तीन शिल्पकृती

283

>> मंगल गोगटे

उंदीर हा तसा किळसवाणा प्राणी असला तरी उंदीर आणि माणूस यांचा एक वेगळाच संबंध आहे. मानवी आरोग्य आणि औषधांच्या संशोधनात उंदरांनी जी कामगिरी बजावली आहे ती माणसासाठी अनंत उपकारासारखीच आहे. माणूस आणि उंदीर यांच्या या नात्याचे दृश्य रूप हेलसिंकी, नोवोसिबिर्स्क आणि लंडन येथील उंदरांच्या शिल्पकृतीत प्रतिबिंबित झाले आहे.

हेलसिंकी
हेलसिंकीतील (फिनलंडची राजधानी) ‘नॅशनल अर्काइव्हज ऑफ फिनलंड’ची इमारत नीस्टॉर्म या वास्तुविद्याविशारदाने 1890 मध्ये पूर्ण केली. या देशाच्या सांस्कृतिक वारशाची माहिती नोंद करून ती जतन केली जाते. या इमारतीच्या प्रवेशाशी स्वागत करण्यास त्यांनी चक्क एक उंदीर निवडला. एका खांद्यावर बंदुकीप्रमाणे पेन्सिल घेतलेला आणि कागदपत्रावर सही करण्यास जय्यत तयार असलेला हा ‘हुशार उंदीर’, कलाकार आणि पंक रॉकर युर्की सिऊकोनेन याने बनवला. 2000 सालात तो तिथे लावला गेला. इथे भेट देणाऱया अनेकांच्या हा उंदीर लक्षात येत नाही. कारण त्याची जागा आणि आकार दोन्ही नजरेत येण्यासारखे नाहीत.

याच पुतळय़ाचा दुसरा भाग इमारतीच्या आत दुसऱया मजल्यावर आहे. खांद्यावर पेन्सिल घेतलेल्या उंदराच्या कट-कारस्थानातील तो भागीदार. एका जिन्याच्या बाजूला, एका तांब्याच्या पुस्तकावर चार पायांवर बसला आहे आणि त्याच्या भागीदारावर लक्ष ठेवून आहे. या पुस्तकावर एक लॅटिन म्हण लिहिली आहे ‘बोललेले शब्द उडून जातात, लिहिलेले शब्द राहतात.’ लिखित दस्तऐवजांच्या टिकाऊपणाचा संकेत देणारं हे वाक्य किती समर्पक आहे!

नोवोसिबिर्स्क
याचप्रमाणे नोवोसिबिर्स्क (सायबेरिया) या रशियातल्या एका गावात ‘सायटोलॉजी आणि जेनेटिक्स ऑफ रशियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’ येथे 1 जुलै 2013 रोजी उंदराचं एक शिल्प उभारण्यात आलं. आतापर्यंतच्या संशोधनात उंदरांनी जी कामगिरी बजावली त्याच्या सन्मानार्थ हा पुतळा उभारण्यात आला. रोगाचा अभ्यास करण्यापासून ते औषधं शोधण्यापर्यंतच्या सहप्रवासाचं हा पुतळा प्रतिक आहे.

हे उंदराचं शिल्प एका वयस्क बाईसारखं आहे. अगदी तिच्या नाकावरच्या चष्म्यासकट. हा पुतळा आणि भोवतालची बाग बनवण्यासाठीचा खर्च होता 50 हजार डॉलर्स.
माणसांबरोबर उंदीर 15 हजार वर्षे जगले आहेत आणि माणसांसारखेच असतात. मानवी शरीराच्या अभ्यासासाठी आणि त्यावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी (अगदी कॅन्सर ते अंतराळप्रवासापर्यंत) उंदीर वापरले गेले आहेत.

उंदरांनी त्यांच्या कामात कुचराई केलेली नाही. त्यामुळे माणूस आणि उंदीर यांच्यातील नात्याला सलाम म्हणून हा पुतळा उभारला आहे. कारण त्यांनी एकाच उद्दिष्टाने एकत्र काम केलं. या पुतळय़ाचा शिल्पकार अन्ड्रेई खारकेविच म्हणतो, ”एखादा शोध लागतो ती वेळ या शिल्पाने अंकित केली आहे.”

लंडन
लंडनमधील फिलपॉट लेनमध्ये दोन इमारतींच्या मधली जागा नीट पाहिली तर तिथे चीजच्या एका तुकडय़ाला कुरतडताना दोन उंदीर एका भिंतीवर दिसतात. हे लंडनमधलं सगळय़ात लहान शिल्प आहे.

इमारतीच्या एका फळीच्या तुकडय़ावरून कळतं की ही इमारत 1861-62 मध्ये बांधली आहे. एका मसाल्याच्या व्यापाऱयाचं ऑफिस म्हणून. पण हे शिल्प कधी तयार केलं हे माहिती नाही. या उंदरांची एक दु:खद कहाणीही आहे, पण तिच्या सत्यतेचा पुरावा मात्र नाही.

लंडनच्या एका मोठय़ा आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. ते जवळच्या स्मारकाच्या बांधकामासाठी उंचावर काम करत होते. त्यांची जेवणाची वेळ झाली. जेवणासाठी बसल्यावर एकाच्या लक्षात आलं की, त्याचं चीज सॅण्डविच कुरतडलेलं आहे. मग त्याने दुसऱयावर तो आळ घेतला. दोघांच्या भांडणात ते दोघेही खाली पडले व मृत्यू पावले. त्यानंतर कळलं की ते सॅण्डविच एका उंदराने खाल्लं होतं.

या दोघांच्या आठवणीसाठी हे शिल्प तयार केलं गेलं अशी कथा आहे. गोष्ट किती खरी वा किती खोटी हा वादाचा मुद्दा आहे आणि याचा शिल्पकारही अज्ञात आहे.
या तीन ठिकाणच्या उंदरांच्या शिल्पांबद्दलचं कौतुक असं की रशियातलं शिल्प हे स्मारक आहे तर लंडनचं आख्यायिकेसदृश गोष्टीतील कामगारांच्या भांडणाचं स्मारक आहे. तिसरं हेलसिंकीतलं शिल्प ही कल्पनेची भरारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या