कवडसे : अनोळखीतील ओळख…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

एक दिवस नेहमीच्या वाटेवर सहज चालत असताना अचानक एक अनोळखी वळण दिसलं…आणि त्या अनोळखी वळणावर एक अनोळखी रस्तासुद्धा होता. दूर दूर जाणारा… मी क्षणभर थांबलो त्या वळणावर आणि अचानक ते अनोळखी वळण आणि तो दूर जाणारा रस्ता मला साद घालतोय असं वाटलं. मी नेहमीची वाट सोडून त्या वळणावर चालू लागलो. हळूहळू चालता चालता खूप दूर चालत आलो. नेमपं कुठे जात होतो मी, काहीच ठाऊक नव्हतं. कारण जिथे जायचं आहे ते ठिकाणसुद्धा अनोळखीच होतं. काय शोधत होतो मी तिथे…? एक अनोळखी क्षितिज की एक अनोळखी गाव? कधीतरी आपल्या कल्पनेत येऊन गेलेलं, कधीतरी स्वप्नात पाहिलेलं. उत्तर काही सापडत नव्हतं, पण प्रवास मात्र सुरू झाला होता. चालता चालता अनोळखी शेतातील ओळखीची हिरवळ डोळ्यांना सुखावत होती, तर कधी अनोळखी वाऱयाच्या सवे येणारे ओळखीचे दरवळसुद्धा मनाला धुंद करून जात होते.

दुपार झाल्यावर नेहमीच्या उन्हाच्या तडाख्यात अनोळखी झाडाखाली उभं राहिल्यावर मला त्या उन्हापासून जपणाऱया सावल्या मात्र ओळखीच्या वाटल्या. काही क्षण सावलीत विसावा घेऊन पुन्हा पुढे पुढे चालत गेल्यावर अनेक अनोळखी रस्ते, अनेक अनोळखी वळणे पार करत करत मी एका अनोळखी क्षितिजाच्या उंबरठय़ावर आलो. जिथे सगळं काही अनोळखी असून मला ओळखीचं वाटत होतं. अनोळखी नदीचे ओळखीचे किनारे. अनोळखीच्या क्षितिजावर मावळणारी ओळखीची सांज. अनोळखी पक्षी, पण त्यांचा ओळखीचा किलबिलाट. अनोळखी क्षणी वाटणारी ओळखीची हुरहूर. अनोळखी रस्त्यावर चालताना भेटलेल्या ओळखीच्या आठवण खुणा. भवताल अनोळखी असूनही माझ्याशी बोलू पाहत होता. हे सगळेच अनोळखी क्षण माझ्याशी एक नातं जोडू पाहत होते. मी मात्र अजून शांत होतो, स्थिर होतो. माझं मन फारसं काही बोलत नव्हतं. जे रोज ओळखीच्या वाटेवर ओळखीच्या क्षणांशी खूप भरभरून बोलायचं, तेच मन इथे आल्यावर खूप शांत होतं. माझ्या मनातला अबोला का होता? हा प्रश्न मीच मला विचारत होतो.

हळूहळू संध्याकाळ गडद होत गेली आणि एक अनोळखी कातरवेळ माझ्या मनाला ओळखीची भासू लागली होती. ती वेळ माझ्याशी बोलू पाहत होती. माझ्या मनाशी तिला संवाद साधायचा होता जणू. मी मनातल्या मनात विचार करू लागलो, हे सगळे अनोळखी क्षण असले तरी या वाटेवर येताना त्यांनी किती साथ दिली मला! कुठेही रस्ता न चुकता मी माझ्या ओळखीची संध्याकाळ समोर पाहतोय, जी नेहमीच्या वळणावरसुद्धा मला भेटायला यायची आणि माझ्यासमोर आता जे अनोळखी क्षितिज आहे ते खूपदा माझ्या मनाने कल्पना केलेलं असायचं. कधीतरी स्वप्नातसुद्धा दिसायचं. ओळखीच्या उन्हातल्या त्या अनोळखी सावल्या, ओळखीच्या संध्याकाळची ही अनोळखी हुरहूर हे तर सांगत नसेल ना माझ्या मनाला की, कधी कधी नेहमीच्या वाटेवर चालता चालता काही अनोळखी वळणं, काही अनोळखी वाटा आपली वाट पाहत असतात. कारण त्यांनाही आपली ओळख करून घ्यायची असते आणि कधी कधी आपणही नेहमीच्या वाटेवर चालता चालता रस्ता चुकलो तर अनोळखी रस्त्यावरसुद्धा आपलं कुणीतरी ओळखीचं असावं, जे आपली वाट चुकू न देता आपल्याला बरोबर त्याच ओळखीच्या क्षितिजाच्या उंबरठय़ावर पोहोचवतं. ओळखीची तीच सांजवेळ आणि ओळखीची तीच हुरहूर आपल्याला भेटायला स्वतःचा रोजचा रस्ता बदलून अनोळखी वळणावर भेटायला येईल. त्यांची ओळख आपण विसरू नये म्हणून ते क्षितिजसुद्धा आपल्याला अनोळखी रस्त्यावर येऊन आपली ओळख करून देईल.
– [email protected]