मानवी मेंदू होणार कॉपीपेस्ट

>> महेश कोळी

एखादा मजकूर कॉपी-पेस्ट करावा तसा मानवी मेंदू कॉपी-पेस्ट करता आला तर काय होईल? ही केवळ कविकल्पना नाही, तर त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मर्यादित स्वरूपात त्याला यशही आले आहे. अशा प्रकारे मेंदू डाउनलोड करता आला तर तो एखाद्या यंत्रात किंवा यंत्रमानवात डाउनलोड करून माणसाला कार्यमुक्त करता येईल, असे सांगितले जाते. अर्थात, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्याचे शतक संपलेले असेल. या प्रक्रियेला समर्थन देणाऱयांचा जसा गट आहे, तसाच याला विरोधही होत आहे. कारण या प्रक्रियेचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत.

मानवी मेंदूचे संगणकीय मेमरीत रूपांतर करून तो संग्रहित करण्याचे काम 2045 पर्यंत सुरू होईल. या संकल्पनेला जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांचा पाठिंबा मिळाला आहे; परंतु आपण ज्याला विज्ञान व्यवहारात येणे म्हणतो, त्या टप्प्यापर्यंत हे संशोधन या शतकाच्या अखेरीपर्यंत पोहोचेल असे वाटत नाही. अर्थात, या दिशेने सुरू असलेल्या संशोधनास मिळालेले मर्यादित यश पाहता, ती केवळ कविकल्पनाही राहिलेली नाही, हे निश्चित. या संकल्पनेला शास्त्राrय आधार लाभला आहे आणि मानवी मेंदूच्या स्मृतीचे रूपांतर अशा माध्यमामध्ये करता येईल, जिथे तिला डिजिटल रूप देऊन पोर्टेबल करता येईल आणि एखाद्या चिपमध्ये किंवा संगणकात साठवून ठेवता येईल. हे सगळे प्रत्यक्षात घडेल असे आपण आता म्हणू शकतो. मानवी मेंदूचे हे नवे रूप एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पाठविण्यासाठी ते अपलोड करता येईल आणि दुसरीकडे ते डाउनलोड करण्याचे तंत्रही विकसित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही. या दिशेने सुरू असलेले संशोधन आणि प्रयोग गतिमान झाले असून, संकल्पना, सिद्धांत आणि अंशतः मिळालेले व्यावहारिक यश हे सर्व जमेत धरूनसुद्धा ते व्यवहारात उतरण्यास सात ते आठ दशके लागतील.

मानवी मेंदू अपलोड करण्यात जेव्हा पूर्णतः यश मिळेल, त्यावेळी मिळू शकणारे फायदे आणि होऊ शकणारे तोटे याविषयी शास्त्रज्ञांनी आतापासूनच विचार करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यापूर्वीच त्यामुळे होऊ शकणाऱया नुकसानीचा आणि वाढणाऱया चिंतांची काळजी त्यांना आतापासूनच आहे. मानवी मेंदूची क्षमता अमर्याद आहे, असे सामान्यतः म्हटले जाते. मानवी मेंदूत जेवढय़ा गोष्टी संग्रहित करून ठेवता येतात, तेवढय़ा गोष्टी एकत्र सांभाळून ठेवणे एखाद्या महासंगणकालाही शक्य नाही. असे मानणे कदाचित योग्यही असू शकेल किंवा त्यात थोडासा अतिरंजितपणाही असू शकेल. परंतु वर्षानुवर्षे ज्या मेंदूत गरज असलेल्या आणि नसलेल्या अनेक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात, अशा मेंदूत प्रमाणापेक्षा अधिक सामग्री साचलेली असते ही गोष्ट मात्र निश्चित आहे. ज्या लोकांच्या मेंदूत अशा गोष्टींचा संचय सर्वाधिक असेल, अशा मेंदूंमधील सामग्रीची संगणकीय प्रतिलिपी तयार करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. सामान्यतः एका मेंदूतील माहिती संकलित करण्यासाठी 1000 टेराबाइटपेक्षा अधिक जागा लागेल, असा अंदाज आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, की ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी संगणकाची सध्याची माहिती कॉपी करण्याची गती किमान 1000 पटींनी वाढविली पाहिजे. ही प्रक्रिया गतिमान केल्याखेरीज मानवी मेंदू संगणकात उतरविणे केवळ अशक्य आहे. संगणकाची कॉपी करण्याची गती सध्याच्या गतीपेक्षा 1000 पटींनी वाढविण्याचे उद्दिष्ट येत्या वीस-तीस वर्षांत गाठता येऊ शकेल. परंतु डाउनलोड केलेल्या मेंदूकडून काम करवून घेण्यासाठी आणि काम करणार्या मेंदूला वेळोवेळी अपडेट करण्याची प्रक्रिया विकसित करण्यासाठी खूपच अधिक कालावधी लागणार आहे. हे सगळे शक्य झाल्यावर “मेंदू घरी ठेवून कामावर येता की काय?’’ हे बॉसचे वाक्य केवळ वाक्प्रचार राहणार नाही, तर ही बाब प्रत्यक्षात उतरू शकेल. कारण असे घडल्यास ज्या व्यक्तीच्या मेंदूचा ऑफिसमध्ये जास्त उपयोग आहे, तो मेंदू ऑफिसमध्ये काम करीत असताना संबंधित व्यक्ती कुठेतरी मौजमस्ती करीत असेल.

संगणकीय भाषेत सांकेतिक लिपीमध्ये लिहिलेला प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर मानवी मेंदूसारखे बनविणे अत्यंत अवघड तसेच काwशल्य, वेळ आणि पैशाच्या दृष्टीने अत्यंत खर्चिक असेल. त्यामुळे रेडिमेड नैसर्गिक मेंदूतील पेशींचे मॉडेल बनविणे, मेंदू स्पॅन करणे आणि नंतर तो अपलोड करणे ही प्रक्रिया शास्त्रज्ञांसाठी अधिक सोपी जाईल, असे मानले जाऊ लागले आहे. अशा प्रकारे एखाद्याचा मेंदू एखाद्या यंत्रमानवात डाउनलोड केला, तर कदाचित एखादी व्यक्ती निवृत्त झाल्यानंतरही तिचा डाउनलोड केलेला मेंदू यंत्रमानवाच्या माध्यमातून कार्यरत राहू शकेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीला कामावर ठेवण्याच्या तुलनेत ही प्रक्रिया अत्यंत स्वस्त असेल. हे तंत्रज्ञान सर्रास वापरण्याइतके सामान्य झाले तर अवघ्या पाच वर्षांत उद्योगधंद्यांमध्ये मानवी मेंदू आणि यांत्रिक देह असणाऱया कामगारांची आणि अधिकाऱयांची फौज उभी राहिल्याचे दिसून येईल.

सामान्यतः बहुतांश शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, अशी परिस्थिती आल्यास ती शेकडो कोटी लोकांना कार्यमुक्त करेल. अनेक कामे अशी असतील, ज्यासाठी माणसाला सदेह उपस्थित राहणे आवश्यक नसेल. आभासी किंवा व्हर्च्युअल दुनियेतच कामकाज चालेल. भौतिक उपस्थिती आवश्यक असलेल्या जागांवरही मानवी बुद्धिमत्तेने युक्त यंत्रमानव काम करतील. एपंदरीत, कामकाजाच्या दुनियेत ब्रेन अपलोडिंगचे तंत्रज्ञान आल्यास ते माणसाला कामापासून बर्याच अंशी वेगळे काढेल. बहुतांश खासगी आणि सरकारी पंपन्या एम्युलेशनचे तंत्रज्ञान आणून कर्मचाऱयाची बुद्धी भाडय़ाने घेऊन कामकाज करतील. माणसाचा देह आणि नैसर्गिक मेंदू ज्ञानसंचयाच्या किंवा बुद्धिविकासाच्या कामाची नर्सरी म्हणून काम करेल, अशीही शक्यता आहे. जेव्हा मेंदूचा पर्याप्त विकास होईल, तेव्हा एखाद्या पिकाची कापणी करावी, तसा माणसाचा तो मेंदू डाउनलोड करून घेतला जाईल आणि कॉपी-पेस्ट करून गरजेप्रमाणे त्याचा वापर केला जाईल.
ब्रेन अपलोड तंत्रज्ञान आल्यानंतर अनेक प्रकारचे बदल जगात घडणे अपेक्षित आहे. मानवजात एक नव्या प्रकारचे स्वातंत्र्य आणि उन्मुक्त जीवनाचा आस्वाद घेईल. माणसाकडे भरपूर वेळ उपलब्ध होईल. लोक अधिक सामाजिक होतील. उत्पादकदा द्विगुणीत होईल आणि लोक झटपट श्रीमंत होत जातील. प्रत्येकाकडे व्यक्तिगत धनसंचय मोठा असेल. गुलामी हा शब्दच हद्दपार झालेला असेल. ध्रुवीकरण, कट्टरता कमी होईल. धर्माचा मानवी जीवनातील हस्तक्षेप मर्यादित होईल. जातिभेद आणि वर्णभेदाचे उच्चाटन होईल. परंतु एवढे सगळे होऊनसुद्धा जगात सर्वत्र आनंदीआनंद असेल, असेही मानता येत नाही. कारण तोपर्यंत जलवायूचा प्रकोप प्रचंड वाढलेला असेल. नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील संघर्ष बराच काळपर्यंत चालेल. बचावाचे कितीही उपाय योजले तरीही संसर्गजन्य आजार सातत्याने वाढत जातील आणि लाखो लोकांना गिळंकृत करतील. अशा काळात मानवी मेंदू अपलोड करण्याच्या तंत्रज्ञानामुळे अनेक व्यक्ती एकाच वेळी कार्यमुक्त राहिल्या तर ते अराजकाला निमंत्रण दिल्यासारखेही ठरेल. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने समाजात रुजवली गेली पाहिजे, जेणेकरून मोठा धक्का समाजाला बसणार नाही. या गोष्टीकडे शास्त्रज्ञांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या काळात ही प्रक्रिया फारशी यशस्वी होणार नाही, असे मानणारा तसेच या प्रक्रियेला विरोध करणारा एक वर्ग वेगाने विकसित होत असून, त्यात शास्त्रज्ञांचाही समावेश आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.

मानवी मेंदू खरोखर पूर्णपणे कॉपी-पेस्ट होईल का आणि तो एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पाठविता येईल का, याबाबत आताच खात्री देता येत नाही. काहीजण असे मानू लागले आहेत, की ही अमरत्वाची पहिली पायरी असेल. म्हणजे देह नष्ट झाला तरी मेंदूरूपाने किंवा एका देहातून दुसऱया देहात जाऊन व्यक्ती शतकानुशतके जिवंत राहू शकेल. हे देह नैसर्गिकही असू शकतील किंवा यांत्रिक असू शकतील. अमरत्वाच्या जवळपास पोहोचण्याची आणि यंत्रमानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी समाजावर पूर्णपणे कब्जा करण्याची ही प्रक्रिया सुमारे दोनशे वर्षे चालू शकेल; परंतु तोपर्यंत या प्रयोगाला यश आले तर असामान्यत्व प्राप्त करण्याची (सिंग्युलॅरिटी) प्रक्रिया खूपच गतिमान होईल असे मानले जाते. तूर्त असे मानता येऊ शकते की, मानवी मेंदू डाउनलोड करण्यात यश मिळाल्यास मानवाप्रमाणे निर्णय यंत्राद्वारे घेण्याची तसेच हुबेहूब माणसासारखे काम करणारे अतिकुशल यंत्रमानव तयार करण्याची प्रक्रिया सोपी होईल.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या