
>>महेंद्र पाटील
नातं म्हणजे एक गोड बंधन… एक विश्वास. नातं म्हणजे दोन जिवांना जोडणारा एक श्वास… एक धागा. अशीच सुंदर नाती
आपल्याला जन्मापासून मरणापर्यंत पावलोपावली भेटतात आणि कळत-नकळत आपण अनेक नात्यांमध्ये बांधले जातो. बांधलेली नाती जपत जातो. त्या नात्यातली मनं जपतो. खूप आधार असतो त्या नात्यांचा. मग त्यातच आपल्याला भेटतो आयुष्याचा जोडीदार. जो कुठल्या तरी वळणावर आपली वाट पाहत असतो आणि एक दिवस तो चेहरा समोर येतो. खरं तर त्याची आणि आपली ओळखही नसते, पण पहिल्या भेटीपासूनच तो हवाहवासा वाटतो. त्याच्याशी जुळायला अधीर झालेलं नातं मनात घर करून राहतं. देवानेच आपल्यासाठी हा जोडीदार निवडला असेल असं मानून आपण प्रेम करू लागतो त्या व्यक्तीवर.
मग एक दिवस असा येतो, ज्या दिवशी त्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारून आयुष्याची वाट त्याच्यासोबत चालायची असं ठरवून टाकतो आणि त्याच्या हातात हात देऊन कायमचं त्या नात्यात बांधले जातो, पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. थोडं पुढं चालत गेल्यावर लक्षात येतं की, आपल्या सोबत चालणारा आपला जोडीदार या प्रवासाच्या लायक नाहीये. त्याची पावलं अडखळतात, वेग मंदावतो आणि आपलंही आयुष्य त्या वळणावर येऊन थांबतं तेव्हा जाणीव होते की, आपल्या वाटा कुठेतरी वेगळय़ा होत्या, पण एकत्र येण्याचा अट्टाहास केला गेला. अचानक येणारं वादळ जसं सगळं अस्ताव्यस्त करून जातं, तशीच आपली अवस्था होते अन् मनात सजवलेल्या सुंदर स्वप्नांचा चुराडा होतो. त्या विस्कटलेल्या स्वप्नांच्या पालापाचोळय़ात आपण सुखाचे कण शोधू लागतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. कारण सुख खूप दूरवर गेलेलं असतं. तिथवर प्रवास करायला सोबतच कोणी नसतं. जोडीदार सोबत असूनही आपण एकटे असतो. हा एकांत एकटेपणातल्या एकांतापेक्षाही जास्त त्रासदायक असतो. ही घुसमट आपल्या हातात हात घेऊन चालणाराच ओळखू शकत नसेल तर काय उपयोग अशा नात्याचा?
काही नात्यांचे ओझे,
आपण उगीच वाहत असतो
जीवनाचे सुरेल गाणे,
न गाताच जगत असतो
पण का? कशासाठी? कुठपर्यंत ही जीवघेणी फरफट? नातं म्हणून जे जपलं जातं त्याच नात्यानं असा घात केल्यावर काय करायचं? या प्रश्नाला उत्तर सापडत नाही.
एकीकडे नाते म्हणून ज्यात बांधले गेलो आहोत अशी नाती फिकी पडत असताना ज्याच्याशी काही घेणेदेणे नाही अशी माणसे एखाद्या अस्वस्थ वळणावर भेटतात. त्यांना आपली घुसमट कळते आणि आपल्या बेचैन मनाला ते आधार देऊ लागतात. खरं तर त्यांना आपल्या आयुष्यात येऊन दोन दिवसही झालेले नसतात, पण जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखे ते भासतात. आपलं मन त्या क्षणिक आनंदात सुख शोधण्यात रममाण होतं. क्षणिकच! कारण पुन्हा आपल्याला आपल्या वाटेवर यावंच लागतं. सुखाचे चार क्षण येतात आणि मनाला गोड चाहूल देऊन जातात. असे क्षण देणारी माणसे देवाने खूप दूर ठेवलेली असतात. आपल्याला मनातून लाख वाटत असते तरी ती नाती परकीच राहतात. म्हणून असं वाटतं की, देव सर्वसंपन्न गुणांनी युक्त आहे म्हणून आपण त्याला देव म्हणतो, पण तरीही त्याला आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतला ‘जोडय़ा लावा’ हा प्रश्नच नीट सोडवता येत नाही हेच खरं. कधी कधी खूप चुकीच्या जोडय़ा तो लावून बसतो, पण या चुकीमध्ये गुरफटलेली मनं धुमसत राहतात आतल्या आत आणि त्यातूनच जन्माला येतात असंख्य शापित नाती.




























































