
>> डॉ. प्रतिमा इंगोले
मराठी साहित्यात विविध प्रवाह आहेत. लोकसाहित्याच्या मौखिक परंपरेद्वारे अनेक शब्द, वाप्रचार, म्हणी, लोककथा, कोडी, उखाणी आपल्या जिभेवर रुळले आहेत. मराठी प्रमाणभाषेचा आग्रह धरताना या लोकसाहित्याकडेही तितकेच लक्ष दिले गेले पाहिजे. 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱया मराठी भाषा दिनानिमित्त हाच आशय मांडणारा लेख.
आंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिन हा खरे तर लोकसाहित्याच्या भाषेचा उत्सव व्हायला हवा. तशी लोकसाहित्याची भाषा ही त्या त्या प्रदेशातील प्रकृतीशी मिळतीजुळती भाषा असते. ती लोकांची लोकभाषा असते. त्यामुळेच ती मराठीचे अव्वल आणि अस्सल रूप ठरते. ती नितळ तर असतेच, पण प्रकृतीशी समांतर असल्यामुळे प्रवाही असते. मराठीचे आद्यरूप प्राकृत अथवा प्राकृतिक भाषा हेच आहे. पूर्वी जेव्हा मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती तेव्हा हीच प्रकृतीतून जन्मलेली प्राकृत बोलली जात होती. माणूस निसर्गातून आवाज ऐकू लागला. त्याची नक्कल करता करता बोलणे शिकू लागला. झऱयाची झुळझुळ, पक्ष्यांची किलबिल, विजांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, प्राण्यांचे चित्कार अशा कितीतरी प्राकृतिक गोष्टी माणसाला प्रेरित करीत गेल्या. हीच भाषा आदिम मराठी होय. याच भाषेचे उज्ज्वल रूप त्या त्या प्रदेशाच्या लोकसाहित्यात टिकून असते.
लोकसाहित्याची निर्मिती केव्हा झाली याचे अनुमान काढतो म्हटले तर तो काळ शिकारी अवस्थेचा असावा. कारण रानटी अवस्थेतच माणूस बोलणे शिकला असावा. शेवटी निसर्गच मानवाचा आद्यगुरू! पंचमहाभुतांच्या आविष्कारामुळे माणूस दिपला असणारच. त्याचे प्रतिबिंब त्याच्या जगण्यात आणि बोलण्यातही दिसू लागले असणार. शेवटी समाजजीवनच लोकसाहित्याच्या मूळस्थानी असते आणि समाजजीवनाचा मूलाधार माणूस असतो, तर मानवी व्यवहाराच्या मूळस्थानी ही लोकभाषाच असते. म्हणूनच ती आशयघन असते. अल्पाक्षर रमणीयत्व हे लोकभाषेचे आणखी आणखी वैशिष्टय़. ‘तिचे रूप ताकातले तूप’ ही एक लोकम्हण आहे. या म्हणीत फक्त चारच शब्द आहेत, पण आशय मात्र चौफेर पसरणारा आहे. स्त्र्ााr सुंदर आहे, पण किती? तिचे रूप म्हटल्याबरोबर सौंदर्याची अनुभूती येते. पण ताकातले तूप म्हणताच त्या रूपाची सगळी वैशिष्टय़े प्रतीत होतात. खरे तर आताच्या मुलांना हे ताकातले तूप कितपत माहिती आहे याबद्दल शंकाच आहे; कारण आता यंत्राच्या सहाय्याने काढलेले तयार लोणी मिळते. आता दहय़ाचे ताक केले जाते. ते घरी नाही, तर आयते विकत मिळते. पण ज्यांनी हे डेरा घुसळणे पाहिले असेल त्याला ताकातील तुपाचे म्हणजेच लोण्याचे सौंदर्य प्रतीत होईल. हे लोणी म्हणजे मृदू सबाह्य नवनीत होय. आतून बाहेरून जे सारखे असते. मुख्य म्हणजे मृदू असते तसेच नितळ असते. त्याचा पांढरा रंग वेगळाच सुंदर असतो. तो डोळय़ावर येत नाही, तर डोळय़ांना सुखद वाटतो. त्यात एक अंगचाच तजेला असतो. शिवाय तो बघणाऱयालाही तजेला प्रदान करतो. हे ताकातले तूप आयुर्वेदाच्या दृष्टीने पौष्टिक असते. शिवाय ते खाणारीला सौंदर्य प्रदान करते. ‘खाल्ले तूप आले रूप’ अशी दुसरी म्हण आहेच. लोकसाहित्याची भाषा या ताकातल्या तुपासारखीच असते. ती माणसाच्या मनाला थेट भिडते. आपली वाटते. कृत्रिम नसते.
‘‘मामाजीच्या वाडय़ा
भाशी आली ठमकत
इज जशी चमकत’’
अशी एक लोकओवी आहे. मामाच्या घरी भाशी म्हणजे भाची (बहिणीची मुलगी) आली ठमकत. म्हणजे लहानपणीची ही चाल! त्या केवळ एका शब्दावरूनच भाचीचे वय कळते. शिवाय तिचा नखरा, तोरा, बालरूपाचे सौंदर्य सगळेच प्रतीत होते आणि शेवटची ओळ तर त्यावर कळस चढविते. वीज जशी लखकन् चमकत प्रगटते तशी ही भाची मामाच्या घरी लखकन् प्रगटत घरदार उजळून टाकते. आपल्या लोभस रूपाने सर्वांना भारून टाकते. अशी ही लोकसाहित्याची भाषा नेटक्या शब्दातून थेट आशय प्रतिबिंबित करते, म्हणूनच जनसामान्यांना भावते. तीच खरी लोकांची भाषा ठरते.
लोकसाहित्याची भाषा हीच खरी त्या त्या प्रदेशाची लोकभाषा ठरते. तिलाच आपण बोलीभाषासुद्धा म्हणतो. हीच खरी आद्य मराठी होय. या भाषेला अंतःकरणाची भाषासुद्धा म्हणू शकतो, कारण त्यामुळेच तिला कोवळीक लाभते. त्यातील प्रतिमा आणि संकेतांमुळे ती आशयसंपन्न व वैभवशाली बनते. लोकभाषेतील हे लोकसंकेत त्या त्या प्रदेशाची अर्जित संपत्ती असते. लोकसाहित्य आणि लोकभाषा यांचे संबंध परस्परावलंबी असतात. लोकसाहित्यामुळे लोकभाषा समृद्ध होते, तर खळाळत्या लोकभाषेमुळे लोकसाहित्य प्रवाहित होते. त्याला लय गवसून ते लोकमानसाला त्वरित साद घालू शकते. तसेच सृष्टीचक्राचा गाभा बनू शकते. ही शब्दकळा लोकभाषेतून आल्यामुळेच लोकजीवनाचे सत्त्व व्यक्त करण्याचे सामर्थ्य मिळवू शकते. त्यामुळे हीच खरी मराठी ठरते. लोकसाहित्यामुळे भाषा ‘भारमसूद’ होते. हाही खास लोकसाहित्यातील शब्द!
थोडक्यात, लोकसाहित्याला लोकांच्या जगण्यामुळे अव्वलता प्राप्त होते, तर लोकसाहित्यामुळे लोकभाषेला भारलेपण प्राप्त होते आणि हे भारलेपण लोकांच्या मनाला भारून टाकते. तेव्हाच भाषेचे सामर्थ्य प्रगट होते. लोकसाहित्य आणि लोकभाषा यांचा संबंध असा घनिष्ठ आणि मानवी विकास साधणारा असतो. तेव्हा मराठीचा विचार करताना आधी या लोकभाषेचा विचार करायला हवा, तेव्हाच मराठीचे स्वरूप अधिक लोककल्याणदायी होऊ शकते आणि शब्दांना मंत्राचे सामर्थ्य लाभते. तेव्हा ही आद्य मराठी आधी विकसित करावी आणि त्याद्वारा लोककल्याण साधावे हाच आजचा प्रगत विचार ठरतो.




























































