
>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट
रंगीबेरंगी राजस्थान म्हटलं की, बांधणी साडी आठवते. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी जास्त वापरली जाणारी आणि जास्त आवडणारी बांधणी ही साडी आता मात्र सगळ्यांनाच आवडू लागली आहे. या साडीच्या खास प्रिंटमुळेच याची मागणी सतत वाढत असून दुपट्टे, लहंगा, ओढणी, चुनरी यासाठी याची खास मागणी असते.
‘बांधणी’ या शब्दाचा अर्थ असा आहे की बांधणे. बांधणी बनवताना प्रथम पांढऱ्या कपडय़ाला रंगवून नंतर सुकविले जाते आणि त्यानंतर त्याच्यावर प्रिंटचं काम केलं जातं. बांधणी बनवताना कपडय़ाला वर उचलून त्याचे मोतीसारखे गोलाकार आकार बनवून त्याला प्रथम हलक्या रंगात रंगवलं जातं आणि नंतर पुन्हा गडद रंगांनी रंगवलं जातं. म्हणूनच बांधणीच्या साडय़ा बनवताना त्याचे रंग आणि त्याचे मोतीक सर्वात जास्त महत्त्वाचे असतात आणि त्या रंगाने केलेला जो एकसंधपणा असतो तो प्रत्येक साडीत बघण्यासारखा असतो.
पारंपरिक घरचोळा साडी हा लोकप्रिय बांधणी साडीचा एक प्रकार आहे. घरचोळा त्याच्या विशिष्ट ग्रीड पॅटर्नने ओळखला जातो. प्रत्येक चौकोनी बांधणी डिझाइन दाखवते. या प्रिंटसाठी सुती, जॉर्जेट आणि शिफॉनचा कपडा वापरला जातो. बांधणी ही प्रिंट अतिशय जुन्या जमान्यापासून प्रसिद्ध आहे. ही साडी बनवताना अनेक व्यक्ती मिळून ही साडी बनवत असतात. बंदेज, लहरिया या इथे प्रसिद्ध असणाऱया वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत. बांधणीमध्ये वापरले जाणारे रंग हे जास्त करून वनस्पतीपासून तयार केलेले असतात. जेवढी जास्त बारीक डिझाईन तेवढी त्या साडीची किंमत जास्त असते.
ही साडी मराठी, गुजराती पद्धतीने पदर घेऊन नेसता येते. गुजराती पद्धतीने साडी नेसली तर त्याच्या पदराची जी डिझाईन असते ती समोर छान दिसते. साडीवर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी वापरू शकता. हेवी ज्वेलरी, हेवी नेकलेस घालू शकता. तसेच जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालून ही साडी नेसणार असाल आणि ब्लाऊजचा गळा गोल असेल किंवा डीप असेल तर तुम्ही लॉन्ग इअरिंग्स वापरा. गळ्यात काही घातलं नाही तरी चालेल. हातामध्ये एक-दोन कडे घाला. माथापट्टी, मांग टिका हादेखील या साडीवर छान दिसतो.
कसा कराल मेकअप
मेकअप करताना फाऊंडेशनचा बेस नेहमीप्रमाणे करून साडीच्या रंगाप्रमाणे आयशाडो लावली तसेच मॅचिंग लिपस्टिक लावली तर तीदेखील या साडीवर छान दिसते. बांधणी साडी जर डार्क रंगांमधील असेल तर खूप हेवी आयशाडो न लावता थोडं नॅचरल आयशाडो लावा. तसेच रुज आणि ग्लिटरचा वापर नक्की करा. हायलाईटर वापरून तुम्ही तुमच्या चेहऱयाचे काही भाग हायलाईट करू शकता. तसेच हेअर स्टाईल करताना केस मोकळे सोडून, स्ट्रेटनिंग, अंबाडा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोकळ्या केसातील कल्स केल्यासही या साडीवर हेअर स्टाईल चांगली दिसू शकते. नववधू म्हणून जर ही साडी नेसणार असाल, तर त्या दिवशी मात्र आयलॅशेस, तसेच लेन्सचा वापर करा. जेणेकरून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य आणखीन वाढेल. या साडीवर गजऱयापेक्षाही आर्टिफिशियल हेअर ज्वेलरीचा वापर केलात तर तुमच्या हेअर स्टाईलमध्ये एक वेगळा लुक निर्माण होईल.

























































