>> नंदिनी आत्मसिद्ध
आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सहृदयतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता असणाऱया द. भा. धामणस्करांच्या कविता वाचकाच्या मनाला खोलवर स्पर्शून जातात. सहज सोप्या भाषेतून समंजस तत्त्वज्ञान सांगणाऱया द. भिं.नी नुकतीच नव्वदी पार केली. असा प्रसन्न दरवळ असणाऱया त्यांच्या कवितांचा हा रसास्वाद.
निसर्गाचं रूप टिपणारी कविता शुद्ध आस्वादपर, वर्णनपर असू शकते. तशीच ती अनेकदा मानवी जीवनाशी या निसर्गाला जोडून एक विलक्षण असा आविष्कार घडवते. मराठीतले एक ज्येष्ठ कवी द. भि. धामणस्कर यांची कविता याच जातकुळीतली आहे. त्यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि ‘भरून आलेले आकाश’ हे कवितासंग्रह जगण्यातल्या निसर्गाच्या खुणा शोधणाऱया कवितांनी सजलेले आहेत. धामणस्करांनी अलीकडेच वयाच्या नव्वदीत पाऊल टाकलं आहे. त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच त्यांच्या कवितेतला हिरवा सूर समजून घेतला तर ते नक्कीच औचित्यपूर्ण ठरेल.
धामणस्करांच्या कवितेतून भेटणारा निसर्ग वाचकांच्या ओळखीचा आहे. निसर्गातले त्यांचे सर्वात जवळचे घटक म्हणजे हिरवेपणा उधळणारी झाडं आणि रंगवर्षाव करणारी फुलं. खरं तर माणूसही तसा निसर्गाचाच भाग, पण झाडा-फुलांमधले रंग-विभ्रम त्याच्यात नाहीत. मात्र त्यांना टिपणारी संवेदनशीलता माणसाकडे नक्कीच आहे. म्हणूनच मनुष्य आपल्या जगण्याच्या संदर्भात निसर्गाचा विचार करतो, निसर्गात स्वतःच्या आयुष्याच्या खुणा शोधू पाहतो.
`झाडा-फुलांच्या तटस्थपणे फुलण्या-कोमेजण्यातून आपल्या जगण्याचे संदर्भ जागवतो. धामणस्करांची कविता याच पठडीतली आहे. निसर्ग हा तिच्या अनुभवाचा आणि चिंतनाचा विषय आहेच; पण तो केवळ सौंदर्याचा आविष्कार म्हणून किंवा दृश्य जाणिवांचा आस्वाद म्हणून अवतरत नाही. मानवी आयुष्यातल्या विविध जाणिवांशी कुठेतरी तो एकरूप होऊन जातो, तर कधी या आयुष्यातला एक संदेश तो देतो. म्हणूनच धामणस्कर हे निसर्गकवी असले तरी ते फक्त निसर्गपूजक कवी नाहीत. त्यांच्या कवितेत निसर्गाच्या बरोबरीने आयुष्याचे संदर्भही डोकावतात. या दोहोंचं नातं विणतच त्यांची कविता साकारते.
‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही; झाडांची पोपटी पालवीच मला अधिक विश्वासार्ह वाटली’, असा निसर्गावर विश्वास टाकणारे धामणस्कर ‘प्राक्तनाचे संदर्भ’ या पहिल्या काव्यसंग्रहापासूनच भेटत आलेत. ‘वही मोकळी करताना’ या कवितेतही ते म्हणून गेले,
कवितेची वही गच्च भरून गेलीय
आता पाने सुटी करायला हवीत
की अशीच वाऱयावर सोडून द्यावीत
ज्यांची दूर विजनात गामी होती,
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील
तसंच ‘हस्तांतर’ या कवितेत त्यांनी परंपरा पुढे सरकल्याचा आणि एक प्रकारे तिच्या विळख्यातून सुटल्याचा आनंद व्यक्त केला. विसर्जनासाठी गणपती नेताना वडिलांना मूर्ती अवजड होते आणि मग मुलगा ती आपल्या हाती घेतो, तो क्षण टिपताना ते लिहितात,
तर मी एका दैवी आनंदात
अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या
मी पुन्हा तरुण ययातीसारखा
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्य़ानं वाकलेला.
हिरव्या चैतन्यावर जीव ओवाळून टाकणारा हा कवी आयुष्यातल्या प्रेम-जिव्हाळ्यालाही तेवढाच जपणारा आहे. पुढच्या पिढीत निसर्गाबद्दलचा जिव्हाळा उमटताना पाहून हा कवी सुखावतो. आकाश-झाड-पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे ही केवढी गोष्ट!
त्यांच्या कवितेत अलंकारिकता नाही, तरी ती साजशृंगार केल्याप्रमाणे सुंदर वाटते. मुक्तछंदातही एक लय जागवत ताजेपणाचा शिडकावा करत येणारी ही कविता मन प्रसन्न करते. ही प्रसन्नता दिली आहे झाडापानांच्या सहवासाने. त्यांच्याशी ते करत असलेल्या संवादाने. एका कवितेत त्यांनी म्हटलंच आहे,
कधी वाऱयासंगे गुपचूप पडून
राहावे झाडांच्या ओंजळीत
कधी मुळांसारखे ओल शोधीत
पसरावे खोल मातीत
कधी वाहावे निमूट नेमून दिलेल्या
पात्रातून अनंत
कधी जावे दूर समुद्रातून
आपल्या अस्ताच्या क्षितिजापर्यंत
निसर्गासारखी चिरंतन गोष्ट मर्त्य मानवाला जीवनाचा आवाका शिकवून जाते. मनात खोलवर गेलेली निसर्गाकडून मिळालेली प्रेरणा जपत धामणस्कर लिहीत आले आहेत. निसर्गाविषयीचं प्रेम या कवितेत आहेच. पण निसर्गाला अव्हेरल्यास काय होईल, याचा विचार करण्याचा इशाराही ही कविता देते. म्हणूनच तर ‘झाडांची माती झाडांना परत करा’, ही या कवीची हाक आहे.




























































