असह्य उष्म्याची होरपळ

>> अॅड. गिरीश राऊत

जागतिक तापमानवाढीचा महाराक्षस मानवजात गिळंकृत करतो की काय, अशी भयावह स्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. अवकाळी, ढगफुटी, अवर्षण, भूकंप, चक्रीवादळे, वणवे यांसारख्या आपत्तींमध्ये होणारी मनुष्यहानी पराकोटीला पोहोचत आहे. थंड हवामानासाठी जागतिक पर्यटकांचे आवडते ठिकाण असणाऱया युरोपमध्ये सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेचे जे थैमान सुरू आहे ते तापमानवाढीच्या दृश्य परिणामांची झलक आहे. औद्योगिकीकरणानंतरच्या काळात आज दर पाच वर्षांत एक अंश सेल्सियस अशी अभूतपूर्व ऐतिहासिक महाविस्पह्टक वाढ सरासरी तापमानात होत आहे. याच्या प्रलयंकारी झळा सोसूनही आपण धडा घेणार आहोत की नाही?

वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम जगभर जाणवू लागले असून त्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. सध्या थंड हवेसाठी जगातील सर्व पर्यटकांची पहिली पसंती असणाऱया युरोपमध्ये असह्य उष्णतेची लाट चालू आहे. पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्ये अनुक्रमे 47 आणि 41 अंश सेल्सियस असे अधिकृत विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. सावलीत हिरवळीवर तापमान नोंदण्याची रुढ पद्धत पाहता खरे तापमान कमीत कमी 3 ते 4 अंश सेल्सियसने जास्त असणार आहे. अनेक भागांत धावपट्टी व रूळ वितळल्यामुळे विमान व रेल्वे सेवा थांबल्या आहेत. शाळा, कार्यालये, इस्पितळे तसेच दळणवळण थांबले आहे. प्रचंड उष्म्यामुळे स्पेनमध्ये 10 दिवसांत 800 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तेथील तापमानाने 45 डिग्रीचा पारा ओलांडला आहे. या तापमानामुळे अनेक जंगलांमध्ये वणवे पेटले आहेत. 1975 नंतरचा विचार करता आताची उष्णतेची लाट ही स्पेनमधील तिसरी सर्वांत तीव्र लाट आहे. ब्रिटनमध्येही तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. फ्रान्समध्येही तापमानाने 100 वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. तेथील नद्यांचे पाणी गरम झाल्यामुळे अनेक अणुऊर्जा प्रकल्प ठप्प झाले आहेत. जर्मनी, बेल्जियम, स्वीडन, इटली या देशांतही हीच स्थिती आहे. तापमानाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथे प्लॅस्टिकच्या वस्तू, डांबर वितळण्यातून दिसून येत आहे. युरोपचा विचार करता 2003 मध्ये तेथे अतितीव्र उष्णतेची लाट आली होती आणि त्यामध्ये सुमारे 70 हजार जणांचा मृत्यू झाला होता.

सध्याची उष्णतेची लाट आणि वणव्यांबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस म्हणाले की, या उष्णतेच्या लाटा आणि वणवे पाहता, अर्ध्यापेक्षा जास्त मानवजात आत्महत्या करणार आहे. एवढे घडत आहे तरी जग ऊर्जेसाठी जीवाष्म इंधन वापरण्याचे सोडत नाही. कोणत्याही देशाकडे याचे उत्तर नाही. ग्युटेरेससारख्या उच्चपदस्थांना आता परिस्थितीचे गांभीर्य समजू लागले असले तरी त्यांना या समस्येचे योग्य आकलन नाही. खरी गोष्ट ही आहे की, पाच वर्षांत एक अंश सेल्सियस अशा अभूतपूर्व गतीने होत असलेल्या सरासरी तापमानातील वाढीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण तथाकथित आधुनिक मानवजात आत्महत्या करत आहे. ते उर्वरित निरपराध मानवांची, निसर्गाधारित जीवन जगणारे शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांची आणि जीवसृष्टीची हत्या करत आहेत. जीवाष्म इंधन वापरण्याच्या प्रश्नात जग गुंतले आहे. त्यामुळे वाचवण्यासाठी कृती करण्याचा काळ निघून जात आहे.

कार्बनी की अकार्बनी इंधन या वादात वेळ न घालवता ज्या गोष्टीसाठी इंधन वापरले जाते त्या गोष्टी म्हणजे आधुनिक कृत्रिम जीवनशैली तात्काळ थांबवण्याची गरज आहे. पण प्रगती, सुख व प्रतिष्ठsच्या पृथ्वी व अस्तित्वविरोधी कल्पना सोडण्याच्या दिशेने विचारच केला जात नाही.

ग्युटेरेस म्हणतात की, ‘कोणत्याही देशाकडे याचे उत्तर नाही’, हे खरे नाही. मानवजात वाचवण्याचा मार्ग उपलब्ध आहे. शाश्वत शेती, चरखा – हातमाग व माती – बांबू – कुडाची घरे बांधणाऱया, तंत्रबळापेक्षा आत्मबळ श्रेष्ठ मानणाऱया, पृथ्वीच्या जीवनाची बैठक मोडली जाण्याचा धोका ओळखून स्वयंचलित यंत्राला जाणीवपूर्वक टाळणाऱया, सुमारे 5 ते 10000 वर्षे अखंड टिकलेल्या हिंदुस्थानी संस्कृतीने, वीज व औद्योगिकीकरण नाकारणाऱया युरोप-अमेरिकेतील आमिष समूहांनी, निसर्गाशी सुसंगती राखणाऱया आदिवासींनी हा मार्ग दाखवला आहे. ग्युटेरेस ही गोष्ट समजून घेत नाहीत.

कार्बन डाय ऑक्साईड वायूच्या सुमारे 75 टक्के उत्सर्जनास जबाबदार आपली दळणवळण यंत्रणा आणि वाहने आहेत. वीज आकाशात होती तेच ठीक होते. तिला वापरण्यासाठी, औष्णिक वीजनिर्मिती करून घरात आणणे हे राखरांगोळी करून घेणे होते हे दाहक सत्य डहाणूची खाडी, नाशिक, एकलहराच्या दऱया, कोराडीचे राख साठवणुकीचे धरण फुटल्याने वाहणाऱया राखेच्या नद्या, सर्वत्र शेतजमिनीवर पसरणारी राख पाहून समजते. 250 वर्षांपूर्वी पृथ्वी हे आपले खरे घर वातानुकूलित होते. सागर व जंगलातील हरितद्रव्य, दोन्ही ध्रुव प्रदेशातील बर्फाचे आणि वातावरणातील ओझोनचे आवरण, महासागरांचे पाणी, डोंगर, जंगल यामुळे 15 अंश सेल्सियस सरासरी तापमान लाखो वर्षे होते. परंतु घर, जीवनशैली आणि जगण्याचा दर्जा याबाबतच्या चुकीच्या कल्पनांमुळे, तथाकथित प्रगती व विकासामुळे आपण ते गमावले. वातानुकूलन या चुकीसाठी वीज वापरली. कृत्रिम जीवनशैलीमुळे तापमान वाढले. सतत अर्थव्यवस्था व नफ्याचा विचार आणि भ्रामक कल्पनांचे गुलाम बनल्यामुळे माणसे वास्तवाला नाकारत आहेत. ऊर्जाविरहित उद्योगपूर्व शाश्वत जीवनपद्धतीकडे पुन्हा जाण्याऐवजी त्यात कमीपणा मानून पुन्हा वातानुकूलन वाढवून, त्यासाठी कोळसा जाळून मृत्यूला कवटाळत आहेत. याला आधुनिकता म्हणायचे?

मोटर व इतर वाहने, वीज, सिमेंट, टीव्ही, धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन), एसी, फ्रीज या गोष्टी पृथ्वीवर आगंतुक, परक्या, अव्यवहार्य आहेत ही गोष्ट आधुनिक म्हणवणाऱया माणसांच्या काही केल्या डोक्यात शिरत नाही. यावर आधारित जगाला तो विकसित जग म्हणतो. यामुळे पैसा प्रमाण मानणारी अर्थव्यवस्था उभी राहिली आणि आर्थिक शब्दाने आधुनिकांना पछाडले.

तापमानवाढीस हातभार लावणारे प्रकल्प हे अशाश्वत आधुनिक जगणे स्वीकारल्यामुळे केले जात आहेत. या जगण्याला, प्रकल्पाला नाकारणाऱयांना इम्प्रॅक्टिकल ठरवले जाते. प्रगतीविरोधी म्हणून दोष दिला जातो. पण वास्तव नेमके उलट आहे. आधुनिक जगाने विकृतीला प्रकृतीचे स्थान दिले आहे. कृत्रिम विकृतीच्या वाढीमुळे प्रकृती लयास जात आहे. माणसांनी ओळखले पाहिजे की कृत्रिम जग हा भ्रम आहे. त्याला सत्य समजणे ही माया आहे. या मायेच्या प्रभावाखाली आधुनिक माणूस आत्महत्या करत आहे.

आपल्याकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी, उष्णतेमुळे वीज वापर वाढला असताना राज्याला औष्णिक विद्युत प्रकल्पांना लागणाऱया कोळशासाठी अनेक पट अधिक किंमत मोजायला लावल्याबद्दल पेंद्राविरुद्ध संताप व्यक्त केला. खासगी कोळसा ब्लॉकच्या मालकांना ही नफा कमावण्याची संधी वाटत असावी. या परिस्थितीची भीषणता नेते आणि जनता दोघांनाही समजलेली नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार होत असलेल्या ढगफुटीमागे परकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वीज, कोळसा, उष्णतेच्या लाटा आणि ढगफुटीचा परस्परसंबंध कुणी समजून घेत नाही.

मानवाची विकासाची राक्षसी महत्वाकांक्षा पृथ्वीवरील जीवनासाठी घातक ठरत आहेत. त्यांना महामार्ग, विमानतळ, बंदरे वीज, सीमेंट प्रकल्प व उद्योग हवे आहेत. सन 1756 मध्ये इंग्लंडमधे प्रथम स्वयंचलित यंत्र आल्यापासुन जगात औद्योगिकरण सुरू झाले. तेव्हा शून्याजवळ असलेले तेथील तापमान आता 40 अंशांवर जात आहे. महासागर व ध्रुवांवरील, पर्वतांवरील पाणी व बर्फाची सतत वातावरणात जाणारी वाफ तापमानवाढीला अधिक स्पह्टक बनवत आहे. आर्क्टिक वर्तुळावरील कायमस्वरूपी बर्फ वितळत आहे. त्यावरील रशिया, अलास्का, सैबेरियातील जंगलांना भयावह वणवे लागत आहेत. ऑस्ट्रेलियातील वणव्यांत 300 कोटींपेक्षा जास्त प्राणिमात्र जळून मरण पावले आहेत. चीन, जपान व ईशान्य भारतात अभूतपूर्व महापूर येत आहेत. अंटार्क्टिकाचा बर्फ वेगाने वितळत आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात दक्षिण मुंबई व गिरगाव सागराच्या पाण्याखाली गेले. मानव जिवंत राहू शकण्याची 50 अंश सेल्सियसची मर्यादा भारतातही अनेक ठिकाणी ओलांडली जात आहे.

आज युरोपातच नव्हे तर जगभरात उष्माघाताने आजारी पडणाऱयांची व मृत्यूंची संख्या वेगाने वाढत आहे. झाडे लावा असा प्रचार होत आहे. परंतु पृथ्वीवर दरवर्षी सुमारे 1500 कोटी झाडे विकासासाठी नष्ट केली जात आहेत. ती जंगलांबरोबर नष्ट होत आहेत. हे जंगल परत मिळवता येणार नाही. सन 2009 मध्ये 1000 कोटी टन असलेले व त्याचवेळी कमी करणे वा थांबवणे आवश्यक असलेले कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन भौतिक प्रगती, समृद्धी व विकासाच्या नावाखाली आता दरवर्षी सुमारे 4000 कोटी टन एवढे वाढले आहे. गेल्या 10 वर्षांत उष्णतेच्या लाटेत हजारो- लाखो मृत प्राणी, पक्षी व करोडो मासळींचा खच पडत होता, तशी गोष्ट माणसांबाबत घडणे सुरू होणार आहे. कारण दर 5 वर्षांत एक अंश सेल्सियस अशी अभूतपूर्व ऐतिहासिक महाविस्पह्टक वाढ सरासरी तापमानात होत आहे.

एपंदरीतच, तापमानवाढीचा बाण आधीच सुटला आहे. तो पकडायचा व थांबवायचा तर मँचेस्टरच्या स्वयंचलित यंत्रावर आधारलेल्या कापड गिरण्यांना तोंड देण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी देशाने वापरलेला चरखा – हातमागाचा मार्ग फक्त असू शकतो. हे स्वीकारण्यात विज्ञान आहे आणि आधुनिकता, विकास व प्रगतीच्या नादाला लागून ते नाकारण्यात तंत्रज्ञान संमोहन आणि यंत्रांची गुलामी आहे, जी मानवजातीचे व जीवसृष्टीचे अल्पावधीत उच्चाटन घडवणार आहे.

(लेखक, पर्यावरणतज्ञ आहेत.)