…आणि वासुदेव स्वामींच्या मुखातून निघाला करुणात्रिपदी तारकमंत्र

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यापासून जवळच नरसी हे गाव कयाधुनदीच्या काठावर आहे . श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी शके १८२६, इ.स १९०५ साली पंधरावा चातुर्मास या ठिकाणी केला व येथे ‘ करुणात्रिपदी ‘ लिहिली नि ‘ दत्तचंपु ‘ या ग्रंथाची निर्मिती केली. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे वाडी येथे एके दिवशी, वाडीमध्ये श्रींची पालखी चालू असता, श्री. गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. लोक विलक्षण घाबरले व वाडीवर येणाऱ्या आगामी संकटाची ही सूचना आहे , हे त्यांना समजले .श्री खोंबारे यांची तर त्रेधा उडाली .तेथील मंडळी नरसीला ( नामदेव) आली. त्यांना हि हकिकत श्रीस्वामी महाराजांच्या कानांवर घातली . श्रीस्वामी महाराज ताबडतोब ध्यानाला बसले व त्यांनी देवांनाच कारण विचारले तेव्हा क्रोधाने देव म्हणाले , ” नरसोबाच्या वाडीतील पुजारी तू घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागत नाहीत .उलट तुझी निंदा करतात. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात . वर्तन बिघडले आहे त्यामुळे आम्हांला तेथे राहण्याचाच कंटाळा आला आहे .पंच नेमून व्यवस्था ठेवावी !

” श्रीस्वामी महाराजांनी पुजाऱ्यांना सांगितले की ” तुम्ही जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल ,तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांग शकत नाही . तुम्ही वर्तन सुधाराल तर ठीक; नाही तर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !” पुजाऱ्यांनी हात जोडून क्षमा मागितली आणि ते म्हणाले; ” आपण सांगाल तसेच आम्ही वागू आमच्या हातून पुन्हा असा अपराध घडणार नाही ” मग श्रीस्वामी महाराज त्यांना म्हणाले; ” आपले वर्तन सुधारा अपराधक्षमापनार्थ देवांची दररोज करुणात्रिपदी प्रार्थना करा ! ” त्या वेळेपासून आजतागायत पालखीच्या वेळी ‘ करुणात्रिपदी ‘ म्हटली जाते .

श्रीस्वामी महाराजांना मंडळींनी वाडीचा सर्व वृतांत सांगितल्यावर गुरुमूर्तींनी श्रीदत्ताचे ध्यान लावले असता क्रोधायमान , उग्र दत्तात्रेय समोर आले व वाडीच्या पुजाऱ्यामुळे मला सारखा त्रास होत आहे . अयोग्य पदार्थ माझ्या पादुकांवर टाकले जातात. आता माफी नाही . तेव्हा श्री स्वामी महाराजांच्या मुखातून करुणात्रिपदी रूप तारकमंत्र निघाला त्यात

१) शांत हो श्री गुरुदत्ता

२) श्रीगुरुदत्ता जय भगवंता

३) जय करुणाघन निज जनजीवन

ही पदे म्हटली तेव्हा पासून करुणात्रिपदी संपूर्ण दत्त स्थानी म्हटली जाते .

।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या