रंगनाट्य – खमंग खिचडीची पंगत…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर

ताटात वरण, भात, भाजी असे पदार्थ असले की, नेहमीचे जेवण हे होतेच, पण त्यात तोंडी लावण्याचे दोन-चार पदार्थ वाढवले की, त्या जेवणाची लज्जत काही औरच होते. अगदी असेच काहीसे ‘वाकडी तिकडी’ या नाटकाच्या बाबतीत झाले आहे. नाटकात अर्थातच एक गोष्ट आहे आणि तीही विनोदाचा बाज असणारी आहे. किंबहुना, विनोदाच्या बरणीतच हे नाटक मुरवले आहे असे म्हणता येईल. ‘वाकडी तिकडी’ म्हणजे नक्की काय, असा प्रश्न पडला तरी त्याच्या फार खोलात शिरण्यास वाव न देता या नाटकाने एका साध्या पाककृतीत रुचकर मसाले पेरत खमंग खिचडीची पंगत मांडली आहे.

एक दृष्टिहीन, एक मूकबधिर आणि एक कर्णबधिर असे कलावंतांचे त्रिकूट नाटकात असणे रंगभूमीला नवीन नाही. या पायावर काही नाटय़कृती रंगभूमीवर येऊन गेल्या आहेत. ‘वाकडी तिकडी’ या नाटकातही असाच प्लॉट आहे. मग असे सगळे असताना यात वेगळेपण ते काय, असा प्रश्न पडल्यास त्याचे उत्तर ‘वाकडी तिकडी’ या नाटकाच्या सादरीकरणातूनच मिळते. या नाटकात असे त्रिकूट आहे खरे, पण केवळ त्यावरच यातला विनोद आधारलेला नाही, तर या तिघांच्या तीन तऱहा, त्यांची होणारी सरमिसळ आणि या तिघांना प्रसंगानुरूप घ्यावे लागणारे वेगवेगळे बेअरिंग हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे.

युवा लेखक श्रमेश बेटकर याने हे नाटय़ रंजक होण्यासाठी संहितेत या सगळय़ाचे पुरेपूर व्यवधान राखले आहे. अनेकदा तर हे नाटक संहितेनुरूपच केवळ बांधलेले नसून इम्प्रोव्हायझेशन तत्त्वावर उभे केल्याचे जाणवत राहते. कारण यातला विनोद बहुतांश वेळा शारीरिक कसरतींवर हिंदोळे घेत असल्याचे दिसून येते, पण यातल्या कलाकारांच्या क्रिया-प्रतिक्रियेच्या उत्तम खेळाने हे नाटय़ आपसूकच हशा मिळवत धमाल मार्गक्रमण करत राहते.

श्रमेश बेटकर व अंशुमन विचारे या दोघांनी मिळून या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. नाटकाच्या दुसऱया अंकाच्या तुलनेत पहिल्या अंकात एपंदर धुमाकूळ आणि विनोदाची मात्रा अधिक आहे. नाटकात सुरुवातीपासून गुंतवून ठेवण्यासाठी त्याचा अर्थातच उपयोग झाला आहे. कलाकारांना रंगमंचावर मुक्तपणे बागडण्याची संधी दिग्दर्शक द्वयीने दिली आहे आणि कलाकारांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
लेखन व दिग्दर्शनाच्या या मिश्रणावर होणारी इतर लज्जतदार जिन्नसांची पेरणी म्हणजे यातले कलाकार आहेत, पण केवळ यातल्या नाटय़ाला वरून तडका देण्याइतकेच त्यांचे यात कार्य नाही, तर त्यासाठी त्यांच्या अंगी मुरलेल्या अतरंगीपणाचा त्यांनी सुयोग्य वापर केला आहे. अतिशय मुक्तपणे हा सगळा खेळ रंगवत लेखक व दिग्दर्शकांना अभिप्रेत असलेले नाटय़ या कलाकारांनी रंगमंचावर पेश केले आहे. सर्वांनीच हे नाटक रंगवण्यासाठी बरेच श्रम घेतले आहेत आणि तसे ते पटवून देण्यातही हे कलाकार यशस्वी झाले आहेत.

अंशुमन विचारे (संजय), उदय नेने (अजय) व सचिन वळंजू (विजय) हे या नाटकातले त्रिकूट म्हणजे या नाटय़ाचा आत्मा आहे. अचूक टायमिंग साधत या तिघांनी पुरेपूर हशा वसूल करत नाटकाचा स्तर उंचावला आहे. अंशुमन विचारेचा अशा प्रकारच्या भूमिका रंगवण्यात हातखंडा आहेच. त्याचप्रमाणे यात अजून एक ‘विशेष’ पात्र रंगवत त्याने त्याची ‘जुनी हौस’ पुन्हा एकदा भागवून घेतली आहे. त्याच्या तोंडी असलेले पालुपद आणि त्याचा उच्चार तर प्रत्येक वेळी हास्याची लकेर उमटवतो. उदय नेने यानेसुद्धा यात नाना उद्योग करत भाव खाण्याचे काम व्यवस्थित केले आहे. नाटकातले एकमेव स्त्र्ााr-पात्र म्हणजे सुहानी आणि हे पात्र हर्षदा बामणे हिने उठावदार केले आहे. रंगमंचावरचा तिचा आत्मविश्वास आणि मुक्त वावर या नाटय़ात अचूक रंग भरतो. अनिल शिंदे यांनी यातली घरमालकाची भूमिका फर्मास रंगवली आहे. अजिंक्य नंदा (सचिन), नरेंद्र केरेकर (इन्स्पेक्टर) व दीपक गोडबोले (सदानंद) यांच्याही भूमिका लक्षात राहतात.

यातले नाटय़ बहुतांश एका वाडय़ाच्या दिवाणखान्यातच घडते, पण तत्पूर्वी नाटकाचा एक प्रसंग एसटी बस डेपोमध्ये घडतो. या बस डेपोचे हुबेहूब नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी बारीक सारीक तपशिलांसह उभे केले आहे. मात्र या एसटी डेपोच्या नेपथ्याचा उपयोग केवळ एका प्रवेशापुरताच केला गेल्याने हे नेपथ्य काही वेळातच दृष्टिआड होते. नाटकात प्रकाश योजनेलाही बऱयापैकी वाव आहे आणि अमोघ फडके यांनी त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे. सत्यजित रानडे यांची संगीत साथही पूरक आहे. पल्लवी विचारे यांची वेशभूषा नाटकातल्या प्रसंगांना आणि पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांना अनुसरून आहे. फक्त यातल्या स्त्र्ााr-पात्राच्या एका प्रसंगातल्या पेहरावाबद्दल थोडा विचार करणे उचित ठरेल. रंगभूषाकार किशोर पिंगळे यांनी पात्रांच्या चेहऱयांना नाटय़ाच्या आवश्यकतेनुसार साजेशी रंगरंगोटी केली आहे. एकूणच ‘समुद्रमंथन’ या नाटय़ संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणले असून रसिकांच्या मनोरंजनासाठी एक रुचकर ताट त्यांच्या पुढय़ात मांडले आहे.
n [email protected]