांकरिता करता येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी करता येईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवली गेली तर या तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग झाला असे म्हणावे. वर्गाध्यापनात शिक्षकांनी या तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला तर विद्यार्थी तसेच वागतील. तेही तंत्रज्ञानाचे गुलाम होतील. स्वतःची विचारशक्ती व कल्पनाशक्ती विद्यार्थी कदाचित गमावून बसतील, विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त, कृतिश्रवण बनविण्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. शिक्षक ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत असेल तर तो विद्यार्थ्यांपुढे आत्मविश्वासाने वावरू शकतो. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञानामुळे शिक्षकाला ‘अपडेट’ राहणे शक्य होईल. तो आपले अध्यापन सहज प्रभावी व अधिक दर्जेदार करू शकेल. अर्थात याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी, शाळा यांच्या गुणवत्तेवर निश्चितपणे होईल. काही अशैक्षणिक कामांमध्ये या तंत्रज्ञानाचा नक्की वापर करता येईल. मतदारांची नोंद, यादी करणे. आद्याक्षरानुसार, वयानुरूप मांडणी करणे, कुटुंब सर्वेक्षण, निरक्षरांचे सर्वेक्षण, अन्य माहितीचे संकलन करणे इत्यादी कामात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. मात्र या उपयोगामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ हेच असायला हवे.

शालेय व्यवस्थापन

आपण ज्या प्राथमिक शिक्षणांचा विचार करतोय, त्या स्तरावर शालेय व्यवस्थापन करणारे प्रमुख घटक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी या सर्वाना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानाचा वापर करून शासन अध्यादेश शोधणे, निर्गमित करणे, अग्रेषित करणे, माहिती मागवणे, मागवलेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण करणे, जतन करणे सहज शक्य आहे. खरं तर ही कामे आजही केली जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक जटील माहिती अधिक अचूकरीत्या गोळा करता येईल. मार्गदर्शन करता येईल. त्रुटी शोधता येतील, त्या दूरही करता येतील.

एकूणच काय तर, कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर निश्चितपणे प्रभाव पडणार आहे. यातून घडणाऱया स्थित्यंतराला आपण सामोरे गेलो पाहिजेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या नव्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणे, त्याबाबत साधक-बाधक चर्चा करून विवेकपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर आपण कशासाठी करत आहोत, याचे भान ठेवले तर कोणतेही तंत्रज्ञान हे विधायकच ठरेल.