
>> ममता क्षेमकल्याणी
काही पालक आपल्या विशेष किंवा अपंग मुलांचा स्वीकार खूप सकारात्मकपणे करतात. अजितच्या आईनेदेखील खूप जिद्दीने त्याला घडवले, पण ‘ईडार्च’मुळे अजितला पहिल्यांदा रोजगाराची संधी प्राप्त झाली आणि त्या माऊलीचे कष्ट सार्थकी लागले. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत उभा राहिलेला अजित खऱया अर्थाने ‘अजित’ ठरला!
आपला मुलगा विशेष आहे, या वास्तवाचा माधवी कुंटे यांनी स्वीकार केला आणि एक जागरूक पालक या भूमिकेतून त्यांनी अजितची जडणघडण केली. 40 वर्षांचा अजित पदवीधर असून त्याला राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.
अजितच्या आईच्या आयुष्यात एक-दोन प्रसंग असे आले की, त्या जिद्दीने ती माऊली कणखरपणे पेटून उठली. अजितला बसणं किंवा उभं राहणंदेखील जमत नव्हतं. अशात अजितला घेऊन कोणत्याही समारंभात सहभागी होताना माधवीताईंना त्याची खूप काळजी घ्यावी लागत असे. असेच एकदा एका लग्नकार्यात अजितला एका ठिकाणी ठेवून त्याचा वरणभात आणण्यासाठी माधवीताई दुसऱया खोलीत गेल्या, त्यावेळी आपली आई दिसत नसल्याने अजितने रडत रडत आणि अर्थातच जमिनीवर सरकत सरकत आईला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे असलेल्या एकाही नातलगाने त्याला उचलून घेतलं नाही की त्याची मदत केली नाही. या प्रसंगामुळे खोलवर दुखावल्या गेलेल्या माधवीताईंनी मोठय़ा जिद्दीने अजितला पदवीधर केलं. वयाच्या पाचव्या वर्षी त्याची शस्त्रक्रिया करून त्याला बसता यावं यासाठी आणि चालता यावं यासाठी खूप कष्ट घेतले. त्याला स्वावलंबी केलं. अजितच्या आईने स्वतः फिजिओथेरपी शिकण्यापासून अनेक गोष्टी केल्या.
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शाळेतून अजितने शिक्षण घेतलं. अजित शाळेत जायला लागला तेव्हापासून म्हणजे त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याची आईदेखील त्याच्याबरोबर शाळेत बसत असे. कारण अजित आधाराशिवाय बसू शकत नव्हता आणि त्याची मान आणि डोळेदेखील बरेच तिरके होते, पण या सगळ्यात आपल्या मुलाची श्रवणशक्ती आणि पर्यायाने स्मरणशक्ती अफाट आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच अगदी लहान असल्यापासून अजितला भरपूर गोष्टी, कविता, श्लोक हे सगळं वाचून आणि म्हणून दाखवलं जात असे. वही पेन घेऊन स्वतः व्यवस्थित लेखन करू न शकणारा अजित आपल्या श्रवणशक्तीच्या जोरावर थेट त्याच्या मेंदूतच अक्षरे गिरवत होता. व. पु. काळे, शंकर पाटील, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके आणि कॅसेट्स यामुळे अजित स्वतःदेखील उत्तम कथानक करायला शिकला.
‘ईडार्च’मध्ये आल्यावर स्वावलंबी अजितला रोजगार मिळाला आणि त्याच्या आईने घेतलेल्या कष्टाला समाधानाची जोड मिळाली.
कारण ‘ईडार्च’मध्ये आल्यावर अजितच्या व्यक्तिमत्त्वासाठी एक नवीन दालन खुले झाले. इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आणि त्यावर काम करणारी इतर अपंग मुले पाहून अजितच्या मनात एकाच वेळी उत्सुकता आणि काहीशी धाकधूक अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. कथाकथन, साहित्य वाचन, लेखन अशा विषयांमध्ये रमणाऱया अजितसाठी मशीन्सचा खडखडाट खूपच नवीन होता.
यासंदर्भात ‘ईडार्च’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे सांगतात की, ज्या विशेष मुलांचे पालक त्यांच्या पाल्यांची जडणघडण अतिशय जागरुकतेने करतात त्यांनादेखील इथल्या कामात सहभागी करून घेताना आम्हाला काळजीपूर्वक काम करावे लागते. अशा मुलांच्या ज्या क्षमता अधिक उत्तम आहेत, त्यावर त्यांच्या जागरूक पालकांनी विशेष भर दिलेला असतो. ‘ईडार्च’मध्ये आम्ही या विशेष क्षमतांना अनुसरून त्या मुलांमध्ये तांत्रिक कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अजितच्या बाबतीत आम्ही नेमके हेच केले. त्याचबरोबर त्याच्या कौशल्यांचे कौतुक करून त्याला इथे रुळण्यासाठी मदत केली. अर्थात आमच्या या प्रयत्नांना अजितने सकारात्मक प्रतिसाद दिला.
इथे येणाऱया प्रत्येक नवीन मुलाला इथले काम समजून घेण्यासाठी, इथे रुळण्यासाठी पुरेसा वेळ नक्कीच दिला जातो. अजितने देखील सुरुवातीच्या दिवसांत मालाची मोजणी, पॅकिंग, सार्ंटग अशी वेगवेगळी कामं केली. त्यातून अजितला ‘ईडार्च’मधील कामाची गोडी निर्माण झाली.
एकही दिवस न चुकता अजित ठरलेल्या वेळी सेंटरला येऊ लागला. पाहता पाहता अजितला ‘ईडार्च’मध्ये येऊन एक महिना झाला. त्यावेळी हातात मिळालेल्या पगारामुळे अजितला झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणं खरंच अवघड आहे. ‘‘मी काहीतरी करतो आहे’’ हा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाल्यामुळे अजितच्या वर्तनाला आणखी एका सकारात्मकतेचा पदर प्राप्त झाला. कामाच्या पहिल्या अनुभवातून मिळालेली ही स्वकमाई अजितबरोबर त्याच्या पालकांसाठीदेखील दिलासादायक ठरली. ‘ईडार्च’मध्ये मिळणारा पगार, दिवाळीचा बोनस या सगळ्याबद्दल अजितच्या नातलगांमध्येदेखील चर्चा होऊ लागली. आपला विशेष मुलगा इतर नातलगांच्या सामान्य मुलांप्रमाणे नोकरी करतो, त्याला पगार मिळतो, बोनस मिळतो या गोष्टी त्यांच्यासाठी आनंददायी ठरल्या. अनेक कठीण टप्पे यशस्वीपणे पार करत अजित आयुष्यातल्या अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला की, जिथे त्याच्या आत्मविश्वासाला एक ठोस दिशा प्राप्त झाली. कारण एकेकाळी आधाराशिवाय नीट बसूदेखील न शकणारा, व्यवस्थित बोलू न शकणारा, एकटय़ाने चालू न शकणारा अजित ‘ईडार्च’च्या माध्यमातून खऱया अर्थाने स्वतःच्या पायावर उभा राहिला.
‘ईडार्च’ने अनेक विशेष आणि अपंग युवकांना तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांची यशोगाथा जाणून घेऊया पुढील भागात.
‘ईडार्च’च्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील किंवा परिचयातील दिव्यांग व्यक्तीचे खऱया अर्थाने पुनर्वसन करण्यासाठी संपर्क करा – दिलीप देशपांडे, 9823082671, 9850924747
z [email protected]





























































