
>>प्रतिक राजूरकर
शरीरातल्या विशिष्ट पेशींची वाढ खुंटल्यास अथवा असमतोल झाल्यास शरीरावरील रंग, त्वचा, केसांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. मेलेनिसम, अल्बिनो, ल्यूसिसम जीवशास्त्रातील संज्ञांना वन्यजीवदेखील अपवाद नाहीत. मानवाच्या तुलनेत वन्यजीवांत असे परिणाम फार कमी प्रमाणात आढळतात. मेळघाटात आढळलेले अस्वल हे ल्यूसिस्टीक प्रकारात गणले गेले.
महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प असलेल्या मेळघाटात एका तपकिरी रंगाच्या अस्वलाने समाज माध्यमात धुमाकूळ घातला. निमित्त ठरले वन्यजीव संस्था व महाराष्ट्र वन विभागाच्या चौथ्या चरणातील दीर्घ निरीक्षण (long monitoring) उपक्रम. व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रपमध्ये तपकिरी रंगाचे अस्वल टिपले गेले. तपकिरी अस्वल हे दुर्मिळ असल्याने समाज माध्यमात ही बातमी छायाचित्रासह वेगाने पसरली. अनेकांनी महाराष्ट्रात आढळलेले हे पहिलेच तपकिरी रंगाचे अस्वल असल्याचेदेखील दावे केले. फिकट तपकिरी रंगाचे अस्वल याअगोदर गुजरात येथील दाहोडच्या जंगलात 2016 मध्ये आढळले होते. नागपूर जिह्यातील बोर व पेंच व्याघ्र प्रकल्पात तपकिरी रंगाच्या अस्वलाची नोंद आढळते. उल्लेखनीय म्हणजे शुष्क पानगळीच्या वनक्षेत्रात आपला मूळ नैसर्गिक रंग बदलणारे वन्यजीव आढळणे हा योगायोग आहे, की यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. बोर, पेंच अथवा आता मेळघाट या वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवानाची वृक्ष आहेत. जी हवामानात शुष्कता वाढवण्यास हातभार लावतात.
शरीरातल्या विशिष्ट पेशींची वाढ खुंटल्यास अथवा असमतोल झाल्यास शरीरावरील रंग, त्वचा, केसांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. मेलेनिसम, अल्बिनो, ल्यूसिसम जीवशास्त्रातील संज्ञांना वन्यजीवदेखील अपवाद नाहीत. मानवाच्या तुलनेत वन्यजीवांत असे परिणाम फार कमी प्रमाणात आढळतात. मेळघाटात आढळलेले अस्वल हे ल्यूसिस्टीक प्रकारात गणले गेले. मुळात अस्वल हे काळ्या रंगाचे असल्याने याबाबत कुतूहल झाले नसते तरच नवल होते. शरीरातील मेलेनिन रंगद्रव्याची वाढ यामुळे डोळे वगळता वन्यजीवांची त्त्वचा, केस, रंग काळवंडतो. सोप्या भाषेत विश्लेषण करायचे झाल्यास शरीरातील काळे अथवा गडद रंगद्रव्य वाढल्यास त्या शारीरिक प्रक्रियेला मेलेनिसम संबोधले जाते. काही वर्षांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काळवंडलेला बिबटय़ा हा मेलेनिसम प्रकारातला होता तर अल्बिनो प्रकारात पांढऱया मेलेनिन रंगद्रव्याच्या कमी प्रमाणात उत्पादनामुळे वन्यजीवांची त्वचा, रंग, केस पांढरे पडतात. हिंदुस्थानात काही ठिकाणी पांढरा वाघ आढळून आला. त्यांची अल्बिनो प्रकारात गणना होते. अभ्यासकांच्या मते अल्बिनोग्रस्त वन्यजीवांच्या दृष्टीला बाधा पोहोचण्याची शक्यता असते. अल्बिनोग्रस्त वन्यजीवांच्या डोळ्यात एक गुलाबी छटा दिसून येते. मात्र पांढऱया वाघात असा दृष्टीदोष नसल्याचे काही अभ्यासकांनी नोंदवले आहे.
अल्बिनोग्रस्त वन्यजीव हे त्यांच्या समूहातील इतरांच्या तुलनेत दृष्टीदोषामुळे अधिक लवकर भक्ष्य होण्याची शक्यता असते. त्यांचा पांढरा रंग ठळकपणे शिकार करणाऱया वन्यजीवांच्या सहज दृष्टीस पडतो. थोडक्यात अल्बिनोग्रस्त वन्यजीवांचे जीवन इतर वन्यजीवांपेक्षा अधिक खडतर असते. अनेक देशांत अल्बिनोग्रस्त वन्यजीवांना त्याच कारणास्तव प्राणीसंग्रहालयातच ठेवले जाते. सर्वच पांढरे पडलेले वन्यजीव हे अल्बिनोग्रस्त नसतात. अनेकदा वन्यजीवांचे अल्बिनोग्रस्त होण्यास केवळ मेलेनिनच नाही तर इतरही जैविक अथवा अनुवांशिकता कारणीभूत ठरते. मात्र त्याची शहानिशा डोळ्यांतील गुलाबी छटेवरून होऊ शकते. अल्बिनो प्रकारातील वन्यजीवांना विविध संस्कृतीत पवित्र मानले गेले आहे. गोंदिया जिह्यात ससापूर्ण येथे पहाडावर पांढऱया वाघांचे मंदिर आहे. त्या भागातील जमीनदाराचा मृत्यू जवळ आल्यावर दोन पांढरे वाघ तिथे यायचे, त्यांचे आगमन हे मृत्यूची सूचना, चाहुल असे समजून मग नवीन जमीनदाराची नियुक्ती व्हायची अशी त्या काळी मान्यता होती. म्हणून त्या ठिकाणी पांढऱया वाघांचे मंदिर उभारले गेले होते. मेलेनिसम व अल्बिनोचे शरीरावर होणारे बदल रंगाच्या बाबतीत परस्परविरोधी आहेत. या दोन जैविक प्रकाराच्या मधली प्रक्रिया ही ल्यूसिसम गटात मोडणारी आहे. काही वर्षांपूर्वी भोपाळच्या वनविहार या ठिकाणी ल्यूसिसमग्रस्त अस्वल त्याच्या वेगळेपणामुळे बिलासपूरजवळील जंगलातून पर्यटनासाठी ठेवण्यात आले होते. ल्यूसिसमग्रस्त वन्यजीवांच्या दृष्टीवर काही दुष्परिणाम झाल्याचे उदाहरण अद्याप नाही. जीवशास्त्रात या तिन्ही प्रक्रियेत काही किंतु-परंतु, अपवाद असतीलही, पण त्यासाठी मूळचा नैसर्गिक रंग, त्वचा, हवामान, भौगोलिक रचनेचादेखील प्रभाव असण्याची शक्यता आहे. त्वचा, रंग विकारांच्या प्रकारांनी वन्यजीव चर्चेत येतात. माणसांचे अंतरंग बदलण्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. मात्र वन्यजीवांची जीवशास्त्रातील रंग बदलण्याची प्रक्रिया ही पूर्णत: नैसर्गिक आहे. त्यातून वन्यजीवांनाच झाले तर नुकसान होऊ शकेल. मात्र माणसांची अंतरंग बदलण्याची वृत्ती समाजाला घातक ठरणारी आहे. शास्त्रीय कारणास्तव वन्यजीवांचे रंग बदलले तरी अंतरंगातील स्वच्छ भाव ना बदलत नाहीत.





























































