पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल

>>दुष्यंत पाटील

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेला महान संगीतकार रॉबर्ट शूमन यानं `कार्नवल’ (Carnaval) नावाचा संगीत रचनांचा संग्रह रचला. या रचना पियानोसाठी केलेल्या आहेत. शूमनच्या या रचना सामान्य लोकांसाठी वाजवायला कठीण असल्याने त्या काळात फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत. शूमनच्या मृत्यूनंतर मात्र या रचना बऱयापैकी लोकप्रिय होत गेल्या.

बरेचसे ख्रिश्चन लोक ईस्टरच्या आधीचे चाळीस दिवस उपवास करत, सर्व प्रकारच्या सुखांपासून दूर राहत कडकपणे पाळतात. मांस सेवन आणि मद्यपान या काळात वर्ज्य असते. या चाळीस दिवसांच्या कालावधीला `लेंट’ असं म्हणतात. चाळीस दिवसांच्या या कडक काळापूर्वी ते `कार्नवल’ साजरा करतात. `लेंट’मध्ये ज्या गोष्टी वर्ज्य असतात त्या गोष्टी `कार्नवल’मध्ये मुद्दामच केल्या जातात. कार्नवलमध्ये लोक मुखवटे परिधान करून रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होतात. चेहऱयावर मुखवटे असल्याने आपण कोण आहोत ते इतरांना समजत नाही, त्यामुळे ते बिनधास्त असतात. रस्त्यावरच पार्ट्या होतात. मांस सेवन, मद्यपान आणि लेंटमध्ये वर्ज्य असणाऱया इतर पदार्थांचे सेवन या ठिकाणी केले जाते. पुढचे चाळीस दिवस उपवास करावा लागत असल्याने कार्नवलमध्ये आवडीच्या साऱया गोष्टी भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात. `कार्नवल’मध्ये लोक रस्त्यावर नृत्यही करतात!

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेला महान संगीतकार रॉबर्ट शूमन यानं `कार्नवल’ (Carnaval) नावाचा संगीत रचनांचा संग्रह रचला. या संग्रहात एकूण 21 छोट्या रचना येतात. या रचना पियानोसाठी केलेल्या आहेत. `कार्नवल’मध्ये मुखवटा धारण करत सहभागी होत या उत्सवाची मजा लुटणारे लोक या संग्रहातल्या रचनांमध्ये येतात. गंमत म्हणजे शूमनची मित्रमंडळी, सहकारी लोक, स्वत शूमन आणि जुन्या काळातल्या नाटकांमधली काही पात्रं मुखवटा परिधान करत `कार्नवल’मध्ये येतात अशी कल्पना शूमनने केलीय. रचना संग्रहातली एकेक रचना कुणातरी व्यक्तीचा `कार्नवल’मधला सहभाग दाखवते.

यामध्ये शूमनच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन वेगवेगळ्या बाजूंवर दोन वेगवेगळ्या रचना येतात. रचना संग्रहातली पाचवी रचना त्याच्या व्यक्तिमत्त्वाची शांत बाजू दाखवते, तर सहावी रचना त्याचीच प्रेरित होऊन कार्यरत झालेली ज्वलंत बाजू दाखवते. आपल्या मित्रमंडळींवर रचना करताना त्यांची नावं जशीच्या तशी देत नाही. मित्रमंडळींवर केलेल्या रचनांना तो कोड्यातली भाषा वापरत काहीतरी वेगळी नावं देतो. उदा. त्याचं लग्न एस्त्रsला नावाच्या युवतीशी होणार होतं. तिचा कार्नवलमधला सहभाग दाखवण्यासाठी तो `अर्नस्टाईन’ नावाची रचना करतो, तर त्याची भविष्यात होणारी पत्नी क्लारा हिचा सहभाग दाखवणाऱया रचनेला तो `कायरिना’ असं नाव देतो. शोपँ नावाच्या महान संगीतकारावर केलेल्या रचनेला मात्र तो `शोपँ’ असंच नाव देतो.

या 21 रचनांमध्ये असणारा एक समान धागा आहे. ठरावीक ाढमाने येणारे तीन किंवा चार स्वर आपल्याला प्रत्येक रचनेमध्ये पाहायला मिळतात. शूमनने या रचनांमध्ये तीन किंवा चार स्वरांचे तीन पॅटर्न्स वापरलेले आहेत. या पॅटर्न्सपैकी एक किंवा दोन पॅटर्न्स प्रत्येक रचनेत दिसतात. शूमन मातृभाषेत म्हणजे जर्मन भाषेत स्वरांचे हे पॅटर्न्स `A-Es-C-H, As-C-H आणि Es-C-H-A’ असे मांडता येतात. मुखवटाधारी लोकांसारखंच या रचनांमध्ये एक छुपा संदेश असल्याचं शूमन सुचवायचा.

या पॅटर्न्सपैकी `Asch’ हा शब्द म्हणजे जर्मन भाषेत एका शहराचं नाव होतं आणि याच शहरात शूमनच्या नियोजित वधूचा जन्म झाला होता. `Asch’ हा अक्षरांचा पॅटर्न जर्मन शब्द `Fasching’ यामध्येही येतो. या शब्दाचा अर्थ जर्मन भाषेत `कार्नवल’ असा होतो. कार्नवलनंतर सुरू होणाऱया लेंट कालावधीतला पहिला बुधवार ‘Ash Wednesday’ म्हणून ओळखला जातो. यातल्या `Ash’ या इंग्रजी शब्दासाठी जर्मन भाषेत `Asch’ हा शब्द आहे. याशिवाय `Asch’ हा पॅटर्न शूमनच्या संपूर्ण नावातही (रॉबर्ट अॅलेक्झांडर शूमन) पाहायला मिळतो.

शूमनच्या या रचना सामान्य लोकांसाठी वाजवायला कठीण असल्याने त्या काळात फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत. शूमनच्या मृत्यूनंतर मात्र या रचना बऱयापैकी लोकप्रिय होत गेल्या. या रचना आजपर्यंत कित्येक वेळा रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत. जवळपास दोनशे वर्षांपूर्वी रचलेलं हे संगीत आजही का लोकप्रिय असावं, हे पाहण्यासाठी आपण ते यूट्यूबवर ऐकायला हवं.

[email protected]