‘अर्थ’ अस्तित्वाचा

प्रिया भोसले
3 डिसेंबरला ‘अर्थ’ला 41 वर्षे पूर्ण होतील. 1982 ला आलेल्या स्मिता पाटील, शबाना आझमी,कुलभूषण खरबंदा,राजकिरण आणि रोहिणी हट्टंगडीच्या अभिनयाने सजलेल्या,महेश भट्ट दिग्दर्शित अर्थने सिनेमाला चौकटीबाहेरचा विचार करायला प्रवृत्त केलं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. चार दशकानंतरही ‘अर्थ’चा ताजेपणा, त्याचं आकर्षण आजही टिकून आहे. याला कारण ‘अर्थ’ने फार सशक्तपणे लग्नसंस्थेच्या पोकळ डोलाऱ्यावर तेव्हा जळजळीत भाष्य केलं होतं. जेव्हा व्यावसायिक सिनेमा भारतीय विवाहसंस्थेविषयीची मूल्ये आणि आयुष्यात जोडीदारा शिवाय जीवन परिपूर्ण नसल्याच्या विचारांना पुढे रेटण्यातच धन्यता मानत होता. तेव्हा या मर्यादीत चौकटीला छेद देत स्त्री ही, पुरुषाच्या आधाराशिवायही आयुष्य जगू शकते हा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न झाला. पुरुषाच्या आधाराशिवायही स्त्री परिपूर्ण असू शकते हा विचार दृढ करणारा “अर्थ” चित्रपट म्हणूनच मैलाचा दगड ठरतो.
अर्थची कथा इंदर,पूजा आणि कविता ह्या तीन पात्रांच्या भोवताल फिरते.पूजाचं नवऱ्यावर प्रेम आहे. कोणत्याही सामान्य स्त्रीसारख्याच पूजाच्या इंदरकडून अपेक्षा आहेत. तिला स्वतःचं घर हवं आहे. इंदर तिची इच्छा पूर्ण करतो.अर्थात ही एक लालूच असतो. राजरोसपणे प्रेयसीसोबत राहण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून घर देऊन तो पूजाचं तोंड बंद करु पाहतो. आयुष्यात स्थैर्य आलं म्हणून सुखावलेली पूजा नवऱ्याच्या या निर्णयाने कोलमडून पडते. वर्षानुवर्षे वर्षे लग्न हीच इतिकर्तव्यता मानणाऱ्या विचारांचा पगडा असणारी पूजा काही जगावेगळी स्त्री नाही. संकटे आली की आपल्यातलं वेगळेपण सिद्ध होतं ही गोष्ट अलहिदा. पण तोपर्यंतचा प्रवास बरंच काही शिकवणारा असतो. ‘अर्थ’मधील पूजा हे हिंदुस्थानातील असंख्य स्त्रियांचे प्रतीक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही।
पूजासोबत कविता नावाचं स्त्री पात्र सिनेमातून आपल्यासमोर येतं. कविता इंदरच्या आकंठ प्रेमात आहे.आवडत्या पुरुषाची आपण दुसरी बाई आहोत ह्या जाणिवेने ती प्रचंड अस्वस्थ असते. स्वत:पेक्षा जास्त प्रेम इंदरवर करताना त्यातून आनंद मिळवण्याऐवजी ती त्याला मिळवण्यासाठी झपाटलेली असते. प्रेमात माणूस इरेला पेटला की माणूस वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण इंदरसोबतच असावा यासाठी कविता ही पछाडलेली असते.
तर प्रेमाचा आणि करीयरचा विचार करुन दुसरया स्त्रीसोबत संबध ठेवणारा दोन्ही स्त्रियांचा पुरुष, इंदर प्रचंड स्वार्थी असतो. कविताने संबंध तोडल्यानंतर पुन्हा बायकोकडे येताना आपण कसंही वागलो तरी बायको आपल्याला स्वीकारेल म्हणून नवरा असण्याचं पुरुषी स्वातंत्र्य घेणारा इंदर पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रतिनिधित्व करतो. बायकोचा विश्वासघात करुन ,आपली चूक मान्य न करता,माझ्या घरात तुझ्या रखैलचं नाव घेऊ नकोस म्हणणाऱ्या पूजाला, तू ज्या घरात राहतेस ते घर कविताची मेहेरबानी आहे असं सांगून तिला धमकावण्याची हिंमत त्याच पुरुषसत्ताक व्यवस्थेने त्याला दिली आहे असं वाटत राहातं. तसंही मनुष्य स्वभावाची ही खासियतच आहे. इथे प्रत्येकाकडे इतरांचं अंतरंग दाखवायलाच आरसे असतात,स्वतःचं खरं रुप दाखवणारा आरसा मात्र कुणी जवळ बाळगत नाही.
आजही आपल्या समाजात कोणत्याही गोष्टीसाठी महिलेलाच जबाबदार ठरवण्याची, चूक तिचीच असेल असं म्हणण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही. नवरा सोडून गेला तर, चूक बायकोचीच असणार असं फार बिनधास्तपणे विधान केलं जातं. त्याचा प्रभाव पूजाच्या, ‘माझ्यात काय कमी होती’ प्रश्नातून समजून येतो. दुसऱ्या स्त्रीकडे नवरा आकर्षित झालाय ह्यात त्याची चूक नसून बायको म्हणून आपणच कमी पडलोय असं तिला वाटत असतं. घरकाम करणाऱ्या बाईला तिचा नवऱ्याने दुसरा घरोबा केला कळल्यावर, मी तिच्या जागी असते तर मी नवऱ्याला सोडलं असतं म्हणणारी पूजा, आपल्यावर तीच वेळ आल्यावर  इंदरला माफ करुन त्याच्या परतण्याची वाट बघते.
माणसांची सामाजिक आणि वैयक्तिक विचारांची विसंगती तशी आपल्याला नवीन नाही.परदु:खे शीतल असतात. अशावेळी आदर्शवाद दाखवणं तुलनेत सोपं जातं. खरी कसोटी स्वतःवर संकटे आल्यावर लागते. त्यात वर्षानुवर्षे मनावर बिंबवलं गेलेले साथीदार नसणं म्हणजे अधुरेपण, लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्यता सारखे विचार, साथीदारासोबत केलेला संकटाचा सामना आणि त्यातून आयुष्याचा सहज झालेला प्रवास: यामुळे पूजाला लग्नामुळे मिळणारया हक्काच्या सुरक्षिततेचा मोह सोडवत नाही. बंड करण्याची हिंमत नसली की परिस्थितीला शरण जात स्वतःला कमी लेखणं ओघाने आलंच. कविता प्रेमापायी तर पूजा एकमेव आधार तुटल्यामुळे असहाय्य आहेत.
पूजा तोवर इंदरची वाट बघते जोवर तो येण्याची आशा तिच्या मनात जागृत आहे.पण जेव्हा नवरा परतण्याची आशा संपुष्टात येते,त्यानंतर परिस्थितीपायी लादलेल्या एकटेपणाच्या प्रवासात पूजाला, मिसेस पूजा इंदर मल्होत्रा नावातून स्वतःला वेगळं करुनही जगता येऊ शकतं हा साक्षात्कार होतो.आयुष्याचा खरा ‘अर्थ’ सापडतो. जिथे आपल्या अस्तित्वाची अडचण होते तिथे रेंगाळत न राहता पाठ फिरवून माणसाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. जखमा भरायला, मनाची ताकद आजमवायला वेळ द्यावा लागतो. त्यावरची औषधं आपली आपणच शोधायची असतात. तग न धरु शकलेल्या नात्याच्या रोपट्याभोवती आयुष्य केंद्रित न करता आपण स्वतःमधे हि परिपूर्ण असू शकतो सारखा विचार ‘अर्थ’ ठळकपणे देतो.
माणसाला जी गोष्ट समाजाच्या नियमांमुळे अप्राप्य वाटते तिचं त्याला कायम आकर्षण वाटत आलयं. असे  ‘इंदर ध्यास’ समाजात स्त्री-पुरुष दोन्ही रुपात दिसतात. त्या ध्यासामागे पळत राहण्याऐवजी तुमचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या नात्यातून सुटका करणं,किती गरजेचं आहे ते अर्थ अधोरेखित करतं, आणि आयुष्याचा ‘अर्थ’ सापडला की कोणत्याही पूजाला ‘मल्होत्रा’ आडनावाची किंवा साथीदाराची गरज पडत नाही हे जितकं पटतं. तितकंच कामवाल्या बाईच्या मुलीचं पालकत्व स्वीकारणारी पण आपल्याकडे परतलेल्या इंदरला अस्वीकार करणारी पूजा बघून माणसाने माणसासारखं रहावं, प्रेमापोटी सगळ्या चुका,पापक्षालन करणारं तिर्थक्षेत्र होऊ नये..हे ही अधोरेखित करतं!
कुणाच्या असण्यामुळे आपल्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होणं म्हणजे आयुष्याचा ‘अर्थ’ नाही तर, एखाद्या व्यक्तीत आधार शोधण्याऐवजी कुणाचा तरी आधार होण्यापर्यंतचा सक्षम प्रवास…म्हणजे ‘अर्थ’! हाच “अर्थ” सिनेमाचा उलगडणारा खरा “अन्वयार्थ”
(लेखिका या चित्रपट समीक्षक आहेत)