नाट्यरंग- शोभायात्रा: अवकाशखेळ

 

>> हिमांशू भूषण स्मार्त

 

अवकाशखेळाची व्यामीश्रता स्पष्ट करणारे नाटक शोभायात्रा. हा अवकाशखेळ स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानमधल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विखंडनाचा, कप्पेकरणाचे द्योतक ठरतो आणि शेवटाला नव्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जुळणीचे व या जुळणीतून साकारणाऱया अवकाशाचे सूचनही करतो. नाटकाच्या चतुर्मित अनुभवातील हा खेळ शोभायात्रा नाटकात सहजपणे साकारला आहे.

नाटक त्रिमित अवकाशात खेळले जाते. काळाची चौथी मिती मिळून नाटकाला नाटकाचा अनुभव चतुर्मित होतो. अवकाशाची व्याख्या wपा tप्ग्हे म्aह ंा अशी आहे. या विधानातले सर्वात महत्त्वाचे पद आहे  tद ंा हे असणे. एका प्रसिद्ध उपहारगृहात जेवणाचा खमंग वास सुटलेला आहे, तर त्या उपहारगृहाकडे भूक लागलेली किंवा जीभ खवळलेली माणसे ओढली जातील. उपहारगृहामधले त्यांचे अस्तित्व भुकेने, खमंग अन्नाच्या लालसेने भारलेले आहे. त्याच उपहारगृहामधला स्वयंपाकी मात्र या खमंग वासाने कंटाळलेला, विटलेला असेल. गिऱहाईकाला खमंग वासामागून येणारे चटकदार अन्न हवे आहे, तर स्वयंपाक्याला या वासातून, पर्यायाने कामातून सुटका हवी आहे. स्वयंपाकी आणि गिऱहाईक दोघेही उपहारगृहात आहेत. उपहारगृह दोघांसाठी स्थळ म्हणून एकच आहे, पण अवकाश म्हणून वेगळे आहे. एकाच स्थळात साकारणाऱया या अवकाश वैविध्याचा नाटकाला आधार असतो. नाटक सुरू होण्याआधी अवकाश रिक्त असते.

शफाअत खान यांच्या `शोभायात्रा’ या नाटकात असाच अवकाशखेळ खेळला जातो. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यामधल्या ऐतिहासिक नेत्यांच्या प्रतिमांसह एक चित्ररथ निघणार आहे. या प्रतिमा ज्यांच्याकडून अभिनित होणार आहेत ते समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरांमधील लोक आहेत. कुणी शिक्षक आहे, कुणी प्राध्यापक, कुणी वकील आहे एकूणात ही वर्तमानातल्या स्वातंत्र्यभोक्तांकडून निघणारी, स्वातंत्र्याचा रोमहर्षक इतिहास दाखवणारी भव्य शोभायात्रा आहे. शोभायात्रेत टिळक, नेहरू, गांधी, सुभाषबाबू, झाशीची राणी आणि बाबू गेनू ही ऐतिहासिक प्रभावळ साकारली जाणार आहे. या शोभायात्रेला एका भाईचा वरदहस्त लाभलेला आहे. अमेरिकन मीडियासाठी कव्हरेज करणारी बार्बी नावाची एक पत्रकार आणि छोटू नावाचा चहावाला आहे.

नाटकात जो घटपाम येतो तो शोभायात्रेच्या तालमीचा आहे. ही तालीम जुन्या इंग्रजकालीन इमारतीच्या तळमजल्यावरच्या प्रशस्त हॉलमध्ये आहे. य हॉलवजा गोदामामध्येच देण्याघेण्याचे भाईचे अवैध व्यवहार चालणारे भपकेबाज केबिन आहे. या हॉलमध्ये असंख्य पेटारे पडलेले आहेत. लेखक रंगसूचनेत सुचवतो की, या पेटाऱयांमुळे अनेक आडोशाच्या जागा तयार व्हाव्यात. नाटकांमधली आठ-दहा पात्रे हॉलमध्ये एकत्र असली तरी प्रत्येकाचे स्वतंत्र कोपरे होणे ही नाटकाची गरज आहे. इंग्रजकालीन ऐतिहासिक इमारतीत भाईचे कार्यालय आणि गोदाम असल्याने तिच्या ऐतिहासिक व्यक्तित्वाला वर्तमानाचा एक विजोड तुकडा ठिगळासारखा चिकटवला गेलेला आहे. त्यात स्वतचे वर्तमान आणि शोभायात्रेतली ऐतिहासिकता अशी दुहेरी जीवन जगणारी माणसे असल्याने या विजोड-विसंगत अवकाशाचे छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विखंडन झालेले आहे.

नाटकाच्या सुरुवातीला नाटकाचे नेपथ्य या कोपऱयांची व्यवस्था सुचवते. नाटकाच्या सुरुवातीला प्रकाश येतो तेव्हा सूत कातत बसलेले गांधी, नुसतेच बसलेले सुभाषबाबू आणि नेहरू दिसतात. काही क्षणांनी अत्यंत त्वेषाने संवाद बनत आणि तलवार नाचवत झाशीची राणी येते. यानंतर सुभाषबाबू, गांधी, टिळक त्यांचे-त्यांचे ऐतिहासिक संवाद बोलतात. परदेशी कपड्यांची होळी होत असताना ट्रक अंगावर येऊन बाबू गेनूचा मृत्यू होतो. `भारत माता की जय’, `बाबू गेनू अमर रहे’च्या घोषणा होतात. या साऱया अत्यंत गतिमान, आवेशी, ऐतिहासिक घटपामानंतर पूर्ण प्रकाश येतो. रंगमंच स्पष्ट दिसतो आणि सफारी घातलेला शूटर प्रवेश करतो. चित्ररथाला उशीर झाल्याने नेते त्रस्त आहेत. त्यांना इतिहासाचे ओझे असह्य झालेले आहे. नाटकाच्या आरंभीच शोभायात्रामधल्या अवकाशखेळाची व्यामीश्रता स्पष्ट होते. भविष्यात शोभायात्रेचा रोमांच निर्माण होणार असला तरी आता जणू काही इतिहासाचा तुरुंग होऊन सगळी माणसे त्यात अडकून पडलेली आहेत. एका बाजूला ऐतिहासिकतेने केलेली कोंडी आहे आणि दुसऱया बाजूला भाईच्या दहशतीने, दडपणाने केलेली कोंडी आहे. बाबूच्या सांगण्यानुसार तिथे `जय हिंद’ म्हणणारी शाळेची पोरे, ढोल, ताशे, बँड, फटाके आहेत. जल्लोष आहे. जाधव, बापट, प्राध्यापक बाई, बाबू, छोट्या, पावलस यांची व्यक्तिगत अवकाशे वारंवार नाटकात प्रवेश करतात. ही अवकाशे सामाजिक, आर्थिक स्तरांची, बाबू-छोट्याच्या अभावग्रस्ततेची, संस्कृतीमधल्या आणि समाजरचनेमधल्या स्त्राrच्या एकाकीपणाची असतात. पोलीस भाईच्या मागे लागतात आणि शोभायात्रेला परवानगी नाकारतात. जाधवांनी धक्का मारल्यावर एका बॉक्समधला दारूगोळा बाहेर पडतो. बार्बीच्या रूपाने एक परिकथासदृश्य, जादुई अवकाश नाटकात निर्माण होते. या अवकाशात रमून सगळेच आपापली कोंडी सुसह्य करू पाहतात.

एकाअर्थी `शोभायात्रा’मध्ये घडून येणारा अवकाशखेळ हा स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानामधल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विखंडनाचा, कप्पेकरणाचाच खेळ होतो. शोभायात्रा व तालमीचा हॉल-गोदाम या अवकशांशी पात्रांनी, ऐतिहासिक व्यक्तित्वांनी आपापल्या मानसिकतानुसार अनुकूलन केलेले आहे. हे अनुकूलन हॉलबाहेरच्या कल्पित जल्लोष, हिंसा, दहशत यांनी उघडे पडत जाते. नाटकाच्या अखेरीस छोट्या सुभाषबाबूंची टोपी, गांधींचा चष्मा चढवून, मोठा झेंडा उचलून रंगमंचावर धावत सुटतो. रंगमंच प्रकाशाने उजळून  निघतो. नाटकाच्या या अखेरच्या रंगसूचनेमधून नव्याच सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जुळणीचे आणि या जुळणीतून साकारणाऱया अवकाशाचे सूचन होते. या अनिश्चित-संभ्रमित अवकाश सुचितासह नाटक संपते.

[email protected]