खुदा का बंदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हर्ष दातार 

मोहम्मद रफी या महान गायकाचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. देदीप्यमान कारकीर्द असणारे रफीसाहेब मृदू स्वभावाचे संवेदनशील माणूस होते हे त्यांच्याशी निगडित अनेक प्रसंगांतून दिसून येते. दैवी आवाजाची देणगी लाभलेला हा गायक म्हणजे खुदा का बंदा (देवमाणूस) होता असेच म्हणावे लागेल.

मो हम्मद रफी (1924-1980) या महान गायकाचे जन्मशताब्दी वर्ष 24 डिसेंबर रोजी सुरू होत आहे. त्यांच्या देदीप्यमान कारकीर्दीबाबत सर्वश्रुत आहे. मृदू स्वभावाचे आणि साधे रफीसाहेब महान गायक तर होतेच, त्याचबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. उत्कृष्ट श्रवणीय गायकाबरोबरच एक माणूस म्हणून ते कसे होते याबाबत आज थोडे कथन.

सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात त्यांनी अतिशय कठीण दिवस काढले. आधी एक समूह गायक (कोरस ) म्हणूनसुद्धा ते गायले. ‘शहाजहान’ चित्रपटात ते कोरसमध्ये गात असत. त्या दिवसांत कोरस गाणाऱयांना रोजंदारीवर दर दिवसाचा माणशी एक रुपया मिळत असे. एक दिवस काही अपरिहार्य कारणामुळे ध्वनिमुद्रण रद्द झाले. संगीतकार नौशादना एक मुलगा स्टुडिओच्या पायरीवर बसलेला दिसला. पृच्छा केल्यानंतर तो मुलगा म्हणाला, “माझ्या जवळ घरी जायला पैसे नाहीत.” नौशादनी त्याला एक रुपया देऊ केला, पण त्याने तो नम्रपणे नाकारला. “आज कामच झाले नाही तर मला पैसे घ्यायचा अधिकार नाही.” नौशादनी कशीबशी त्याची समजूत काढली आणि पैसे दिले. अनेक वर्षांनी रफीसाहेबांचा जम बसल्यावर एक दिवस नौशादसाहेब त्यांच्या घरी आले असता त्यांना भिंतीवर एक फ्रेम आणि त्यात एक रुपयाचे नाणे दिसले. हा तोच रुपया होता जो रफीसाहेबांनी आपल्या खडतर दिवसांची आठवण म्हणून जतन करून ठेवला होता. कारण त्या दिवशी ते पायी घरी आले होते. जरी प्रसिद्धी गगनाला भिडली तरी पाय जमिनीवर होते. एकदा परदेश दौऱयावरून येताना रफीसाहेब नुकतेच बाजारात आलेले अत्याधुनिक डायलिसिस उपकरण आणले. त्यांनी ते इस्पितळाला देणगी म्हणून दिले.

संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘पारसमणी’ या पदार्पणातील चित्रपटाकरिता लताजींबरोबर ‘वो जब याद आये’ या गीताचं ध्वनिमुद्रण झाल्यानंतर एलपींनी त्यांना 1000/- हे मानधन सुपूर्द केलं. या जोडगोळीचं कर्तृत्व तसेच ते या सिनेसृष्टीत आपला जम बसविण्याकरिता खूप कष्ट करीत आहेत हे रफींना अवगत होते. त्यांनी लगेच त्यात आपल्या दोन रुपयांची भर घालून दोघांना प्रत्येकी 501/- पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून दिले. नवोदित संगीतकार कमल राजस्थानी एका निर्मात्याकडे काम मागायला गेले तेव्हा त्या निर्मात्याने एक अट घातली, ती म्हणजे गाणी रफीसाहेबांनीच गायली पाहिजेत. कमल रफीसाहेबांकडे गेला आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. रफींनी लगेच मान्य करून तारखाही दिल्या. निर्मात्याला आश्चर्य वाटले की, रफीसाहेब एका नवोदिताबरोबरसुद्धा काम करायला तयार आहेत. नंतर कमल रफीसाहेबांना त्यांचे मानधन द्यायला गेला तेव्हा रफींनी ते मानधन त्याला शुभेच्छांसकट परत दिले. मात्र जाता जाता त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला, “आजच्या जगात पेहरावाला, तुम्ही कसे दिसता याला खूप महत्त्व आहे. तेव्हा चांगले कपडे, बूट खरेदी कर आणि वापर.”

रफीसाहेब आपल्या पहिल्या वाहनचालकाला घरच्या सदस्याप्रमाणे वागवत. पुढे ‘इंपाला’ ही नवीन गाडी बाजारात आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी ती विकत घेतली. मात्र त्याचे स्टेअरिंग डावीकडे असल्याकारणाने ड्रायव्हरला ती गाडी चालवणे जमेना. अनेकदा अपघात होता होता वाचला. रफीसाहेबांनी आपल्या खर्चाने त्याचे प्रशिक्षण घ्यायला लावले. तरीसुद्धा काही जमेना. त्याला जायला सांगून दुसरा ड्रायव्हर नेमणे रफीसाहेबांच्या कनवाळू स्वभावाविरुद्ध होते. या संभ्रमातून त्यांनी जो तोडगा काढला तो त्यांच्या संवेदनशील स्वभावाचे दर्शन घडवतो. शेवटी त्यांनी ड्रायव्हरला स्वतच्या पैशांतून एक टॅक्सी घेऊन दिली, जेणेकरून त्याची रोजीरोटी चालावी आणि मगच इंपालाकरिता दुसरा ड्रायव्हर नेमला. जसा त्यांचा स्वभाव तसेच त्यांचे गाणे…नेमके हृदयाला भिडणारे.

मुकेश, रफी, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर हे सगळे समकालीन आणि व्यावसायिकदृष्टय़ा एकमेकांचे प्रतिस्पर्धी. तरी एकमेकांबद्दल नितांत आदर आणि स्नेह बाळगणारे. आणीबाणीच्या काळात किशोर कुमारच्या गाण्यांवर निर्बंध लागले होते. त्यांची गाणी विविध भारतीवर वाजवायला बंदी होती. रफीसाहेबांना हे कळले तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ही बंदी उठवायची विनंती केली. किशोर कुमारला कळेना की, ही बंदी अशी अचानक कशी उठली? जेव्हा त्यांना समजले की, हे रफीसाहेबांमुळे झाले तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. रफींनी त्यांना नम्रपणे सांगितले की, मी काही विशेष केले नाही आणि याची वाच्यतादेखील करू नका. गायक मुकेश यांचे ऑगस्ट 1976 मध्ये परदेश दौऱयावर असताना आकस्मिक निधन झाले. आपल्या मित्राच्या जाण्याचे रफींना अतोनात दुःख झाले. आजारी रफी त्या वेळेला इस्पितळात उपचार घेत होते. तरी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध रफी मुकेशच्या अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित राहिले.

अतिशय साधे आणि मृदू स्वभावाच्या रफीसाहेबांना काही वेळेला मात्र कठीण आणि कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. एका निर्मात्याला त्याच्या अडचणीच्या दिवसांत रफीसाहेबांनी आपला फ्लॅट राहायला दिला (त्या वेळेला ते आपल्या नवीन बंगल्यात राहायला गेले होते). भाडे करारसुद्धा केला नाही आणि भाडेही घेतले नाही. त्या निर्मात्याने रफीचा दिलदारपणा जवळ जवळ दोन वर्षे भोगला. पुढे याच निर्मात्याच्या एका चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणात रफींच्या बरोबर किशोर आणि लताजींनीसुद्धा गाणी गायली. रेकॉर्डिंग संपल्यावर दोन पुष्पगुच्छ मागवले गेले. एक लताजींना दिला गेला आणि दुसरा रफींऐsवजी किशोर कुमारला. रफीसाहेबांना अतिशय वाईट वाटले. दुखावलेले रफीसाहेब त्यांच्या स्वभावानुसार काहीही न बोलता निघून गेले. मात्र जाता जाता आपल्या सचिवाला बजावले की, या निर्मात्याकडून कोणतीही सवलत न देता मानधनाची संपूर्ण रक्कम ताबडतोब वसूल कर.

‘दुसरा आदमी’ चित्रपटातील ‘क्या मौसम है’ या गाण्याची रफीसाहेबांबाबत एक हृद्य आठवण स्वत संगीतकार राजेश रोशननी सांगितली आहे. गाण्याची चाल आणि त्यातील एक छोटासा भाग रफीसाहेबांनी गायचा ठरले. मात्र त्यानंतर रफीसाहेब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. असे असूनही ध्वनिमुद्रणाच्या दिवशी ते सरळ स्टुडिओमध्ये आले आणि फक्त एकदा ऐकलेली चाल कोणत्याही सरावाशिवाय वन टेकमध्ये त्यांनी आपला अंतरा गायला.

दैवी देणगी मिळालेला आवाज आणि महान गायक असूनही रफीसाहेब हे काही संगीतकारांच्या पहिल्या पसंतीचे गायक नव्हते किंवा स्पष्ट सांगायचे तर आपण ‘नावडते’ म्हणू या. त्यात नावाजलेले संगीतकार अनिल बिस्वास, सी. रामचंद्र ( अण्णा) आणि राहुल देव बर्मन (पंचम) होते. ही गोष्ट माहीत असूनही रफीसाहेबांनी मनात कोणतेही किल्मिष ना बाळगता या सर्वांबरोबर काम केले. त्यांच्या मते व्यक्तिगत आवडी-निवडी आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. किशोर कुमार हे पंचमदांचे आवडते गायक. सुरुवातीच्या काळात त्यांना विजय आनंद व शम्मी कपूर यांच्या आग्रहास्तव ‘तिसरी मंझिल’मध्ये रफीसाहेबांचा आवाज वापरावा लागला. तो चित्रपट संगीत, गाण्यांमुळे गाजला. पुढे पंचमदांना किशोर कुमारच्या तारखा मिळत नसल्यामुळे रफींना एक गाणं द्यावं लागलं. चित्रपट होता संजय खानचा ‘अब्दुल्ला’ आणि गाणे होते ‘मैंने पूछा चाँद से’. अनिल बिस्वासचे आपल्याबद्दलचे वाईट मत (अनिल बिस्वासच्या मते रफींना गाणेच येत नव्हते!) मनात न ठेवता पुढे अनेक वर्षांनी रफीसाहेबांनी त्यांच्या (अनिल बिस्वासच्या) मुलाबरोबरसुद्धा काम केले. अशोक कुमारच्या सांगण्यावरून त्यांचं एक गाणं सी.रामचंद्रांनी नाइलाजाने रफींना दिलं. मात्र अशोक कुमारना ते इतकं आवडलं की, त्यांनी सी. रामचंद्रांना बजावलं की, यापुढे माझी सर्व गाणी रफींना दिली पाहिजेत. त्यानंतर अण्णांनी रफींना 19 सोलो आणि 23 युगुल गाणी दिली.

तर असे होते दैवी आवाजाची देणगी लाभलेले महान गायक ‘खुदा का बंदा’ मोहम्मद रफी. निर्मळ मनाचा, स्वर्गीय आवाजाचा सच्चा कलाकार!

[email protected]

(लेखक संगीत अभ्यासक आहेत)