ललित : दगू प्रसन्न व्यक्तिमत्त्व!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

परवा माझ्या आत्ते बहिणीकडे लग्न होतं. तिच्या मुलाचं, तिचं आग्रहाचं निमंत्रण होतं आणि जवळपास तीस-चाळीस वर्षांनंतर माझ्या बहिणी, भाऊ भेटणार होते ही उत्सुकता. शिवाय लग्न पुण्यातच होतं. त्यामुळं ही संधी घेण्याचं मी ठरवलं होतं. हे कुर्डुकर कुटुंब म्हणजेच माझ्या आत्याचं कुटुंब आंबेजोगाईचं. आम्ही लातूरला माझ्या बालपणी मी सुट्टीमध्ये तिथे नेहमीच वस्तीला असायचो. माझा समवयस्क भाऊ म्हणजे बंडू ऊर्फ उपेंद्र ते एक आकर्षण होतंच. बाकी बाळी, नानी, चिंगाराणी, बाळ ही टोपण नावे होती. तसेच दगू उपाख्य अरविंद हा भाऊ, मोठी धमाल यायची. एकतर आत्याकडे कायम माणसांचा राबता असायचा. आमचे काका म्हणजे बापू हे प्रख्यात वकील तर होतेच, शिवाय संघाचे पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्याकडे स्वयंसेवकांचा वावर असायचा. जेवणाच्या पंगतीला किमान दहा-बारा स्वयंसेवक असायचेच. थोडक्यात ते एक समृद्ध घर होते. या घरासमोरच मोठी आत्या राहायची. दोन्ही वाडे समोरासमोर असल्याने आमची येरझार असायची, हे चौसाळकर घराणे. रामराव, वसंतराव हे माझे ज्येष्ठ बंधू.

ही पार्श्वभूमी झाली. नंतरच्या काळात आम्ही सगळे विखुरले गेलो, भेटीगाठी नगण्य झाल्या. मधल्या काळात अनेक घडामोडी झाल्या. काही कानावर येत होत्या, तर काही निसटून जात होत्या. कोरोनाच्या काळात बंडू गेला, ही वाईट बातमी कानावर येऊनही जाता आले नाही. त्यामुळे या लग्नात सगळय़ांना भेटता येणे ही पर्वणी होती. कार्यालयात गेल्यावर सगळय़ांची, अगदी माझीदेखील ओळख पटणे अवघडच होते. कारण जवळपास चाळीस वर्षांनंतरची ही भेट होती. आम्ही सगळेच ‘म्हातारे’ या संबोधनाखाली येत होतो. त्यामुळे आपापली नावे सांगावी लागली, पण एकाला मी लांबूनच ओळखलं दगू. काळी टोपी, जाकीट, झब्बा या पेहरावातला, ओठांवर रेखीव भरघोस मिशी असणारा शेलाटा बांधा असणारा दगू मी क्षणात ओळखला. तेच प्रसन्न हसणं, कुजबूजल्यासारखं गोड बोलणं, डोळय़ातली तीच चमक. मी जवळ गेलो आणि त्यानेही मला हाक मारत मिठीत गोळा केलं. जवळ बसवून घेतलं आणि आम्ही दोघेही भूतकाळात हरवून गेलो. बोलताना खंड पडला की, तेवढा वेळ एखादी लकेर छेडायचा. ही त्याची जुनी सवय.
खरं तर मी एकेरी नावाने त्याचा उल्लेख करायला नको, पण आमच्यातला जिव्हाळा लक्षात यावा म्हणून हे र्धाष्टय़! दगूच्या समृद्ध सामाजिक जीवनात तो ऍडव्होकेट अरविंद कुर्डुकर म्हणून ओळखला जातो. हासुद्धा नाणावलेला वकील! आता वकिली सोडून पुण्यात वास्तव्य. मुख्य म्हणजे वय एक्याएWशी! मी मघापासून याचा एकेरी उल्लेख करतो आहे ते चुकीचं असलं तरी अंगात भिनलेली सवय, बाकी काही नाही. दगू वकिली करत असला तरी त्याचं पहिलं प्रेम म्हणजे गाणं. जेव्हा पाहावं तेव्हा हळू, पण लोभस आवाजात लकेरी कानावर यायच्या. याच्या कपाळावर मी कधी चिंतेची रेघ उमटलेली पाहिली नाही. कुणावर ओरडताना ऐकलं नाही. उलट चेहऱयावर कायम एक मिश्कील स्मित दिसायचं. माझ्यापेक्षा दहा-अकरा वर्षांनी मोठा असणारा दगू मला नेहमीच समवयस्क भासायचा. वागणं, बोलणं हे सगळं ‘मधुर’ या हेडिंगखाली येणारा हा एWशीपार माणूस म्हणूनच अजून आपलं तारुण्य टिकवून असावा. याचा गाण्याचा अभ्यासही दांडगा आहे. माझी माहिती चुकीची नसेल तर याच्याकडे शिकायला येणारे विद्यार्थीही होते. मी याची मैफल कधी ऐकली नसली तरी याच्या सुरावटी अनुभवल्या आहेत. हवेची सुखद झुळूक यावी तशा याच्या लकेरी ज्या कानावर आल्या त्या इतक्या आल्हाददायक असायच्या की, ही गायकी मैफलीच्या वरचढ वाटून जायची. अक्षर आणि माझीही मर्यादा यामुळे मी एवढेच लिहू शकलो. कधी-कधी मनातल्या भावना शब्दात मांडणे अवघड होऊन जाते तशातला प्रकार, त्यामुळे आवरत घेतो.

ऍडव्होकेट अरविंद पंडितराव कुर्डुकर, समाजातला तुमचा दबदबा माहीत असूनही मी तुमचे व्यक्तिमत्त्व ‘दगू’ या नावानी गुंफले. मी क्षमाप्रार्थी आहे, काय करू? स्वतःचं ज्येष्ठपण बाजूला ठेवून तुम्ही लहानांमध्ये लहान आणि थोरांमध्येही त्याच भूमिकेत वावरता, त्यामुळे जी अकृत्रिम जिव्हाळा निर्माण होतो, तो मला हे लिहिण्यासाठी धीर देऊन गेला म्हणून हा पंक्ती प्रपंच. खूप दिवसांपासून हे लिहिण्याचा मानस होता, तो पूर्णत्वाला गेला हे श्रेय तुमच्याकडेच जाते, हे विनम्रपणे सांगतो.

– [email protected]