आगळं वेगळं – गुलाब शेती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

प्रेम व्यक्त करायचं म्हटलं की, डोळ्यांसमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फूल, परंतु गुलाबाला मोठा आणि रंगीत भूतकाळ आहे. हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांत अनेक प्रकारच्या गुलाबांची पैदास केली जाते.

गुलाबाला मोठा आणि रंगीत भूतकाळ आहे. संशोधकांना मिळालेल्या पुराव्यांनुसार गुलाब सुमारे 350 लाख वर्षांपासून आहे. मात्र बागेमध्ये गुलाबांची लागवड करणे हे बहुधा चीनमध्ये सुमारे 5000 वर्षांपासून सुरू झालं असावं. रोमन काळात गुलाबांची मोठय़ा प्रमाणात लागवड मध्यपूर्व देशांमध्ये होत होती. समारंभांमध्ये वर्षाव करण्यासाठी, औषध म्हणून आणि अत्तरं बनवण्यासाठी गुलाब वापरले जात. रोमन खानदानी लोकांनी दक्षिण रोममध्ये गुलाबाच्या मोठय़ा सार्वजनिक बागा फुलवल्या. रोमन राजवटीनंतर गुलाबांची लोकप्रियता कमी जास्त होत राहिली.
15 व्या शतकात वेगवेगळ्या गटांमध्ये इंग्लंडवर राज्य करण्यासाठी लढाया होऊ लागल्या. पांढरा गुलाब यॉर्कचं प्रतीक होता आणि लाल गुलाब लॅंकॅस्टरचं. त्यामुळे या संघर्षाला ‘गुलाबांचं युद्ध’ म्हटलं जातं. 17 व्या शतकात गुलाब फुलांची मागणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढली की, राजघराण्यांनी गुलाब वा गुलाबपाणी यांना पैशांसारखं देवाणघेवाणीसाठी वापरणं कायदेशीर ठरवलं. नेपोलियनची बायको जोसेफाईन हिने तर तिच्या शातो द माल्मेसन या इस्टेटीवर, जी 1880 मध्ये पॅरिसच्या पश्चिमेकडे सात मैलांपर्यंत पसरलेली होती, अनेक प्रकारच्या गुलाबांची अति मोठय़ा प्रमाणावर लागवड केली. पीएर जोसेफ रीदो याचं 1824 मध्ये जलरंगात काढलेलं ‘ल रोझ’ चित्र बॉटनीतील सगळ्यात चांगलं उदाहरण मानलं जातं.

युरोपला चीनमधे लागवड केलेल्या गुलाबांची ओळख 18 व्या शतकाच्या शेवटापर्यंत झाली नव्हती. आताची गुलाब फुलं यांचे वंशज आहेत. या नवीन फुलांची उपज जुन्या फुलांवर संस्कार करूनच झाली आहे. गुलाबांची लोकप्रियता आताच्या काळात पुन्हा एकदा वाढलेली आहे.

हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांत अनेक प्रकारच्या गुलाबांची पैदास केली जाते – गुलाबी गुलाब, पांढरा गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब, केशरी गुलाब, किरमिजी गुलाब इ.

डच गुलाब हा एक असा प्रकार आहे की, जो सगळ्यांनाच आवडतो व टिकाऊही आहे. ही शेती 8 ते 10 वर्षे नियमितपणे गुलाबाचं उत्पादन देते. हे एक महत्त्वाचं व्यापारी उत्पादन आहे, जे ‘ग्रीन हाऊस’मध्ये घेतलं जातं. शेतकऱयांसाठी डच गुलाब हे फायदेशीर उत्पादन ठरतं. कारण त्याला दर महिन्याला सुमारे 40 ते 45 हजार रुपये उत्पन्न मिळतं. दर अर्ध्या एकरला खर्च सुमारे 22 ते 25 लाख असतो आणि सुमारे 2.5 ते 3 वर्षांत ब्रेक इव्हन (उत्पन्न व खर्च समान) होतं.

पुण्याजवळच्या मावळमध्ये सध्या गुलाब शेती केली जाते. मावळ हा पुणे जिह्यातील अत्यंत सुपीक प्रांत. कधीकाळी स्वराज्य उभारणीसाठी रांगडे मावळे देणारी मावळची ही माती, आज प्रेमाच्या प्रतीकाला जन्म देत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत इथल्या शेतकऱयांनी गुलाब निर्मितीचा प्रयोग केला. अवघ्या काही वर्षांतच इथल्या दर्जेदार गुलाब पुष्पांच्या प्रेमात सातासमुद्रापलीकडील लोक पडले. म्हणूनच जगातील आठ देशांमध्ये आज मावळमधील गुलाब निर्यात केला जात आहे.

अनेक शेतकऱयांनी फुलशेतीचा निवडलेला पर्याय आणि त्यातून होणारा नफा इतर शेतकऱयांच्याही लक्षात येऊ लागला. मग त्यांनीही या फूलशेतीची कास धरली. आज तळेगाव दाभाडेत अशा विविध रंगी गुलाब पुष्पांचं उत्पादन घेणारी सुमारे 70 पेक्षा अधिक पॉलीहाऊस आहेत. त्याहूनही विशेष म्हणजे सर्व फूल उत्पादक गटशेती करून कोणत्याही एजंटाविना फुलांची विक्री करतात.
डच जातीची गुलाब शेती करणं फार कठीण नाही. कारण 5 गुंठे जागेतही पॉलीहाऊस उभारता येतं. सर्व नर्सरीमध्ये या फुलांची कलमं उपलब्ध आहेत. एक फूल निर्मितीसाठी तीन ते साडेतीन रुपये खर्च येतो. फुलांच्या गुणवत्तेनुसार एक फूल 10 ते 14 रुपयांपर्यंत विकले जाते. अनेक सणा-समारंभाच्या सजावटीसाठी फुलांची मागणी, दरवर्षी निर्यात केली जाऊ शकतील अशी एकरी 40 हजार फुलांची निर्मिती तब्बल एकरवर एकटय़ा मावळ प्रांतात केली जाते, तर दरवर्षी होणारी उलाढाल सुमारे 60 कोटी एवढी आहे. या व्यवसायात महिलांचाही मोठा वाटा आहे. स्वतःच्या बाळाप्रमाणे सांभाळ करत वाढविलेल्या फुलांना दुसऱयांच्या आनंदात सहभागी करताना आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो असं त्यांचं म्हणणं आहे.

z [email protected]