
>> निमिष वा. पाटगांवकर
जेव्हा सार्सचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हा सोशल मीडियाचा प्रादुर्भाव आजच्या प्रमाणात कमी होता. आज कोरोनाच्या बाबतीत सांगायचे तर मोबाईल फोनचा वापर वाढल्याने सोशल मीडियावरून कोरोनाच्या माहितीचा प्रसार आणि खऱ्या खोट्या बातम्याही वेगात पोहोचत आहेत. अशावेळी कोरोनाचा अटकाव करायलाही याच मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बघायला हवा. नव्या शत्रूचा बिमोड करायला नवीन अस्त्र किती परिणामकारक आहेत हे पुढच्या काही महिन्यात नक्कीच समजून येईल.
नवीन वर्षाची सुरवात आपण जेव्हा जानेवारीत केली तेव्हा साहजिकच नवीन वर्षाचे अनेक मनसुबे प्रत्येकाने रचले होते, पण वर्षाच्या दुसऱया महिन्यातच कोरोना विषाणूच्या बातम्या चीनमधून यायला लागल्या. आपण आता डासांपासून होणाऱया नवनवीन आजारांना जसे आता सरावलो आहोत तसेच दर काही वर्षांनी येणाऱया नवनवीन विषाणूंच्या आगमनालाही सरावले आहोत. स्वाईन फ्लू, सार्सला आपण बऱयापैकी पचवल्यावर या कोरोनाकडेही सुरवातीला आपण ब्रयाच अलिप्तपणे बघत होतो पण चीनच्या वुहान प्रातांत उगम पावलेला हा विषाणू हळूहळू जगाला ग्रासायला लागला आणि मार्च उजाडताच आपल्याला कळून चुकले कि हिदुस्थानातही याचा प्रसार व्हायला लागला आहे. इंग्लिश नववर्षाचे मनसुबे कोरोनाने धुळीत मिळवायला सुरवात केलीच आणि आपण अभूतपूर्व अशा लॉकडाऊनमध्ये अडकल्याने हिंदू नववर्षहि झाकोळले गेले.
अशा सगळ्या अनिश्चिततेच्या काळात लॉकडाऊन नंतर पुढे काय हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाऊन संपला तरी देशातले सर्व कोरोनाबाधित बरे झाले नसतील. हे लोक पुन्हा जाणतेपणे, अजाणतेपणे लोकात मिसळले किंवा परदेशातून पुन्हा बाधित रुग्ण आले तर सर्व काही बिघडेल. तेव्हा जरी मला प्रवासाची मुभा असली तरी मी माझी सुरक्षा कशी राखू हा प्रत्येकाच्या मनात थैमान घालणारा प्रश्न आहे. आजपर्यंत जगाने इतक्या रोगांच्या साथी बघितल्या पण एकेकाळी आधारासाठी, प्रेमासाठी, गाठीभेटीसाठी हवा असणारा माणसामाणसातील स्पर्श कोरोनाने नाहीसा केला आहे. किंबहुना माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडून एकमेकांकडे फक्त संशयाने बघितले जात आहे. या परिस्थितीतून जेव्हा बाहेर पडू त्या जगाला ‘नवीन नॉर्मल’ असे आत्ताच संबोधण्यात येत आहे. या जगात माणसाला पुन्हा आनंदाने, आत्मविश्वासाने, संशयाच्या धुक्यातून बाहेर पडून जगायला तंत्रज्ञानच उपयोगी पडेल अशी आशा आजच्या घडीला या महामारीतून बाहेर पडणाऱया चीनकडे बघून वाटते. माणसाला दुसऱया माणसावर विश्वास ठेवायला तंत्रज्ञानाचा दुजोरा लागणार आहे.
चीनच्या ज्या वुहान प्रांतात या विषाणूचा उगम झाला तिथे असलेला लॉकडाऊन 8 एप्रिलला पूर्णपणे उठवण्यात आला आहे. चीनने सुरवातीपासूनच आपल्या बंद दरवाजाच्या आड धोरणामुळे या रोगाच्या प्रसाराची माहिती द्यायला आणि थोपवायला तंत्रज्ञनाचा वापर केला हे आता पुढे आले आहे. आता तर चीनमध्ये तुमचा स्मार्ट फोनच तुमची कोरोनमुक्त असल्याची ओळख पटवायची खात्री करणार आहे. शांघाय सारख्या जवळजवळ अडीच कोटी लोकसंख्येच्या शहरात 27 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज उघडायचा निर्णय घेतला आहे, पण चीनसारखा अवाढव्य लोकसंख्येचा देश पूर्वपरीस्थितीवर यायला मोबाईल ऍप चा वापर केला जाणार आहे. चीनमध्ये अलीबाबा आणि टेनसेंट या मोठय़ा माहिती, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. त्यांनी अनुक्रमे अली – पेठ आणि वुई चॅट हि दोन ऍप्लिकेशन्स काढली आहेत. आज चीनमध्ये जवळपास सगळ्यांच्या फोनवर हि ऍप्लिकेशस आहेत कारण तुमचा संचार या ऍप्लिकेशन्समधून निर्माण होणारा कोड ठरवतो. आज कुठे सार्वजनिक ठिकाणी प्रवेश हवा असेल तर नागरिकांना एक फॉर्म भरून द्यावा लागतो. या फॉर्ममध्ये नागरिकाला आपला फोन, पासपोर्ट क्रमांक, कुठे प्रवास केला असेल तर अथवा कुठचा त्रास होत असेल तर भरावे लागते. या माहितीच्या आधारे एक कोड तयार होतो. तो हिरवा असेल तर तुम्ही मुक्तपणे फिरू शकता, तो जर नारिंगी किंवा लाल आला तर तुम्हाला शासकीय विलगीकरण कक्षात 14 दिवस थांबावे लागते. अर्थात या कोडच्या जोडीला थर्मल चेक सारख्या तपासण्यांची जोड असेलच. हाच कोड सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला वापरावा लागेल. जेणेकरून सगळ्यांची हालचाल टिपता येईल. जेव्हा एखादा कोरोनाबाधित व्यक्तीशी संबंध येईल तर लगेचच तुम्हाला सावध केले जाईलच, पण तुमच्या फोनवरील कोडचा रंग बदलला असेल. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आले होते हेही समजेल.
कोरोना विरुद्धची ही लढाई लढायला आता आपण या मोबाईल ऍपचा वापर करणार असलो तरी चीन असो वा हिंदुस्थान, प्रत्येक देशात त्याला काही मर्यादा आहेत. आपल्या देशाचा विचार केला तर दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. एक म्हणजे कोरोनाची चाचणी जितक्या जास्त प्रमाणात आपण करू तितकी हे हॉटस्पॉट सांगायची माहिती अचूकतेने या ऍपद्वारे मिळेल आणि दुसरे म्हणजे आज आपल्या देशात जरी मोबाईल फोनचा प्रसार वाढत असला तरी एकूण मोबाईल ग्राहकांच्या 77 टक्केच लोकं स्मार्टफोन वापरतात ज्यावर हे ऍप डाउनलोड करता येईल. कोरोना मात्र प्रसार करताना माणसाकडे स्मार्टफोन आहे का नाही हे बघणार नाही. तेव्हा हा पर्यायही देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत माहिती पोहोचवू शकत नाही. असं असले तरी जेव्हा हा विषाणू नवीन आहे, ज्याच्यावर अजून ठोस उपाय नाहीत, प्रतिबंधनात्मक लस उपलब्ध नाही, तेव्हा त्याच्याशी लढायलाही नवनवीन उपाय करून बघावेच लागतील. तेव्हा शंभर टक्के नाही तरी बऱयाच लोकांना या ऍपद्वारे फायदा होणार असेल तर त्याचा उपयोग करून बघायलाच हवा.
जेव्हा सार्सचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हा सोशल मीडियाचा प्रादुर्भाव आजच्या प्रमाणात कमी होता. आज कोरोनाच्या बाबतीत सांगायचे तर मोबाईल फोनचा वापर वाढल्याने सोशल मीडियावरून कोरोनाच्या माहितीचा प्रसार आणि खऱया खोटय़ा बातम्याही वेगात पोहोचत आहेत. अशावेळी कोरोनाचा अटकाव करायलाही याच मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बघायला हवा. नव्या शत्रूचा बिमोड करायला नवीन अस्त्रs किती परिणामकारक आहेत हे पुढच्या काही महिन्यात नक्कीच समजून येईल.
(लेखक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.)
[email protected]



























































