गिट्ट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

माझा अमेरिकेतला अत्यंत जीवलग दोस्त म्हणजे प्रदीप भागवत. त्याला प्रदीप मी फार क्वचित म्हटलंय. आमच्यासाठी तो ‘ गिट्ट्या’ आहे. ‘ गिट्ट्या’ हे टोपण नाव असलेला आणि मी ऐकलेला एकुलता एक माणूस. तो गेली त्रेचाळीस वर्षे कॅनडा-अमेरिकेत आहे. पण मुंबईत आल्यावर त्याच्या तोंडून अंगावरचा शर्ट-पॅण्ट सोडून अमेरिका टपकत नाही. तो बोलताना खांदे उडवत नाही. ओके, ओ रिअली, चिअर्स, कूल वगैरे शब्द त्याच्या जिभेवर तंबू टाकून नसतात. इंग्लिश बोलताना तो अमेरिकन अॅक्सेन्ट मारत नाही. तो पूर्ण हिंदुस्थानी इंग्लिश बोलतो. आम्ही व्हीजेटीआयमध्ये असताना होता तसा असतो. अलीकडे तर पाणीपुरी नको, इथलं पाणी नको वगैरे नाटकही नसतं. एकदा तो काविळीच्या भयानक आजारातून गेलाय. त्यावेळी अमेरिकन डॉक्टर्स त्याचं गॉलब्लॅडर काढायला निघाले होते. एका हिंदुस्थानी रक्ताच्या डॉक्टरने त्याला नीट तपासून सांगितले, ‘तुला फक्त कावीळ झालीय. पंधरा-वीस दिवस आराम कर, बरा होशील.’ आणि तो बरा झाला. तात्पर्य काय तर अमेरिकेत आजारी पडलात तर हिंदुस्थानी डॉक्टरकडे जा. त्याने हिंदुस्थानशी असलेली नाळ कधी तोडलीच नाही. त्याचे कपडे पॉश, अमेरिकन वाटतात. कारण ते त्याची पंजाबी बायको खरेदी करते म्हणून. वीस डॉलरवरचा शर्ट त्याला ‘वेस्ट ऑफ मनी’ वाटू शकतं. त्याची बायको पन्नास डॉलरच्या खाली काही खरेदी करणं ‘शान के खिलाफ’ मानते. ती किती हिंदुस्थानी असेल? टिपीकल हिंदुस्थानी नवऱ्यासारखा तो अमेरिकेत राहतो. देशात किंवा देशाबाहेर जाताना त्याची बॅगही याची बायको भरते. अस्सल हिंदुस्थानी नवरेपणाच्या बाबतीत तो माझ्यापेक्षा फक्त दोन अंगुळे खाली आहे. पण मी हिंदुस्थानात राहतो. (बायकोनं लाडावलंय दुसरं काय).

कॉलेजात असताना तो आम्ही सर्वच कडक असायचो, पण गिट्ट्या काकणभर जास्त कंजूष होता. व्हीजेटीआयला येण्यापूर्वी तो एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होता. जुन्या मैत्रिणींना भेटायला तो तिथे बऱयाचदा जायचा. एकदा आम्ही चार-पाच मित्र त्याच्याबरोबर गेलो. प्रचंड भूक लागली होती. मी गिट्टय़ाला म्हटले, ‘चल कॅण्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊया.’ गिट्टय़ाचा कंजूषपणा उफाळून आला. मला म्हणाला, ‘पैसे तुम्ही द्यायचे.’ आम्ही रुईया कॉलेजच्या सात्विक संस्कृतीतून आलेली मुलं होतो. एल्फिन्स्टनचं लॉग केबिन, तिथलं रंगीबेरंगी मॉड वातावरण आम्हाला आवडायचं. गिट्ट्याने सुंदर मुलीशी गप्पा मारल्या की त्याची असूया वाटायची. मग ते नैराश्य कुठून तरी बाहेर पडतं. आम्ही पोटभर खाल्लं आणि मग आमच्यातल्या एकाने  गिट्ट्याला सांगितले, ‘आम्हाला काय इथे. पुनःपुन्हा यायचं नाहीए. तुला रोज यायचंय. तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. बिल देऊन टाक.’ आणि आम्ही बाहेर पडलो. गिट्ट्याने मित्राचं एवढं मोठ्ठं बिल द्यायची ती पहिली वेळ असावी, पण अमेरिकेतला गिट्टय़ा वेगळा होता. मला वॉलमार्टमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, इथे शॉपिंग कर. मी आणि बायकोने व्यवस्थित शॉपिंग केलं. ती १९९६ ची गोष्ट आहे. त्यावेळी शंभर डॉलर्स खूप होते. गिट्ट्याने कार्ड काढून दिलं. बाहेर पडल्यावर म्हणाला, ‘माझ्यातर्फे तुम्हाला भेट.’ मी डोळे चोळले. चिमटा काढून पाहिला. स्वप्न नव्हतं. कधी बदललास? मी म्हटलं. तो हसला. नंतर आम्ही न्यूयॉर्कच्या चायना मार्केटमध्ये गेलो. जगाला सुगंधी करून ठेवणारी परफ्यूम्स तिथे १०-४० डॉलर्सला मिळत होती.  गिट्ट्या म्हणाला, ‘नक्कल असते. खरी नाहीत. गिफ्ट द्यायला तरी असतात.’ असं फुलटॉस मी सोडत नाही.
मी म्हटले, ‘यापुढे सेंटस्ची गिफ्टस् मला नकोत.’

‘तुला मी नेहमीच अस्सल देतो’ तो म्हणाला. ‘तुझ्यासाठी तर पालीच घेऊन येते आणि ती पन्नास डॉलर्सच्या खाली काही घेत नाही हे तुला ठाऊक आहे.’ (पाली हे त्याच्या बायकोचं नाव. कौरचा शॉर्टफॉर्म) अशा वेळी तो फक्त हसतो. आमचा मित्र विनय धुमाळे एकदा सीरियलच्या शूटिंगसाठी आठ-दहा लोकांचा ताफा घेऊन अमेरिकेला गेला. त्या मंडळींसह त्याचा मुक्काम गिट्ट्याकडे एक महिना होता. पालीचं एकच काम होतं. रांधा, वाढा आणि उष्टी काढा. हिंदुस्थानीची कुठलीही अमेरिकेतली बायको हे करणार नाही. पण पालीने केलं. एकदा पालीनेच मला सांगितलं, ‘त्या ग्रुपमध्ये दोन-तीन नटय़ा होत्या. पण एकीलाही उठून मला मदत करावी असं वाटलं नाही. शूटिंग नसेल तेव्हा सोफ्यावर आडव्या व्हायच्या.’ मला आठवलं, एकदा कॅलिफोर्नियातल्या माझ्या मित्राकडे मी आणि बायको राहिलो होतो. आमची जेवणं झाल्यावर तो मित्र आणि माझी बायको भांडी धूत होती. आवराआवर करत होती. त्या मित्राची बायको सिनेमात असतो तसा गाऊन घालून माझ्याबरोबर लालचुटूक चेरी खात होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघणार होतो. त्या मित्राच्या बायकोने विचारलं, ‘सकाळी काय हवंय?’ मी म्हटलं, ‘फक्त चहा आणि ब्रेकफास्ट.’ ती मित्राकडे बोट दाखवत म्हणाली, ‘हे त्याचंच डिपार्टमेंट आहे. तो देईलच.’ माझ्या ओठावर शब्द आले होते, ‘तुझं कुठलं डिपार्टमेंट आहे… चेरी खायचं का?’ मित्रामुळे ती अमेरिकेत आली. पण ती राणी, तो गुलाम असं चित्र दिसत होतं. गिट्टय़ा त्याबाबतीत प्रचंड नशीबवान आहे. बायको भेटली कॅनडात, मॉण्ट्रियलला. पण जुने हिंदुस्थानी संस्कार ती सोडायला तयार नव्हती.

तो एल्फिन्स्टन कॉलजातला असल्यामुळे सुंदर, मॉड मुलींच्या सहवासाबाबत आमच्यापेक्षा जास्त नशीबवान होता. आमचं रुईया कॉलेज, त्यावेळी शाळेची सुधारित आवृत्ती होती. व्हीजेटीआयमध्ये त्यावेळी मुली नसत. त्यामुळे सोशल डान्ससारखा नव्याने उगवत्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इतर कॉलेजमधून मस्का लावून मुलींना बोलवावं लागे.  गिट्ट्याने एका सुंदर मुलीला अख्खं लोण्याचं पाकीट संपवून आणलं. ती त्या सोशलमध्ये त्या सोशलची ‘राणी’ झाली. पुढे ती मराठीतली सुप्रसिद्ध नटी झाली. तिचं नाव नीना कुलकर्णी! ती हा छोटा क्षण कधीच विसरली असेल.  गिट्ट्या अजून कॉलर टाइट करून फिरतो. आम्हाला जळवण्याची त्याची कॉलेजची सवय अमेरिकेतही गेली नव्हती. एकदा न्यूयॉर्कमध्ये एका साध्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर समोरचं रिव्हॉर्लनिंग रेस्टॉरंट दाखवून मला म्हणाला, ‘‘मी आणि रिमा लागू इथे जेवलोय. तू उगाच हट्ट धरू नकोस.’’ मी म्हटलं, ‘‘हो, मी सुंदर स्त्री नाही याची मला पूर्ण कल्पना आहे.’’

इंजिनीयर म्हणून अमेरिकेत त्याने कात टाकली. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये अठ्ठावीस पेटंट मिळवली, पण त्यासाठी कधी कॉलर वर करून फिरला नाही. आम्ही दोघेही तसं जुन्या आठवणीत रमतो. हिंदी चित्रपटातली १९४५ ते ६० ची गाणी ही दोघांचा आवडीचा विषय. त्यातलं गिट्टय़ाचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त. तो गिटार वाजवायचा. ऑर्गन खूप मस्त वाजवायचा. कॉलेजच्या काळात आमच्या दोघांपैकी कुणाचा प्रेमभंग झाला की आम्ही त्याला फ्लॅटवर जाऊन ‘टूटे ना दिल टूटे ना’सारखी गाणी म्हणायची. गिट्टय़ा चांगला गातो. माझ्या एका संगीताच्या व्यावसायिक कार्यक्रमात मी त्याला गाणं दिलं होतं. गाणं होतं, लागा चुनरी में दाग. मी त्याची ओळख करून देताना म्हटलं, ‘हा माझा मित्र अमेरिकेत ‘नासा’त काम करतो. ‘नासा’ची यानं नीट उडतायत म्हणजे हा बऱयापैकी काम करत असावा. थरथरत्या हातातल्या माईकमधून त्यानं गाणं चांगलं म्हटलं. त्याला ‘वन्स मोअर’ मिळाली. इंटरव्हलला गिट्टय़ा म्हणाला, तू नासाचं काय सांगितलं! नासाशी माझा संबंध नाही.’ मी म्हटलं, ‘‘अलीकडे माणूस नासाचं नाव घेतल्याशिवाय मोठेपणा स्वीकारत नाहीय. तो वन्स मोअर नासाला होता… तुला नाही.’’ अर्थात कार्यक्रमाच्या पुढच्या गाण्याच्या वेळी मी सांगून टाकलं की ‘मी माझ्या मित्राची फिरकी घेतली. तो नासात नाही पण एक यशस्वी इंजिनीयर आहे.’

आता तो हिंदुस्थानात आला की, अमेरिकेला परतताना त्याचे पाय जड होतात. तुम्ही नशीबवान आहात रे. हिंदुस्थानात राहता असं तो म्हणतो. यावेळी अमेरिकेला जाताना म्हणाला, ‘‘मला हिंदुस्थानात मरायचंय.’’ एकदम मला जाणवलं की मरणाचे विचार येण्याएवढं वय झालंय आपलं. आम्ही तसे देव आनंदचे भक्त. पहिल्यांदा देव आनंदला भेटलो तेव्हा एकत्र भेटलो. त्यावेळी देव आनंदच एक वाक्य अजून कानात घुमतंय, “If you are no passion for anything by live” त्यामुळ आमचं वय होण्याचा प्रश्नच येत नाही. पुढच्या क्षणी एक सुंदर स्त्र्ााr बाजूने गेली. आमच्या दोघांच्याही माना वळल्या. जीव भांडय़ात पडला. अजून तरुण असल्याप्रमाणे जगतोय याची खात्री झाली.

– [email protected]