साय-फाय – उलगडणार पृथ्वीवरील पाण्याच्या निर्मितीचे रहस्य

>> प्रसाद ताम्हनकर

टक्के जमीन पाण्याने व्यापलेला असा हा आपला पृथ्वी ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेत आपल्या माहितीत असलेला पृथ्वी हा असा एक मात्र ग्रह आहे की, जिथे जीवन शक्य आहे. पृथ्वीवर जीवन शक्य होण्यामागे ‘पाणी’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवर पाण्याची उत्पत्ती अथवा निर्मिती कशी झाली, यावर जगभरातील अनेक संशोधक संशोधन करत आहेत, तर या संबंधित वेगवेगळे सिद्धांतदेखील मांडले गेले आहेत, मात्र यासंदर्भात आता काही एक ठोस अशी माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी गुरू (Jupiter) ग्रहाच्या (या ग्रहाला आपण बृहस्पती म्हणूनदेखील ओळखतो) कक्षेतून आलेली एक उल्का पृथ्वीवर आदळली होती. ही उल्का ब्रिटनच्या ‘विचकॉम्ब’ या शहरात पडली. तिच्यावर संशोधन सुरू असताना संशोधकांना असे आढळले की, हा खडक 460 दशलक्ष वर्षे इतका जुना आहे. म्हणजे सूर्यमालेच्या सुरुवातीपासून हा खडक अस्तित्वात आहे. जेव्हा अंतराळातून आलेल्या या उल्केवर संशोधकांनी विविध चाचण्या केल्या, तेव्हा या उल्केत पूर्वी काही पाण्याचे अंश असल्याचा पुरावा मिळाला. अधिक संशोधन करून या उल्केतील पाण्याची रासायनिक संरचना शोधण्यात संशोधकांना यश मिळाले. ही उल्केतील पाण्याची रासायनिक संरचना पृथ्वीवरील पाण्याच्या रासायनिक संरचनेशी बऱयाच प्रमाणात जुळणारी आहे. त्यामुळे आता तिच्या अभ्यासावरून पृथ्वीवरील पाण्याच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

या उल्केवरील संशोधनात पुढे असेदेखील स्पष्ट झाले की, सूर्याजवळील वायूचे उष्ण ढग आणि धुळीचे कण एकत्र मिसळून सौरमालेत असे नवे खडकाळ ग्रह तयार होतात. हे नव्याने जन्मलेले खडकाळ ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे पाणी आणि बर्फाचे बाष्पीभवन होते. त्यामुळे येथे महासागर निर्माण होऊ शकत नाही. संशोधकांनी सांगितले की, अशीच प्रक्रिया लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर घडली होती. त्यामुळे आपली पृथ्वी ही नापीक झाली होती. जिथे जीवनाची कल्पना करता येणे शक्य नव्हते. जिथे पाण्याचा अभाव आहे, तिथे जीवन जगणे अशक्य. संशोधकांच्या मते, जेव्हा आपल्या पृथ्वीवर बाहेरील सूर्यमालेतील बर्फाळ लघुग्रहांद्वारे पाणी जमा झाले, तेव्हा ती कालांतराने हळूहळू थंड झाले आणि येथे जीवनासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होऊ लागली.

या उल्केवरील (Space Rock) संशोधन ‘जर्नल सायन्स ऍडव्हान्सेस’वर प्रकाशित झाले आहे. ज्यामध्ये ‘Winchcombe meteorite’ संबंधातील नवीन विश्लेषणाची माहिती सादर करण्यात आली आहे. हा अंतराळ खडक जमिनीवर पडल्यानंतर काही तासांतच त्यातून दुर्मिळ प्रकारचा कार्बन (कार्बोनेशियस कॉन्ड्राईट) संशोधकांकडून गोळा करण्यात आला. ही उल्का सूर्यमालेची मूलभूत रचना स्पष्टपणे प्रतिबिंबित करते असे त्यांचे मत आहे. खडकाच्या आतील खनिजे आणि घटकांचे विश्लेषण करण्यासाठी, संशोधकांनी ते पॉलिश केले आणि गरम केले. त्यानंतर एक्स-रे आणि लेजर किरण टाकून तपासणी करण्यात आली. तपासणीत असे दिसून आले की, ही उल्का गुरू ग्रहाभोवती फिरत असलेल्या लघुग्रहातून आली होती आणि तिच्यात तिच्या वस्तुमानाच्या 11 टक्के पाणी होते.

गुरू ग्रहाभोवती फिरणाऱया लघुग्रहावरील पाण्यामध्ये हायड्रोजनचे दोन प्रकार आहेत.
1. सामान्य हायड्रोजन 2. हायड्रोजन समस्थानिक (isotope)

हायड्रोजन समस्थानिकेला ‘डय़ुटेरियम’ असेही म्हणतात. ते ‘जड पाणी’ बनवते. संशोधकांनी नोंदवले आहे की, हायड्रोजन आणि डय़ुटेरियमचे गुणोत्तर पृथ्वीवरील पाण्यात आढळते. त्यामुळे संशोधनात हे आढळले की, उल्कापाताचे पाणी आणि पृथ्वीचे पाणी एकच आहे. या उल्केमध्ये जीवनासाठी आवश्यक अमिनो ऍसिड, प्रथिने आणि बिल्डिंग ब्लॉक्सदेखील आढळून आले आहेत. जसजसे या उल्केवरील संशोधन पुढे जात राहील, तसतसे आपल्याला सूर्यमालेविषयीची अनेक रहस्ये उलगडत जातील असा संशोधकांना विश्वास आहे.

 [email protected]