मृणाल सेन नावाचे युग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण कारखानीस

एक काळ असा होता, जेव्हा सत्यजित राय, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन हे सर्वसामान्य बंगाली चित्रपटशौकिनांसाठी जणू ब्रह्मा- विष्णू-महेश होते. त्यांच्यापैकी ऋत्विक घटक, जे वयानं सगळ्यात लहान होते तेच सगळ्यात प्रथम 1976 साली आपल्या वयाच्या 50 व्या वर्षी कालवश झाले. सत्यजित राय हे वयानं सगळ्यात मोठे होते , ते 1992 साली वयाच्या 71व्या वर्षी निधन पावले. त्या तुलनेत त्या दोघांपेक्षा मृणाल सेन हे तसे दीर्घायुषी ठरले! 30 डिसेंबर 2018 रोजी कोलकातात त्यांचं देहावसान झालं. अर्थात त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्यातच राहणार आहेत.

चित्रपटसृष्टीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड नावलौकिक मिळवलेले निर्माता – दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या निधनानं जणू एका युगाची समाप्ती झाली आहे! मृणाल सेन यांना मी सर्वप्रथम पाहिलं, ऐकलं ते 1983 मध्ये कोलकाता येथे कॉलेज स्ट्रीटवरच्या कुठल्याशा सभागृहात! त्यांचं बंगालीतलं भाषण मला काही समजलं नाही. मी त्यांना भेटलो आणि माझा परिचय करून दिला, त्याबरोबर त्यांनी माझ्याशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधत मला दिवस आणि वेळ पूर्वनिश्चित करून त्यांच्या घरी येण्याचा सल्ला दिला. तथापि, काही ना काही कारणानं ते झालंच नाही. पुढे 2 सप्टेंबर 1985 या दिवशी कोलकात्यात पश्चिम बंगाल सरकारतर्फे नंदन या नावे उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात मी त्यांना केवळ पाहिलंच नाही तर त्यांच्याशी भरपूर बोललो, इतकंच नव्हे तर त्याच वास्तूत पुढील दहा दिवसांत मृणाल सेन निर्मित – दिग्दर्शित वीस बंगाली चित्रपट ओळीनं पाहिले! तोवर मला बंगाली भाषा थोडीथोडी समजू लागली होती. मृणालदा प्रत्येक दिवशी थोडय़ावेळासाठी चित्रपटगृहात येऊन जात आणि आपल्या चाहत्या प्रेक्षकांशी मोकळेपणानं वार्तालाप करत. साधेपणा हा त्यांचा स्वभावधर्मच होता.

‘रातभोरे’ हा त्यांनी निर्मिती केलेला पहिला बंगाली चित्रपट! 1955 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात उत्तमकुमार हा नायक आणि सावित्री चतर्जी ही नायिका होती तर शोभा सेन साहायक अभिनेत्री होती. या तिघांनीही पुढील काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. उत्तमकुमार बंगाली चित्रपटसृष्टीतला महानायक झाला. सावित्रीला पद्मश्री आणि बांगला – भूषण असे पुरस्कार मिळाले तर शोभा सेन अनेक चित्रपटात चमकून नंतर उत्पल दत्त या आघाडीच्या अभिनेत्याची सहधर्मचारिणी झाली. याच चित्रपटाद्वारे केश्तो मुखर्जी या हास्यअभिनेत्याचं सिनेसृष्टीत पदार्पण झालं. तथापि, मृणाल सेन यांचा हा पहिला चित्रपट तितकासा चालला नाही. तरी त्यांनी नाउमेद न होता विख्यात हिंदी लेखिका महादेवी वर्मा यांच्या एका कथेवर आधारित ‘नील आकाशेर नीचे’ या नावाचा दुसरा बंगाली चित्रपट काढला ज्यात कोलकातामधल्या चिनी लोकांच्या दाट वस्तीत राहत असलेला एक चिनी युवक अजाणतेपणानं कोलकातामधल्याच एका बंगाली हिंदू विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो असं काहीसं या चित्रपटाचं कथासूत्र होतं. हेमंतकुमार मुखोपाध्याय यांचं सुरेल संगीत होतं. या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. मात्र त्याचवेळी आपल्या उत्तर सीमेवर चीनच्या आक्रमणाचं संकट येऊन उभं ठाकलं आणि या चित्रपटाचा केंद्रबिंदू चिनी युवक असल्यानं हा चित्रपट दाखवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. तरीही मृणाल सेन यांनी आपली चित्रपट निर्मिती चालूच ठेवली. त्यांचे बैश्ये श्रावण (1960), पुनश्च (1961), अवशेष (1963), प्रतिनिधी (1963 ) असे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले. आकाश कुसुम या त्यांच्या चित्रपटानं बंगाली चित्रपटसृष्टीला एक जबरदस्त रूपसंपन्न आणि तितकीच बुद्धिमान अभिनेत्री दिली, जिचं नाव अपर्णा सेन! याच चित्रपटामुळे सौमित्र चतर्जी हा गुणसंपन्न अभिनेता रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला जो पुढे अनेक वर्षांनी दादासाहेब फाळके पुरस्काराचा मानकरी झाला. माटीर मनीषा या उरिया भाषेतल्या एका प्रसिद्ध चित्रपटाचं दिग्दर्शन मृणाल सेन यांनीच केलं होतं. अकालेर संधाने हा त्यांचा बंगाली चित्रपट बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर चित्रित केला होता. यामध्ये मराठी अभिनेत्री स्मिता पाटील प्रमुख भूमिकेत झळकली होती. भुवनशोम हा मृणालदा यांचा बंगाली-हिंदी चित्रपट त्रिखंडात गाजला. विशेष म्हणजे यात उत्पल दत्त यांची नायिका होती सुहासिनी मुळ्ये या नावाची एक सुविद्य मराठी नवयौवना! बिहारमधल्या पाटलीपुत्र अर्थात पाटणा शहरात जन्मलेली, वाढलेली सुहासिनी त्याकाळी एका साबणाच्या पहिल्याच जाहिरातीत मॉडेल म्हणून चमकत होती. तिचं तेच चित्र पाहून मृणालदा यांनी तिची निवड केली होती.

भुवनशोम या चित्रपटात सुरुवातीला एक हृद्य निवेदन ऐकायला मिळतं जे निर्माता-दिग्दर्शक मृणालदा यांना अभिप्रेत असलेला परिणाम उत्तम प्रकारे साधतं. त्याबद्दलचा किस्सा अनेकांना चकित करणारा आहे. झालं असं की, हिंदी भाषेतल्या या निवेदनासाठी मृणालदा एका उत्तम निवेदकाच्या शोधात असतानाच्या काळात मुंबईला आले असता एके दिवशी ख्यातनाम हिंदी-उर्दू लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या घरी गेले होते. गप्पांच्या ओघात त्यांनी हिंदी निवेदकाची आपली निकड के. ए. अब्बास यांना बोलून दाखवली. त्यावेळी अब्बास यांना भेटायला आलेल्या अनेक होतकरू मंडळीत एक उंचपुरा, शिडशिडीत अंगयष्टी असलेला युवक बसलेला होता. त्याला पुढे बोलावून अब्बास मृणालदा यांना म्हणाले, ‘या मुलाला घेऊन जा तुमच्यासोबत! निवेदनाचं काम तो उत्तम करेल याची हमी मी देतो!’ मग काय, मृणालदांचा प्रश्नच सुटला. स्टुडिओत जाऊन त्यांनी त्या तरुणाकडून हिंदी निवेदनाचं रेकार्ंडग करूनही घेतलं. ते त्यांना इतकं आवडलं की त्यांनी खिशातनं तीनशे रुपये काढले आणि बिदागी म्हणून ते त्या तरुणाच्या हातावर ठेवले. त्या तरुणाला गहिवरून आलं. तीनशे रुपये म्हणजे त्याकाळी खूप मोठी रक्कम होती म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर चमकण्यापूर्वीच आपल्याला हे पैसे सिनेसृष्टीतली स्वकष्टाची पहिलीच कमाई म्हणून मिळताहेत याचं त्या तरुणाला अप्रूप वाटलं होतं. तेथूनच त्याच्या करीयरची सुरुवात झाली आणि आज गेल्या काही दशकांपासून तो बॉलीवूडचा शहेनशहा म्हणून स्थान टिकवून आहे. त्याचं नाव अर्थातच अमिताभ बच्चन!

गेली कित्येक वर्षे केन्स, बर्लिन, शिकागो, कैरो, मॉस्को, मॉन्ट्रीयल, व्हेनिस अशा विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त जमत असलेल्या दुनियाभरच्या चित्रपट समीक्षकांनी आणि चोखंदळ प्रेक्षकांनी मृणाल सेन यांच्या चित्रपटांची मुक्तकंठानं प्रशंसा केली. मृणाल सेन यांचा अशा महोत्सवात अनेकदा गौरवही झाला आहे. देशविदेशातल्या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. अर्थात डॉक्टरेट इन लिटरेचर ही उपाधी प्रदान केली आहे . फ्रान्सचे अध्यक्ष मितरां आणि रशियाचे पंतप्रधान पुतीन यांनी त्यांचा विशेष सन्मान केला आहे . 1991 साली राष्ट्रपतींनी पद्मभूषण देऊन त्यांना गौरवलं आहे. 1998 ते 2003 या पाच वर्षांच्या काळासाठी ते राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सन्माननीय सभासद होते . त्यांनी लिहिलेलं , “Always Being Born” हे आत्मचरित्र 2004 साली प्रसिद्ध झालं. 2005 साली त्यांना चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

एक काळ असा होता, जेव्हा सत्यजित राय, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन हे सर्वसामान्य बंगाली चित्रपटशौकिनांसाठी जणू ब्रह्मा- विष्णू-महेश होते. त्यांच्यापैकी ऋत्विक घटक, जे वयानं सगळ्यात लहान होते तेच सगळ्यात प्रथम 1976 साली आपल्या वयाच्या 50 व्या वर्षी कालवश झाले. सत्यजित राय हे वयानं सगळ्यात मोठे होते , ते 1992 साली वयाच्या 71व्या वर्षी निधन पावले. त्या तुलनेत त्या दोघांपेक्षा मृणाल सेन हे तसे दीर्घायुषी ठरले! 30 डिसेंबर 2018 रोजी कोलकातात त्यांचं देहावसान झालं. अर्थात त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्यातच राहणार आहेत.