
>> किरणकुमार जोहरे
हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. जवळ जवळ 85 टक्के हिंदुस्थानी शेती व त्यावर आधारित उद्योगांद्वारे आपले पालनपोषण करीत असतात आणि या संपूर्ण शेतकी व्यवस्थेचा मुख्य आधार आहे पावसाद्वारे मिळणारे पाणी. त्यामुळेच प्रत्येक शेतकरी पावसाची चातकासारखी (डोळ्यात प्राण आणून) वाट पाहत असतो. या पावसाच्या आगमनाची आणि एकूण पाऊसमानाचं भाकीत करतात ते हिंदुस्थानी हवामानशास्त्र विभागाचे ग्रुप-A शास्त्रज्ञ. पेरणी, शेतीला पुरविण्यात येणारे पाणी ते कापणीपर्यंत या भाकितावर शेतकरी अवलंबून असतात आणि योग्य भाकितामुळे शेतकऱयांचे करोडोंचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
वेगवेगळ्या भागातील हवामानाची माहिती देताना काहीतरी सांखिकी आकडय़ांचा खेळ करून आमचा अंदाज किती अचूक होता असं हे ग्रुप-A शास्त्रज्ञ दाखवून देतात. त्यानेही नाही भागलं तर हिंदुस्थान हा एक उष्णकटिबंधीय देश आहे अणि तिन्ही बाजूने समुद्र आहे वगैरे वगैरे थातूरमातूर स्पष्टीकरणाची मखलाशी तर करतातच, परंतु हेच सत्य आहे का? असं का होतं? हे ग्रुप-A शास्त्रज्ञ नेमकं काय करतात? पाहूया एक रिपोर्ट.
हवामानशास्त्र विभागाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे हवामानाचा अंदाज देणे आणि ही ग्रुप-A शास्त्रज्ञांची जवाबदारी असते. जसं आपण सारे जाणतो, शास्त्रज्ञाचे सर्वात प्रमुख काम म्हणजे ‘संशोधन’.
वेतन आयोगाच्या व्याख्येनुसार एक किंवा अनेक नैसर्गिक किंवा भौतिक विज्ञान शाखेचे विशेष ज्ञान असणाऱया तसेच त्या विषयाचे अध्ययन करणाऱया व्यक्तीस ‘शास्त्रज्ञ’ संबोधले जाते. नवनवीन आविष्कार तसेच नवनवोन्मेषांच्या आधारे एका विशिष्ट विषयाचे विशेष अध्ययन करून हे ज्ञान संपादित केलेले असते. भौतिक विज्ञान, गणित किंवा सामाजिक क्षेत्रांच्या सहाय्याने निसर्गाचे व्यापक रूप समजून घेण्याकरिता संशोधन केले जाते, परंतु हवामानशास्त्र विभागाचे ग्रुप-A शास्त्रज्ञ यापैकी एकही कार्य करीत नाहीत.
सहाव्या वेतन आयोगात विज्ञान व संशोधन करणाऱया सरकारी संस्थांमधून शास्त्रज्ञांची गळती रोखण्याकरिता तसेच या संस्थांमधे संशोधन करणाऱया शास्त्रज्ञांचे मनोबल वाढावे तसेच एकूणच अधिकाधिक संशोधन कार्य व्हावे या उदात्त हेतूने एक विशेष योजना तयार केली गेली, जिला ‘फ्लेक्सिबल कॉम्प्लिमेंटरी स्कीम’ (FCS) म्हटले जाते. या योजनेच्या अंतर्गत शास्त्रज्ञांना अनेक सुविधा बहाल करण्यात आल्या, जसं की एखादं पद रिक्त नसतानादेखील पदोन्नती दिली जाते. वास्तविकपणे स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन, संशोधनाची प्रवृत्ती जागृत होऊन नवनवीन दृष्टिकोनातून संशोधन व्हावे याकरिता शास्त्रज्ञांना 60टक्क्यांच्या वर गुण असावेत तसेच एकाच विषयावर पुनः पुन्हा संशोधन न होता व्यापक विषयांवर संशोधन व्हावे या अटींची खात्रीने पूर्तता व्हावी याकरिता शास्त्रज्ञांच्या कार्याचे मूल्यांकन करण्याकरिता समिती स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश या योजनेत दिलेले आहेत, परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागातील ग्रुप-A शास्त्रज्ञांनी हे सर्व नियम व अटी पायदळी तुडवल्या, परंतु एफसीएस योजनेतील पदोन्नतीसहित सर्व सुविधा मात्र पध्दतशीरपणे आपल्या पदरात पाडून घेतल्या.
प्रत्यक्ष पाहता भारतीय हवामानशास्त्र विभागातील (IMD) अंतर्गत संरचना वैज्ञानिक संशोधन करणाऱया अन्य सरकारी संस्था, जसे की IIG (Indian Institute of Geomagnetism) किंवा TIFR(Tata Institute of Fundamental Research) यांपेक्षा अत्यंत वेगळी आहे. IITM( Indian Institute of Tropical Meteorology) यासारख्या संस्थांनी निर्मित केलेल्या मॉडेलच्या आधारे IMD हवामानाचा अंदाज वर्तविते. IMD स्वतः कोणतेही मॉडेल बनवीत नाही. IMD च्या मॅण्डेटला पुनर्परिभाषित करणाऱया कमिटीच्या अहवालानुसार IMD अंशतः सायंटिफिक आणि अंशतः ऑपरेशनल आहे. याचाच अर्थ IMD पूर्णपणे संशोधन करणारी संस्था नाही, परंतु एफसीएस योजनेचे फायदे मिळवण्याकरिता IMD ला पूर्णपणे संशोधन करणारी संस्था सिद्ध करणे आवश्यक होते. केवळ याचकरिता पूर्वापार चालत आलेल्या Assistant Meteorologist ते Meteorologist-I ग्रुप-A या सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीला अन्य कोणताही पर्याय उपलब्ध करून न देता बंद करण्यात आले. कारण असे केले नसते तर `A’ गटातील पदांना पूर्णपणे ‘संशोधक’ पदाच्या रूपात पुनर्वर्गीकृत करता आले नसते आणि संबंधित मंत्रालयांकडून एफसीएस ची योजना, जी केवळ संशोधक (शास्त्रज्ञांकरिता) आहे, ती मंजूर झालीच नसती.
IISC, CSIR यांसारख्या संस्थांमधून शास्त्रज्ञांची निवड करताना त्यांच्यातील संशोधनविषयक क्षमता पारखून घेण्याकरिता UGC द्वारे निर्देशित कठीण चाचणी परीक्षेच्या अग्निदिव्यातून शोधून घेतले जातात. सर्वात बुद्धिवान उमेदवाराची निवड व्हावी याकरिता किमान अर्हता गुण हे उच्च असतात. पदोन्नतीकरिता आरक्षण ठेवले जात नाही, परंतु IMD चे स्वयंघोषित ग्रुप-A शास्त्रज्ञ या प्रकारच्या कोणत्याही प्रक्रियेला सामोरे जात नाहीत किंवा CSIR/ UGC द्वारे शास्त्रज्ञांकरिता अनिवार्य राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देत नाहीत, पण संपूर्ण सेवेमध्ये केवळ एकच प्रशिक्षण पूर्ण करतात आणि हे सर्व याचकरिता होते. कारण IMD चे उमेदवार Meteorologist-II च्या पदाकरिता निवडले जातात, शास्त्रज्ञ म्हणून निवडले जात नाहीत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरिता 3-4 वेळा ‘केंद्रीय सतर्कता आयोगा’कडे दाद मागण्यात आली, परंतु आयोगाकडून आतापर्यंत काहीही कारवाई झालेली नाही.
बदलणाऱया हवामानामुळे येणाऱया संकटाचा सामना सर्वांनाच करावा लागतो आहे. अशा कठीण समयी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नेमक्या जबाबदाऱया काय आहेत? या विभागत नेमकं काय संशोधन कार्य होतं आहे? बदलत्या हवामानानुसार हे कधी बदलणार?
‘इंटरनॅशनल मीटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन पुरस्कार’प्राप्त प्रो.जगदीश शुक्ल यांच्या विचारानुसार, ‘‘भारत हवामानशास्त्र विभागाचे सांख्यिकीय मॉडेल हे अमेरिका व युरोपच्या डाटावर आधारित आहे. हे मॉडेल हिंदुस्थानातील हवामानाच्या अंदाजाकरिता अयोग्य आहे. गेल्या वीस वर्षांत जगभरातल्या हवामानाच्या अंदाजात कमालीची सुधारणा झालेली आहे, पण हिंदुस्थानातील हवामान अंदाजाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. हिंदुस्थानी उपखंडाचा विशेष अभ्यास करून स्वतःचे मॉडेल तयार करणे अत्यावश्यक आहे.’’
हवामानाबाबत आपल्याकडे ‘संशोधन’ आणि ‘संकलन’ हे दोन वेगवेगळे भाग मानले जातात. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पसरवण्यात आलेल्या उपकरणांच्या जाळ्यातून जमा झालेली माहिती संकलित करण्याची जबाबदारी 1785 पासून कार्यरत भारतीय हवामान विभागाकडे आहे. जमा झालेल्या माहितीवर संशोधन करण्याची जबाबदारी 1962 पासून कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटिओरॉलॉजी (आयआयटीएम), पुणे यांच्याकडे आहे. या दोन्ही खात्यांकडे शेतकऱयांपर्यंत हवामानाचा अंदाज थेट जनतेपर्यंत पोहोचविणारी कोणतीही यंत्रणा नाही. परिणामी ढगफुटीसारख्या घटनांचा अंदाज न वर्तवता आल्याबद्दल जबाबदार धरल्यास दोन्हीही खाती जबाबदारी झटकताना दिसतात.
ज्याप्रकारे युरोप, चीन, जपान आणि कोरियामध्ये अचूक हवामान देण्याकरिता संशोधन होते आहे, त्याच प्रकारे हिंदुस्थानात व्हावे याकरिता हवामानशास्त्र विभागाला जबाबदार ठरविण्याकरिता जनतेने दबाव टाकणे अत्यंत जरुरीचे झाले आहे. या लोक अभियानाने जर हवामानशास्त्र विभागातील संशोधनाच्या प्रक्रियेची हवा योग्य दिशेला वळली तर येणाऱया काळात शेतकऱयांच्या आयुष्यात नक्कीच सुधारणा होईल.
(लेखक पुणे हवामान तज्ञ आहेत.)
[email protected]





























































