प्रासंगिक – संत नरहरींचे अभंग विचार

1815

>> नामदेव सदावर्ते

महाराष्ट्रातील संतांना आपल्या दैनंदिन व्यवहारात, व्यावसायिक कर्मात अनेकदा आध्यात्मिक अनुभूती मिळत असे. संत आपल्या कर्मातच ते देव पाहत होते. सर्व संतांच्या कामात देव सहकार्यही करीत होते. संत सावता माळी, नामदेव, चोखोबा, नरहरी सोनार, कबीर, जनाबाई या सर्व संतांना देवांनी कर्मातून आध्यात्मिक अनुभव दिले.

सोन्या-चांदीचे दागिने घडवून आपली उपजीविका करीत असलेल्या नरहरी सोनार यांना आपल्या व्यवसायातील कारागिरीतून आध्यात्मिक अनुभव आला तो त्यांनी एका अभंगातून प्रकट केला आहे. ‘देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।।’ या अभंगात ते म्हणतात, ‘देवा तुझ्या नामजपाचा धंदा मी सतत करीत असतो. माझा देह हा एक अनमोल अलंकार असून आत अंतरंगात आत्मा नावाचे शुद्ध सोने आहे. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांची मूस केली असून त्यात शुद्ध सात्त्विक ब्रह्मरस ओतला आहे. जिवा-शिवाची फुंकणी करून मी रात्रभर दागिन्याला आकार देण्यासाठी प्रयत्न करीत असतो. विवेकरूप हातोडा घेऊन मी काम-क्रोधाचे चूर्ण केले आहे. मन-बुद्धीच्या कात्रीने मी सतत रामनामाचे सोने तोडत असतो. आत्मज्ञानाचा तराजू हाती घेऊन मी रामनामाचे दोन्ही अक्षरे मोजत असतो. शेवटी ते म्हणतात –

नरहरी सोनार हरीचा दास।
भजन करी रात्रंदिवस।।

चित्रकार भिंतीवर चित्रे रंगवितो तसे हे जग देवाने रेखाटलेले चित्र आहे. ते माया-मोहामुळे खरे भासते. संसार हा शेवटी सोडावा लागतो. जशी लहान मुले खेळ खेळता खेळता मध्येच खेळ सोडून आपापल्या घरी निघून जातात. भगवंत आपल्या शरीराची जड माती आयुष्यभर राबवितो. सगुण-निर्गुण एकच असून त्यावर देवाची सत्ता आहे. आकाशाप्रमाणे विशाल व निःशब्द अशा अद्वैत ज्ञानाचा आश्रय नामस्मरणाने केला जातो. ते एका अभंगात म्हणतात –

देह जन्मला व्यर्थ ।
झाले पापाचे पर्वत ।।1।।
दान धर्म नाही केला ।
शेवटी जन्म व्यर्थ गेला ।।2।।
देह अवघा क्षणभंगूर ।
दिसे स्वप्नवत सार ।।3।।
नरहरी म्हणे शेवटी ।
संगे न येई लंगोटी ।।4।।

त्यांच्या समकालीन संतांचे वर्णन करताना ते म्हणतात, भक्त पुंडलिक खरोखर धन्य होय. कारण तो चंद्रभागेत अक्षय उभा आहे. तसाच तो भक्त नामदेवही विठ्ठल मंदिराच्या पायरीत अक्षय अजरामर झाला आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे चारही भक्त परब्रह्मस्वरूपात अक्षयी आहेतच. पांडुरंग तर विटेवर आणि कीर्तनात अखंड उभा असतोच. चोखामेळा महाद्वाराच्या पायरीजवळ उभा आहे. मी मात्र या सर्वांची सेवा करीत असतो. विठ्ठलभक्त संत

नरहरी म्हणतात-
जग हे अवघे सारे ब्रह्मरूप ।
सर्वांभूती एक पांडुरंग ।।1।।
अणुरेणूपर्यंत ब्रह्म भरियेले ।
सर्वांघटी राहिले अखंडित ।।2।।
विश्व हे व्यापिले भरून राहिले ।
कवतुक दाविले मायाजाळ ।।3।।
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ ।
परब्रह्मी खेळे अखंडित ।।4।।
अखंडित वस्तू हृदयी बिंबली ।
गुरुकृपे पाही नरहरी ।।5।।

सद्गुरूंचे नामस्मरण हीच खरी उपासना असून नाम हेच अमृत आहे. अखंड नामस्मरण करणारे संत नरहरी म्हणतात- या विश्वातील सर्व पदार्थ नाशवंत असूनही ते मायेमुळे अविनाशी भासतात. भगवंताची माया सर्व विश्वात प्रकट झाली असून तिच्या आड भगवंत असूनही जीवाला तो दिसत नाही.

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।

जगदंबेच्या या प्रसिद्ध आरतीचे कवी संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपुरातच झाला. शिवभक्तीचा वारसा असूनही ते पांडुरंगाचे लाडके भक्त झाले. रुक्मिणी मातेसह सर्व शक्तिदेवतेच्या सगुण रूपांची ते भक्ती करीत असत. संत नरहरी सोनार हे माया-मोह आदी पाशांतून मुक्त झालेले विरक्त संत होते. नामस्मरण, नामजप ही उपासना-भक्ती ते अखंडपणे करीत असत. पंढरपूर क्षेत्रातच माघ कृ. 1 शके 1314 मध्ये ते समाधिस्थ झाले.

आपली प्रतिक्रिया द्या